UK Based Maulana Fraud : मदरशासाठी परदेशातून निधी गोळा करणार्‍या ब्रिटीश मौलानाविरुद्ध गुन्हा नोंद

आर्थिक गैरव्यवहार आणि परकीय चलनाचा गैरवापर केल्याचा आरोप

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना शमसुल हुडा खान

संत कबीरनगर (उत्तरप्रदेश) – येथे ब्रिटीश नागरिकत्व मिळवलेल्या मौलाना शमसुल हुडा खान याच्याविरुद्ध फसवणूक आणि परकीय चलनाचा गैरवापर केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही त्याने ‘उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण मंडळा’कडून वेतन घेतले आणि स्थानिक भूमीमध्ये मदरशाचे संचालन केले.

परदेशातून निधी गोळा करून दलाली (कमिशन) घेतल्याचा आरोप

मदरसा शिक्षण परिषदेच्या नोंदणी अधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी प्रवीण कुमार मिश्रा यांनी या संदर्भात तक्रार केली होती. तक्रारीनुसार खान विविध परदेशी संस्था आणि व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून मदरशांसाठी आर्थिक निधी गोळा करत होता अन् त्याचे वितरण स्वतःच्या माध्यमातून करत होता. या प्रक्रियेत तो स्वतःसाठी ठराविक दलाली (कमिशन) ठेवत असे.

स्वयंसेवी संस्था (एन्.जी.ओ.) आणि मदरसा यांच्या माध्यमातून इस्लामीकरणाचा प्रसार

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, मौलानाने ‘कुलियातुल बनातीर रजबिया एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘रझा फाऊंडेशन’ या २ संस्थांद्वारे, तसेच खलीलाबाद येथे स्थापन केलेल्या मदरशाच्या माध्यमातून परदेशातून निधी उभारला. चौकशीत असेही आढळले की, ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही तो वारंवार परदेशात प्रवास करत होता आणि भारतातील इस्लामीकरणाशी संबंधित हालचालींना चालना देत होता.

अन्वेषणानंतर संबंधित मदरसे आणि संस्था यांची मान्यता रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच विभागाने गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.