|

पणजी – ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राद्वारे व्यक्तीचे शिक्षण, व्यवसाय, विवाह, संतती आदी व्यावहारिक गोष्टींसंबंधी दिशादर्शन करता येते, त्याचप्रमाणे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठीही तिला तिच्या जन्मकुंडलीवरून दिशादर्शन करता येते, अशी माहिती ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांनी दिली. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी पणजी येथे झालेल्या ‘जयसिंगराव चव्हाण ११ वे आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन’ या परिषदेत श्री. राज कर्वे बोलत होते. त्यांनी या अधिवेशनात ‘जन्मकुंडली – जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’, हा शोधनिबंध सादर केला. शोधनिबंधाचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून श्री. राज कर्वे हे लेखक आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाला ३०० हून अधिक ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमी उपस्थित होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क, सौ. श्वेता क्लार्क, मिल्की अग्रवाल आणि श्री. सत्यकाम कणगलेकर हेही अधिवेशनास उपस्थित होते. अधिवेशनात विविध ज्योतिष अभ्यासकांनी त्यांचे संशोधन सादर केले.
डॉ. जयसिंगराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ११व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन करण्याचा सन्मान लाभला. जगभरातून आलेल्या विद्वान, संशोधक, अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्रप्रेमींचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
श्री. जयसिंगराव चव्हाण यांना स्मृतिप्रणाम. ज्योतिषशास्त्राच्या… pic.twitter.com/uPSkkU8rbX
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 31, 2025
श्री. राज कर्वे यांनी मांडलेली सूत्रे,

१. शिक्षण, व्यवसाय, विवाह, संतती आदी व्यक्तीच्या व्यावहारिक जीवनाशी संबंधित प्रश्न आहेत; परंतु ‘माझ्या जीवनाची सार्थकता कशात आहे ? माझे नियत कर्म कोणते ? माझ्यातील मूलभूत क्षमता कोणत्या ? आध्यात्मिक उन्नती करण्याचा माझा मार्ग कोणता ?’, आदी प्रश्न मनुष्याच्या आंतरिक (आध्यात्मिक) जीवनाशी संबंधित आहेत. या प्रश्नांची उत्तरे मनुष्याच्या जीवनाला दिशा देतात. ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनाशी निगडित शास्त्र असल्याने ते व्यावहारिक जीवनासह मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनाविषयीही चांगल्या प्रकारे दिशादर्शन करते.
२. व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शवण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते.
३. जन्मकुंडलीत असणार्या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो. जन्मकुंडलीत चंद्र, शुक्र, गुरु यांचे परस्पर योग भक्तीमार्ग; रवि, गुरु, बुध, हर्षल यांचे परस्पर योग ज्ञानमार्ग, रवि, मंगळ, गुरु, शनि यांचे परस्पर योग कर्ममार्ग इत्यादी दर्शवतात. प्रत्येक व्यक्तीची कुंडली निराळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि साधनामार्ग निराळा असतो. जन्मकुंडलीवरून याचा बोध होऊ शकतो.
४. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. व्यापकतेमुळे ज्ञान, आनंद आणि शांती लाभते. अनेक लोकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक ग्रहयोग असतात, म्हणजे आध्यात्मिक उन्नती करण्याची त्यांची क्षमता असते; मात्र त्याविषयी त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन करण्यासह आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. राज कर्वे यांनी केले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २० राष्ट्रीय आणि १०१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण १२१ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत. |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित