PM Modi On Delhi Blast : कारस्थान करणार्‍यांना अद्दल घडवली जाईल !

  • लाल किल्ल्याजवळील बाँबस्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि डिटोनेटर यांचा वापर

  • ‘जैश-ए-महंमद’चा हात !

पंतप्रधान मोदी

नवी देहली – मी काल रात्रभर या घटनेचे अन्वेषण करणार्‍या सर्व यंत्रणा, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या संपर्कात होतो. चर्चा चालू होती. माहितीची देवाण-घेवाण चालू होती.

आमच्या अन्वेषण यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील. हे कारस्थान करणार्‍यांना आम्ही सोडणार नाही. जे कुणी या घटनेसाठी उत्तरदायी आहेत, त्यांना अद्दल घडवली जाईल, असा ठाम निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहलीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेवर व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान देशाच्या दौर्‍यावर पोचले असून तेथून त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.

दोषींना सोडले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या घटनेवर म्हणाले की, मी देशाला निश्चिती देऊ इच्छितो की, स्फोटाच्या घटनेत दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

स्फोटामागे ‘जैश-ए-महंमद’ !

१० नोव्हेंबर या दिवशी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकातील मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वार १ च्या बाहेर झालेला भीषण स्फोट जिहादी आतंकवाद्यांनी घडवल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. या घटनेच्या पूर्वी हरियाणाच्या फरीदाबाद येथून २ सहस्र ९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणी डॉ. अदील, डॉ. मुजम्मिल आणि त्याची प्रेयसी डॉ. शाहीन शाहीद यांना अटक करण्यात आली होती. यांचाच साथीदार असणार्‍या डॉ. उमर नबी यानेच लाल किल्ल्याजवळ आत्मघातकी स्फोट घडवून आणला. यात तो स्वतःही ठार झाला. त्याने ‘ह्युंदाई’ आस्थापनाची ‘आय२०’ या चारचाकी गाडीचा वापर केला होता. यात आणखी २ जण होते आणि त्यांचाही यात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेचे ते आतंकवादी होते, अशी माहितीही समोर आली आहे. सध्या या प्रकरणात एका व्यक्तीला कह्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक अन्वेषणात या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि एक डेटोनेटर वापरण्यात आले होते.

अनियोजित करण्यात आला स्फोट !

डॉ. अदील, डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन यांना अटक झाल्यावर आणि फरीदाबाद येथून शस्त्रसाठा अन् स्फोटके जप्त झाल्यानंतर डॉ. उमर याने उर्वरित स्फोटकांचे काय करायचे, या गडबडीतूनच हा स्फोट घडवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा स्फोटकांचा साठा त्यांना अन्यत्र ठेवता आला नसल्यामुळेच त्यांनी स्फोट घडवण्याचा निर्णय घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या सर्वांना कुणीतरी अन्य आदेश देत होता आणि त्याच्या आदेशानुसार हे काम करत होते. या आतंकवाद्यांचे लक्ष्य देहलीतील अन्य ठिकाण असणार होते; मात्र अटक सत्र आणि शस्त्रसाठा जप्त झाल्याने लाल किल्ल्याजवळ स्फोट करण्यात आला.

मृतांमध्ये मुसलमानांची संख्या अधिक असण्याची शक्यता

या स्फोटांमध्ये अधिकृतपणे १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र डॉ. उमर वगळता अन्य कुणाचेही नाव समोर आलेले नाही; मात्र ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, तो मुसलमानबहुल भाग असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मृतांमध्ये मुसलमान अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मृतांमध्ये २ महिला आहेत, तर २४ जण घायाळ झाले आहेत. या ठिकाणावरून १०० मीटर अंतरावर गौरी शंकर मंदिर आणि जैन मंदिर आहे. कदाचित् या मंदिरांना लक्ष्य करण्यासाठी डॉ. उमर तेथे गाडी नेत असतांना वाटेतच स्फोट झाल्याचीही शक्यता आहे.

डॉ. उमर ३ घंटे गाडीतच बसून होता !

या स्फोटापूर्वी डॉ. उमर गाडीसहित येथील सुनहरी मशिदीबाहेरील वाहनतळावर ३ घंटे थांबला होता. या काळात तो गाडीतून एकदाही बाहेर आला नाही. येथे तो कुणाची तरी वाट पहात होता आणि दूरभाषवरून बोलत होता, अशी माहिती ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून समोर आली आहे.

स्फोटासाठीची गाडी मुसलमानाची !

पोलिसांच्या माहितीनुसार स्फोट झालेल्या चारचाकी गाडीमध्ये ३ जण होते. ही गाडी हरियाणातील गुरुग्राममध्ये सलमान याच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांनी सलमानला कह्यात घेतले आहे. सलमानने ही गाडी पुलवामा येथील तारिक याला विकली होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका वर्षांत ७ वेळा ही गाडी विकण्यात आली आहे. सध्या तिची नोंदणी गुरुग्राम येथे आहे.

