संपादकीय : सैनिकी श्वान…देशाचा अभिमान !

३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी गुजरातमधील केवडिया येथे ‘एकता दिवस’ साजरा करण्याच्या कार्यक्रमात सीमा सुरक्षा दलाच्या (‘बी.एस्.एफ्.’च्या – ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’) सैनिकांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि छाती अभिमानाने फुलून यावी, अशी प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके सैनिकांची नव्हती, तर ती होती सैन्यातील प्रशिक्षित शिकारी श्वानांची ! अत्यंत उमद्या, चपळ आणि आक्रमक; परंतु तितक्याच शांत अशा या भारतीय जातीच्या ‘रामपूर’ आणि ‘मुधोळ’ जातीच्या शिकारी श्वानांनी सैनिकी कारवायांत उपयुक्त अशी, चकित करणारी प्रात्यक्षिके सादर केली. २० फूट उंच शिडीवर चढणे, चढून सावकाश उभे रहाणे आणि तितक्याच सावकाशपणे उतरणे, डोळे बांधूनही अवघड स्थितीत चालणे, (म्हणजे तो श्वान अंधारातही आणि खडकाळ रस्त्यांवरही चालू शकतो, हे सिद्ध होते), गोल पायर्‍यांवरून चढणे आणि उतरणे (यांत ते वरून उडी टाकत नाहीत, माणसाप्रमाणे व्यवस्थित उतरून खाली येतात.) आदी प्रात्यक्षिके सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या साक्षीने दाखवण्यात आली. उंचावर चढण्याचे जे प्रयोग करतांना विदेशी जातीच्या श्वानांना पूर्वी २ घंटेही लागायचे; परंतु हे भारतीय श्वान प्रत्येक कृती तत्परतेने करत आहेत. आतापर्यंत पोलीस आणि सैन्य यांच्यासाठी ‘जर्मन शेफर्ड’, ‘लॅब्रेडॉर’ किंवा ‘डॉबरमॅन’ अशा विदेशी श्वानांचा वापर केला जात होता. आता तब्बल १५० स्वदेशी श्वानांची तुकडी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अत्यंत कष्टपूर्वक प्रशिक्षण देऊन सिद्ध केली आहे. ‘के ९’ या सैन्य तुकडीतील हे श्वान भारतीय सीमांचे रक्षण करत आहेत; जणू ते प्रतिसैनिकच आहेत. भारतीय सैन्य आणि जनता यांच्या दृष्टीने ते आता सैनिकांएवढेच महत्त्वाचे आहेत.

दूरदृष्टीचे पंतप्रधान आणि त्यांची स्वप्नपूर्ती करणारे सैनिक !

‘आत्मनिर्भर’ भारताच्या अनेकविध पैलूंपैकी हाही महत्त्वाचा पैलू आज कृतीशील होऊन समोर आला आहे. सैनिकांप्रमाणेच त्याचे श्रेय भारताचे अत्यंत चाणाक्ष, दूरदृष्टी असलेले आणि बारकाव्यांसहित कृती करून फलनिष्पत्ती समोर आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात आहे. ५ वर्षांपूर्वी मोदी यांनी भारतीय जातीच्या श्वानांचा वापर करण्याविषयी आग्रह केला होता. त्यांच्या मनातील या गोष्टीला सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सी.आर्.पी.एफ्.) यांच्या सैनिकांनी तेवढीच मोठी साथ दिली अन् मेहनत घेतली. त्याचे उत्कृष्ट फळ आज या सुरक्षारक्षक श्वानांच्या रूपाने मिळाले आहे. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी ही गोष्ट अभिमानाने सांगितली.

