‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशाच्या गौरवाचा मानबिंदू ठरला. भारतीय सैन्याच्या अजोड कामगिरीने सारे जगच विस्मित झाले; मात्र यामागे एका मोठ्या नियोजनाची जोडही महत्त्वाची होतीच. मोहिमेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेणे, जागतिक स्तरावरून वाढणारा दबाव या सगळ्याला भारतीय रणनीतीकारांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळेच ‘ऑपरेशन सिंदूर’ एक यशोगाथा ठरली. याच यशोगाथेतील रणनीतीकारांच्या योगदानाचा घेतलेला आढावा…
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये परराष्ट्रमंत्री, ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख – संरक्षणप्रमुख), ‘चीफ ऑफ आर्म स्टाफ’ (सैन्यप्रमुख), ‘चीफ ऑफ एअर स्टाफ’ (हवाई दलप्रमुख) आणि ‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स’ (सैनिकी कारवायांचे महासंचालक) यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. १७ ऑक्टोबर २०२५ या दिवशी नाशिक येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’मध्ये (‘एच्.ए.एल्.’मध्ये) झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘नुकत्याच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत ‘एच्.ए.एल्.’ने पूर्ण क्षमतेने आणि २४ घंटे सेवा देऊन मोलाची भूमिका बजावली.’’ यासाठी राजनाथ सिंह यांनी ‘एच्.ए.एल्.’चे अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष अभिनंदनही केले.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
१. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला ठाम भूमिका आणि रणनैतिक आधार दिला. यामुळेच भारताची प्रतिमा अधिक बळकट झाली.

१ अ. राजकीय भूमिका आणि ठाम संवाद : डॉ. जयशंकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत भारतासमोर असलेले जागतिक राजकारणाचे आव्हान अतिशय सक्षमपणे हाताळले. त्याच वेळी त्यांनी ‘आतंकवादाविषयी शून्य सहिष्णुता’ ही भारताची भूमिकाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुस्पष्टपणे मांडली. त्यांच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानपुरस्कृत आतंकवादी गटांना रोखण्यासाठी जागतिक सहमती मिळवली, तसेच जयशंकर यांच्या नेतृत्वाखालीच बहुपक्षीय मंचांवरही भारताने आतंकवादाविरुद्ध कठोर संदेश दिला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ‘क्वाड’ (भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या ४ देशांचा संरक्षणात्मकदृष्ट्या बनवलेला गट), ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश असलेली आंतरसरकारी संघटना आहे.) यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक संस्थांकडून भारताला पाठिंबा मिळवण्यात जयशंकर यांच्या अनुभवाचा देशाला लाभ झाला.
१ आ. परराष्ट्र धोरणातील ठोस निर्णय : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, सिंधू जल कराराला स्थगित देणे, पाकिस्तानच्या आतंकवादी समर्थनावर कठोर भाष्य करण आणि आक्रमणाचे सूत्रधार शोधण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णय प्रक्रियेत डॉ. जयशंकर यांची भूमिका निर्णायकच होती. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समिती यांच्यासमोर ठोस शिफारसी ठेवल्या.

१ इ. जागतिक सहमती आणि माहितीचे व्यवस्थापन : जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयातील विचारविनिमय समितीसमोर स्पष्ट केले की, भारतीय सैन्याने ‘स्ट्राईक’ (सैनिकी कारवाई) केल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्येच पाकिस्तानला याची कल्पना देण्यात आली होती. कोणत्याही पाश्चिमात्य मध्यस्थीविना हा लढा ‘द्विपक्षीय’ पद्धतीने निर्णायक झाला. ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’तही भारताची भूमिका मांडण्यात जयशंकर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘द रेझिस्टंस फ्रंट’ या जिहादी गटाला जागतिक स्तरावर ‘आतंकवादी’ म्हणून घोषित करण्यातही जयशंकर यांचे योगदान महत्त्वाचे होते.
१ ई. प्रभाव आणि परिणाम : डॉ. जयशंकर यांच्या नेतृत्वामुळेच भारताने आतंकवादाविरुद्धच्या कठोर कारवाईच्या वेळी आत्मनिर्भर परराष्ट्र धोरण राबवले. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर दबाव वाढवला आणि भारताचे सार्वभौमत्वही अधोरेखित केले. ‘मोदी नॉर्मल’ (संवाद आणि आतंकवाद एकत्र शक्य नाही), असा नवा राजनैतिक दृष्टीकोनही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केला.
२. संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचे योगदान

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल अनिल चौहान यांचा महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वाटा होता. त्यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा आतंकवादाला थांबवण्याचा भारताचा एक प्रयत्न होता. या मोहिमेचा मुख्य उद्देश ‘पाकिस्तानमधून भारतात होणार्या आतंकवादी कारवायांना प्रतिबंध करणे’, हा होता.
जनरल चौहान यांच्या माहितीनुसार हे ‘ऑपरेशन’ रात्री १ ते १.३० या वेळेत आखण्यात आले, जेणेकरून जीविताची हानी टाळता येईल. त्यांनी या कारवाईला ‘नवीन प्रकारच्या युद्धाचा प्रारंभ’ म्हटले आहे. या युद्धात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पाकवर निर्णायक वार करण्यात आला. यामध्ये भूमी, आकाश, समुद्र आणि सायबर या क्षेत्रांतही भारताच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. जनरल अनिल चौहान यांनी काळजीपूर्वक नियोजन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उच्चस्तरीय सहकार्य, तसेच नेतृत्वाद्वारे या मोहिमेला यशस्वी केले. त्यांनी आधुनिक आणि प्रभावी युद्धकौशल्य राबवून भारतीय सैन्याच्या सामरिक क्षमतेचीही उंची वाढवली.
३. सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे योगदान