फरीदाबादमधून आणखी मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त

फरीदाबादच्या सेक्टर ५६ भागातून मोठ्या प्रमाणात आणखी स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी येथे २ सहस्र ९०० हून अधिक अमोनियम नायट्रेट हे स्फोटक सापडले होते.

पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद याला अटक

स्फोटाच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद याला अटक करण्यात आली आहे. डॉ. सज्जाद हा डॉ. उमर याचा मित्र आहे.

डॉ. शाहिना शाहीद ‘जैश’च्या महिला शाखेची कमांडर

जैश-ए-महंमदच्या महिला शाखेच्या ‘जमात उल मोमिनात’ची कमांडर होती डॉ. शाहिना शाहीद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. शाहिना शाहीद ही केवळ डॉक्टर नव्हती, तर जैश-ए-महंमदच्या महिला शाखेच्या ‘जमात उल मोमिनात’ची कमांडर होती. ती लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील लालबागमध्ये रहाणारी आहे. या संघटनेची पाकिस्तानमधील प्रमुख म्हणजे सादिया अझहर आहे, जी आतंकवादी मसूद अझहर याची बहीण आहे, तसेच कंदाहार येथील भारतीय विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार युसूफ अझहर याची पत्नी आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली बैठक !

स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ११ नोव्हेंबरला सकाळी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दीड घंटे चालली.

अल् फलाह विद्यापिठात चौकशी चालू

फरीदाबाद पोलिसांनी येथील अल् फलाह विद्यापिठाला वेढा घातला आहे. येथे मोठा फौजफाटा तैनात आहे. विद्यापिठामध्ये अन्वेषण चालू आहे. डॉ. अदील, शाहीन आणि मुजम्मिल हे तिघेही या विद्यापिठाशी जोडलेले होते. यासह फरीदाबादमधील फतेहपूर तगा गावातील मशिदींमध्ये पोलीस शोध घेत आहेत. या गावातच भाड्याच्या घरामध्ये डॉ. मुजम्मिल याने २ सहस्र ५६३ किलो अमोनियम नायट्रेट ठेवले होते.

डॉ. उमरची आई आणि भाऊ पोलिसांच्या कह्यात

ज्याने गाडीमध्ये स्फोट घडवून आणला, तो डॉ. उमर नबी काश्मीरच्या पुलवामाचा रहाणार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी डॉ. उमरची आई आणि भाऊ यांना कह्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे आणि उमरच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे ‘डी.एन्.ए.’ (‘डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) नमुने घेण्यात आले आहेत. डॉ. उमर याने वर्ष २०१७ मध्ये श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण पूर्ण केले. उमर फरीदाबादच्या अल् फलाह वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर होता.

५०० अधिकार्‍यांचे अन्वेषण पथक

या स्फोटाच्या प्रकरणी गुप्तचर विभाग, राष्ट्रीय अन्वेण यंत्रणा, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस अशा विविध यंत्रणांतील ५०० हून अधिक अधिकार्‍यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. हे अधिकारी लहान लहान गट बनवून याचे अन्वेषण करत आहेत. यात १ सहस्रांहून अधिक सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळले जात आहे.

पाकिस्तानच्या हवाई दलाने दिली सतर्कतेची चेतावणी !

भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तान सतर्क

देहलीतील बाँबस्फोटानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर हवाई दलाने गस्त चालू केली आहे. त्यांच्या सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी आपत्कालीन बैठक घेतली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या.

लक्ष्मणपुरीतील डॉ. परवेझ अन्सारी याच्यावर संशय

स्फोटाच्या प्रकरणात २ संशयित गाड्या समोर आल्या आहेत. यातील एक गाडी डॉ. परवेझ अन्सारी याच्या घराबाहेर उभी होती. अन्सारी हा अटक केलेल्या डॉ. शाहीन हिचा सख्खा भाऊ आहे. सध्या तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घालून झडती घेतली.

संपादकीय भूमिका

  • ‘कोणतेही आतंकवादी आक्रमण भारताविरोधातील युद्ध समजले जाईल’, असे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अधिकृतरित्या घोषित केलेले असल्याने आता हे आक्रमण युद्धच असल्याने ‘ऑपरेशन सिंदूर २’ करणे आवश्यक आहे; मात्र ते करतांना अर्धवट न ठेवता पाकचा कायमचा निःपात केला पाहिजे, असेच भारतियांना अपेक्षित आहे !
  • या स्फोटात आतापर्यंत एकूण ५ डॉक्टर सहभागी असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे यात एक महिला डॉक्टरही आहे. यातून काय समजायचे ? मुसलमान डॉक्टर झाले, तरी जिहादीच होणार आहेत का ? त्यांच्यात ही जिहादी मानसिकता कुठून निर्माण होते ? यावर आता देशभरात चर्चा होणे आवश्यक आहे !