भारतीय जातीचे रक्षक श्वान सिद्ध करणे, ही सोपी गोष्ट नव्हती. एक वेळ माणसाला शिकवणे सोपे असू शकते; परंतु शिकारी कुत्र्याला शिकवणे किती कठीण असू शकते, याची आपण कल्पना करू शकतो; परंतु सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हे आव्हान पेलले आणि आता हे श्वान सैनिकांना तेवढीच मोलाची साथ देत आहेत. गेली २ वर्षे भारतीय सीमा अन् नक्षलप्रभावित क्षेत्र यांचे रक्षण हे श्वान सैनिकांच्या ‘पायाला पाय लावून’ करत आहेत. भारतीय जातीचे श्वान हे देशाच्या वातावरणात अधिक चांगल्या प्रकारे राहू शकत असल्यामुळे सीमेवरील थंडी, उन्हाळा या सर्व गोष्टींत ते तग धरून राहू शकत आहेत. सैनिकांप्रमाणेच अत्यंत कठीण प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. कठीण आव्हानांची भिंत या भारतीय जातीच्या श्वानांच्या मार्गाच्या आड आली नाही. अत्यंत कठीण जोखीम पत्करणार्‍या कारवायांत सहभागी करून घेणार्‍या प्रशिक्षणात सीमांचे रक्षण, घुसखोरी रोखणे, आतंकवाद्यांच्या अंगावर धावून जाणे, आतंकवाद्यांच्या विरोधातील विविध कारवायांसाठी सक्षम बनवणे, इतकेच नव्हे, तर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरणे, नदी पार करणे यांचेही प्रशिक्षण दिले आहे. सध्या मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथील ‘राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र’ ४ स्वदेशी जातींच्या श्वानांचे प्रजनन आणि प्रशिक्षण केंद्र बनले आहे. आतापर्यंत श्वानांच्या जाती या विदेशी कुत्र्यांप्रमाणे घडवल्या जात होत्या. भारतीय जाती येथील हवामानाला अनुकूल असल्याने सैन्याने त्यावर संशोधन चालू केले. पहिल्यांदा या श्वानांचा अभ्यास केला, नंतर केवळ वैज्ञानिक आधारावर त्यांचे प्रजनन करून त्यांना माणसाळवले, त्यानंतर तिसर्‍या पिढीला सैनिकी प्रशिक्षण देण्यास आरंभ केला. गेल्या वर्षी ‘पोलीस ड्युटी मीट’ या श्वान प्रशिक्षण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे प्रशिक्षित ‘मुधोळ’ जातीच्या ‘रिया’ला नेण्यात आले, तेव्हा प्रेक्षकांसह परीक्षकांनीही ‘हा कुठल्या जातीचा कुत्रा आणला आहे ?’ असे म्हणून हिणवले; परंतु जेव्हा तिने तब्बल ११६ हून अधिक विदेशी कुत्र्यांना हरवून चॅम्पियनशिपची २ सुवर्णपदके जिंकली, तेव्हा सर्व आश्चर्यचकित झाले अन् भारतीय जातीचे श्वान सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तिला प्रशिक्षित करणार्‍या सैनिकांच्या डोळ्यांतील अश्रू त्या दिवशी थांबले नाहीत !

भारतीय श्वानांचा इतिहास आणि भविष्य

काळभैरव देवतेचे वाहन श्वान आहे. गुरुदेव दत्तांच्या चरणांजवळ ४ श्वान नेहमी असतात. मोहंजोदडोत मिळालेल्या प्रतिकृतींमध्ये श्वान होते. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ श्वानाचा पुतळा आहे. उत्तरप्रदेशातील रामपूर येथे पूर्वी नवाब शिकार करण्यासाठी या कुत्र्यांना पाळत असत. त्यांनी कुत्र्यांना अफगाणी आणि इंग्रजी शिकारी कुत्र्यांचा मिलाफ करून निर्माण केले होते. त्यामुळे ‘रामपूर’ ही जात अधिक सक्षम, समजदार आणि शक्तीवान आहे. ४० कि.मी.च्या गतीने हे श्वान पळू शकतात. स्वातंत्र्यानंतर या जातीवर लक्ष न दिल्याने ती नष्ट होऊ लागली होती. कर्नाटकमधील बागलकोटचे नाव पूर्वी ‘मुधोळ’ होते. तेथील राजा मालोजीराजे घोरपडे यांनी आदिवासींजवळ या कुत्र्यांना पाहून त्यांची शक्ती आणि आकलनक्षमता ओळखली. त्यांनी इंग्लंडच्या राजाला भेट म्हणून हे श्वान दिले. महाराष्ट्रातही ही जात आढळते. आता भारतीय जातीच्या या शिकारी श्वानांचे हे प्रशिक्षण सिद्ध करत आहे की, भारतीय कमकुवत असल्याचा पूर्वग्रह न्यून केला जाऊ शकतो आणि अडचणींवर मात केली जाऊ शकते. उत्तरप्रदेशापासून दख्खनच्या पठारापर्यंत वावरणार्‍या या उत्साही आणि शक्तीवान जातीच्या श्वानांना आता भारतीय नावे दिली जात आहेत. रोगप्रतिकारकशक्ती, अनुकरणक्षमता ही या श्वानांची वैशिष्ट्ये आहेत आणि विदेशी श्वानांच्या तुलनेत अत्युत्तम प्रदर्शन करत ते आता देशांच्या सीमांचे रक्षण करत आहेत. ३१ ऑक्टोबरला सैनिकांच्या गटाने या स्वदेशी श्वानांसमवेत कवायत केली आणि भारताने आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल पुढे उचलल्याची निश्चिती झाली ! स्वदेशी परंपरांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलून त्यांना विकसित केले, तर काय चमत्कार होऊ शकतो, हे मोदी आणि सैनिक यांनी सिद्ध करून दाखवले आहे ! येणार्‍या काळात प्रत्येक क्षेत्र अशा आत्मनिर्भरतेने भरून जाईल, यात शंकाच नाही !

भारतीय परंपरांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलल्यास भारत लवकरच विश्वगुरु होईल !