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी या ‘ऑपरेशन’च्या योजना, रणनीती आणि कार्यवाही यांचे नेतृत्व केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ एक ‘ग्रे झोन’मध्ये (शांतता आणि युद्ध यांच्यामधील संघर्ष) झालेले युद्ध होते, जे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे आणि अनपेक्षित परिस्थितींनी भरलेले होते. या ‘ऑपरेशन’ची तुलना त्यांनी बुद्धीबळ खेळाशी केली; कारण प्रत्येक स्तरावर पुढील चालींचा आणि शत्रूच्या प्रतिसादाचे अनुमान लावणे आव्हानात्मक होते.
जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले, ‘२२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. २३ एप्रिल या दिवशी सैन्याने निर्णय घेतला की, ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. या ‘ऑपरेशन’मध्ये सैनिकांनी पाकिस्तानमध्ये खोलवर घुसखोरी करून आतंकवादी घेराबंद केले आणि त्यांना दणका दिला. ‘उरी’ आणि ‘बालाकोट’ यांसारख्या आक्रमणांपेक्षा अधिक व्यापक अन् खोलवर आक्रमणे करण्यात आली. या ‘ऑपरेशन’ची कार्यवाही अतिशय उत्तमरित्या करण्यात आली.’ संपूर्ण ‘ऑपरेशन’मध्ये जनरल उपेंद्र द्विवेदी यांची धोरणात्मक नेतृत्व क्षमता, समन्वयासाठीची कौशल्ये आणि अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याची सज्जता हे महत्त्वपूर्ण ठरले. भारताने पाकिस्तानच्या आतंकवादी तंत्रांच्या प्रतिकारासाठी जनरल द्विवेदी यांच्या नेतृत्वात एक नवीन आणि प्रभावी रणनीतीचाही वापर केला.
४. हवाई दलप्रमुखांचे योगदान

‘एअर चीफ मार्शल’ अमरप्रीत सिंह यांनी महत्त्वाचा आणि निर्णायक वाटा उचलला. त्यांनी या ‘ऑपरेशन’मध्ये भारतीय हवाई दलाच्या आधुनिक युद्धकला आणि निर्णायक आक्रमणाच्या क्षमतेसाठी तिन्ही सैन्य दलांच्या, तसेच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या समन्वयावरही विशेष भर दिला. ‘एअर चीफ मार्शल’ यांनी या ‘ऑपरेशन’मध्ये वापरलेल्या लांब पल्ल्याच्या ‘एल्.आर्.एस्.ए.एम्.२’ (‘लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाईल’- लांब पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली) आणि ‘एस्-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणेचे ‘गेम चेंजर’ (युद्धात निर्णायक पालट करणारी यंत्रणा) म्हणून वर्णन केले. ‘यांच्या साहाय्याने शत्रूच्या हवाई प्रतिकाराला उत्तमरित्या नियंत्रित केल्याने त्यांना प्रत्युत्तर देणे कठीण गेले. हे ‘ऑपरेशन’ निर्णायक ठरण्याची मुख्य कारणे, म्हणजे या उपकरणांचा प्रभावी वापर, समन्वित आणि सैन्यदलांची एकत्रित कार्यवाही, त्वरित निर्णायक धोरणात्मक निर्णय’, असेही अमरप्रीत सिंह म्हणाले.
हवाई दलाच्या ४ अधिकार्यांना ‘ऑपरेशन’मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सर्वोत्तम युद्ध सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले, तर ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्रांनीही गौरवण्यात आले. संपूर्ण ‘ऑपरेशन’मध्ये भारतीय हवाई सेना प्रमुखांनी नेतृत्व करत तिन्ही सैन्य दलांमध्ये असाधारण समन्वय साधला.
५. ‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स’ (डी.जी.एम्.ओ.) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचे योगदान

‘डी.जी.एम्.ओ.’ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. ते या संपूर्ण ‘ऑपरेशन’चे मुख्य समन्वयक होते आणि संपूर्ण सैन्य कारवाईचे उत्तरदायित्व त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यांनी सैन्य, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये परस्पर सहकार्य अन् समन्वय साधला. त्यांनी रणनीती आखली, दिशा-निर्देश ठरवत त्याची यशस्वी कार्यवाहीही सुनिश्चित केली.
५ अ. युद्धबंदी करण्यात निर्णायक भूमिका : पाकिस्तानचे ‘डी.जी.एम्.ओ.’ मेजर जनरल कासिफ यांनी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याशी संघर्ष विरामासाठी संवाद साधला.
यामुळेच १० मे या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी शक्य झाली.
५ आ. सामरिक नियंत्रणात सहभाग : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात त्यांचा ‘डेप्युटी चीफ ऑफ आर्म स्टाफ’ (स्ट्रॅटेजी) (सैन्यउपप्रमुख – रणनीती) या महत्त्वाच्या नव्या पदाचे उत्तरदायित्वही त्यांनी सांभाळले. या माध्यमातून त्यांनी सैन्याचे सामरिक नियंत्रणही केले.
६. सैन्य मुख्यालयाचे योगदान

सैन्य मुख्यालयाचे योगदान ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अत्यंत महत्त्वाचे होते. सैन्याच्या मुख्यालयाने या कारवाईत भारतीय सैन्याच्या विविध विभागांमधील सूचनांचे आदानप्रदान, तंत्रज्ञान, ‘लॉजिस्टिक्स’ (सैनिकी उपकरणांची एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वेळेवर अन् कार्यक्षमतेने वाहतूक करणे) आणि माहिती युद्धविषयक नियोजन, तसेच कार्यवाहीवरही कठोर नियंत्रण ठेवले. यामुळे संपूर्ण ‘ऑपरेशन’च अत्यंत प्रभावीपणे पार पडले.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !