आपल्या व्यावसायिक जीवनात आपण अनेकदा असे संवाद ऐकतो, ‘माझ्या क्षेत्रात आता पूर्वीसारखा ‘स्कोप’ (संधी) राहिलेला नाही’, ‘या इंडस्ट्रीत केवळ वशिलेबाजी चालते’ किंवा ‘मी चुकीचे क्षेत्र (फिल्ड) निवडले; इथे मेहनतीला किंमतच नाही’ अथवा ‘आमच्या क्षेत्रात तो अमका तमका आहे ना; त्याने केवळ चुकीच्या मार्गाने यश मिळवले आहे.’ वरवर पहाता या तक्रारी खर्या वाटू शकतात; पण जर खोलवर विचार केला, तर हे स्पष्ट होते की, जी व्यक्ती स्वतःच्याच कार्यक्षेत्राला सतत दोष देते; ती यशाच्या मार्गावरून आधीच भरकटलेली असते !

व्यक्तीची मूलभूत मानसिकता
यामागे एक मूलभूत मानसिकता दडलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अपयशासाठी किंवा संघर्षासाठी स्वतःच्या क्षेत्राला उत्तरदायी धरते, तेव्हा ती नकळतपणे स्वतःच्या कर्तृत्वाची आणि दायित्वाची जाणीव नाकारत असते. हा एक प्रकारचा ‘व्हिक्टिम माईंडसेट’ (पीडितेची मानसिकता) आहे. ‘मी अयशस्वी नाही, तर माझे क्षेत्रच सदोष आहे’, हा विचार तात्पुरता दिलासा देतो; पण तो प्रगतीचे सर्व मार्ग बंद करतो. यश मिळवण्यासाठी ज्या उत्कटतेची (पॅशन), समर्पणाची (डेडिकेशन) आणि सातत्याची (कॉन्सिस्टंटन्सी) आवश्यकता असते, ती अशा नकारात्मक मानसिकतेतून कधीच निर्माण होऊ शकत नाही. जर तुमचा तुमच्या कामावर किंवा क्षेत्रावरच विश्वास नसेल, तर तुम्ही त्यासाठी १०० टक्के प्रयत्न कसे कराल ? तुम्ही नवीन कौशल्ये शिकण्यासाठी, पालटांना सामोरे जाण्यासाठी किंवा आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रवृत्तच होणार नाही. तुमची सर्व ऊर्जा ‘या क्षेत्रात काहीच होऊ शकत नाही’, हे सिद्ध करण्यातच खर्ची पडेल.

परिस्थितीला दोष न देता ती पालटण्याचे दायित्व घेणे
जगातील कोणतेही क्षेत्र परिपूर्ण नाही. प्रत्येक क्षेत्रात आव्हाने आहेत, स्पर्धा आहे आणि काही प्रमाणात उणिवाही आहेत; पण त्याच ‘खराब’ मानल्या जाणार्या क्षेत्रात काही लोक प्रचंड यशस्वी झालेले दिसतात. असे का ? कारण ते त्या क्षेत्रांतील समस्यांविषयी तक्रार करत बसत नाहीत, तर त्या समस्यांवर उपाय शोधतात. ते पालटांना दोष देत नाहीत, तर ते पालटांनुसार स्वतःला अधिक सक्षम बनवतात; पण जेव्हा तुम्ही तुमच्याच क्षेत्राला दोष देता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वाढीची शक्यता नाकारता. तुमची दृष्टी संकुचित होते आणि तुम्हाला केवळ अडथळे दिसतात. याउलट जी व्यक्ती स्वतःच्या क्षेत्राचा सन्मान करते, ती त्यातील संधी शोधते. ‘इथे काही नाही’ यापेक्षा ‘इथे मी काय नवीन करू शकतो’, यावर लक्ष केंद्रित करते. यशस्वी लोक परिस्थितीला दोष देत नाहीत, ते परिस्थिती पालटण्याचे दायित्व घेतात.
स्वतःला सिद्ध करणे, हाच यशाचा खरा मार्ग !
थोडक्यात तुमचे क्षेत्र ‘चांगले’ कि ‘वाईट’ यांवर तुमचे यश अवलंबून नसते, तर त्या क्षेत्राकडे पहाण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे ? यावर ते अवलंबून असते. यशाचा मार्ग हा तक्रारींमधून नव्हे; तर दायित्व स्वीकारण्यातून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि स्वतःच्या कामावर अढळ श्रद्धा ठेवण्यातून जातो. क्षेत्राला दोष देणे, हा पळपुटेपणा; तर स्वतःला सिद्ध करणे, हाच यशाचा खरा मार्ग आहे ! (३०.१०.२०२५)
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !