एका आस्थापनाचे वजन न्यून करण्यासाठीचे ‘इंजेक्टेबल’ (इंजेक्शनप्रमाणे घ्यायचे) औषध भारत सोडून इतर देशांच्या बाजारामध्ये आले होतेच, भारतात येण्याच्या मार्गावर होते, सप्टेंबर २०२५ मध्ये आले. सध्या स्थूलता किंवा वजनवाढ आणि संलग्न ‘नॉन-कम्युनिकेबल डिसिज’ (असंसर्गजन्य रोग) (हृदयरोग/मधुमेह इत्यादी) हा इतका अधिक चिंतेचा विषय आहे, त्यामुळे त्यासंबंधीची उत्पादने ही नेहमीच मागणीमध्ये असतात आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या उक्तीप्रमाणे ती येत रहाणार.
अशा प्रकारच्या औषधांचा बाजारातील सहभाग हा वर्ष २०२१ पासून वर्ष २०२५ पर्यंत १ कोटी ६ लाखांवरून १० कोटी इतका वाढला आहे. या औषधाचे ४० टक्के लोकांमध्ये पोटाच्या तक्रारी, ‘पॅनक्रिआ’ (स्वादुपिंड), किडनी यांच्यावर परिणाम इथपासून ‘थायरॉईड’च्या कर्करोगाची शक्यता इथपर्यंत काही ना काही लहान मोठे तोटे दिसले आहेत. यावर मत हे आहे की, स्वतःच्या शरिराशी काय करायचे, हा त्या त्या माणसाचा प्रश्न आहे. त्यांनी तोटे जाणून घेऊन ‘इन्फॉर्मड डिसिजन’ (माहितीपूर्ण निर्णय) घ्यावा. थोडक्यात यातून आपण शिकायचे काय आहे की, स्वतःच्या प्रकृतीसंबंधीचे निर्णय आपण डोळसपणे घ्यायचे आहेत आणि पुढच्या पिढीला हा डोळसपणा शिकवायचा आहे; कारण आपल्यापेक्षा या विज्ञापनांना सध्याच्या पिढी अधिक लहानपणापासून सतत ‘एक्सपोज’ (बाधित) झालेली आहे.
वजनवाढ रोखण्यासाठी आहाराचा निग्रह आणि व्यायाम, हेच उपाय !
जवळजवळ ३५ टक्के लोकसंख्या स्थूल वर्गात मोडते आणि वर्षागणिक ही संख्या वाढत चालली आहे. आरोग्यपूर्ण पद्धतीत वजन न्यून करायला कुठलीही ‘क्विक पिल’ (आपत्कालीन गोळी) नाही. या उत्पादनाने पचनाच्या तक्रारी, उष्णता, पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव, जळजळ ही लक्षणे वाढलेली दिसतात आणि ते उत्पादन वापरायचे थांबवले, तरीही नंतर त्रास होतांना दिसतो. टोकाच्या अपवादात्मक अनारोग्यकारक काही अवस्था वगळता वर वर दिसायला सोपा मार्ग म्हणून उगाच या मार्गाला जाणे अगदीच टाळावे. वजनवाढ होण्याची प्रकृती असल्यास जाणीवपूर्वक हे प्रयत्न लहानपणापासून करत रहायला हवेत, पालक म्हणून आपण मुलांना याविषयी सांगत रहायला हवे, तशा खाण्याच्या सवयी लावायला हव्यात, मुले रडतील, चिडतील, चिडू दे, मोठ्या ध्येयासाठी त्यांनी थोडी रडारड केली तरी करू दे, चालेल.

वजन वाढीशी अनेक गंभीर दुखणी हळूहळू जोडली जातात. वय मोठे झाल्यावर हे त्रास अजून चिकट होत जातात. ‘सॅलड’ (कच्च्या भाज्यांची कोशिंबीर) आणि कच्च्या भाज्या खाऊन वजन तात्पुरते न्यून करणे, हे अजिबात टिकवता येण्यासारखे नाही, पोटाच्या अन् पोषणाच्या दृष्टीने परिपूर्ण नाही, तर त्रासदायकच आहे.
वजन वाढू न देणे, ही पहिली पायरी आणि वाढले असल्यास शाश्वत असे दीर्घकालीन आरोग्यदायी दृष्टीकोन ठेवून वजन न्यून करण्यासाठी प्रयत्न (Sustainable weight loss), म्हणजेच आहाराचा निग्रह अन् व्यायाम हेच उपाय आहेत; थोडे मन मारायला लागतेच, थोडा वेळ द्यायला लागतो, अन्य दुसरा उपाय नाही.
काही ढोबळ मार्गदर्शक सूचना
१. थंडी सोडून इतर ऋतूंमध्ये न्याहरी टाळणे.
२. सकाळचे जेवण साधारण दुपारी १ वाजण्याच्या आत आणि रात्रीचे ८ वाजण्याच्या आत करावे.
३. कुळीथ, मूग, सातू, बाजरी, ज्वारी, मिलेटस् अशा लहान आकाराच्या धान्यांचा वापर करावा. भातासाठी तांदूळही लहान दाण्याचा वापरावा. पेज काढून भात खावा.
४. आहार मात्रा प्रमाणात ठेवणे. सर्वग्रह, म्हणजेच सर्व पदार्थ मिळून आहाराचा आकार न्यून करणे.
५. थंडी किंवा पावसाळा या कालावधीत सल्ल्याने गरम / कोमट / औषधीयुक्त सिद्ध पाणी पिणे.
६. रात्रीचे जेवण निम्मे किंवा पातळ सूप / कढण करणे.
७. झोप नियमित असणे. व्यायाम न चुकता करत रहाणे.
८. ‘रेसिपी’ (पाककृती) : थालीपीठ, भाज्यांची खिचडी, फळभाज्या, भाकरी, कटलेट, सूप, विविध धान्यांचे घावन, मूग वरण-भात, कुळीथ पिठले-भात, धपाटा तूप, ताकातील पालेभाज्या-भाकरी
९. प्रतिदिन अंगाला तीळ तेल आणि मेद साठणार्या ठिकाणी मोहरी तेल अभ्यंग, त्रिफळा, मेथी इत्यादी मेदोहर द्रव्यांचे उटणे वापरणे.
१०. पुष्कळ शहाळे, फळे, फळांचे रस, न शिजवलेल्या भाज्या खाऊन पोटात गॅस (वायू), पोटफुगी असल्यास त्यामुळेही वजन वाढलेले दिसते.
११. वजनवाढीच्या मुळाशी असलेले थायरॉईड, मासिक पाळीशी संबंधित स्थिती, प्रमेह, कृमिरोग यांचे आयुर्वेदाच्या अनुषंगाने निदान करून औषधे घेणे.
१२. पोटाची तक्रार असता वैद्यांकडून औषध, पंचकर्म आणि आहार यांविषयी मार्गदर्शन घ्यावे.
हे सगळे उपाय आपल्याला माहिती असतात, त्यांच्यापर्यंत ‘ॲक्सेस’ (उपायांपर्यंत पोचण्याची पद्धती माहिती असणे) असतो; पण सगळ्या गोष्टीत एक महत्त्वाचे, म्हणजे त्या व्यक्तीची हे सर्व करण्याची इच्छा असणे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते; पण पाणी त्यानेच प्यायला हवे, हे नक्की ! (१०.११.२०२५)
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !