मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडी यांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ !

मुंबई – ‘फॅशन स्ट्रीट’ ते मुंबई महानगरपालिका असा मनसे आणि महाविकास आघाडी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या समोर व्यासपीठ उभारण्यात आले होते, तेथे सहभागी नेत्यांची भाषणे झाली. ‘जोपर्यंत मतदारसूचींमधील घोळ दुरुस्त होत नाही, तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी मोर्चाला संबोधित करतांना उद्धव ठाकरे यांनी ‘जनतेसाठी आम्ही भाऊ एकत्र आलो आहोत, आम्हाला साथ द्या’, असे आवाहन केले. त्यामुळे ‘एकप्रकारे मनसेसमवेत युतीची हीच घोषणा आहे’, असे म्हटले जात आहे. शेकडोंच्या संख्येने बोगस (खोट्या) मतदार सूची, बोगस (खोटे) इ.व्ही.एम्. आणि प्रतिकात्मक निवडणूक तिरडी येथे आणली होती.

दुबार (दोनदा नोंद असलेले) मतदार दिसले, तर बडवून काढा ! – राज ठाकरे, मनसे
घरांमध्ये जाऊन मतदार सूचीवर काम करा. चेहरे पहा आणि सूचीत दोनदा किंवा तीनवेळा मतदार दिसले, तर त्यांना तिथेच बडवून काढा. मतदार सूची स्वच्छ करा, पारदर्शक करा आणि मग निवडणुका होतील. पुरावे देऊनही न्यायालयाने सांगितले की, निवडणुका जानेवारीत घ्या. ५ वर्षे निवडणुका घेतल्या नाहीत, अजून १ वर्ष गेले, तर काय फरक पडणार आहे ? अशा निवडणुकांतून लोकशाही कशी टिकेल ?, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
या वेळी त्यांनी मुंबईतील विविध भाग, मावळ, पुणे, ठाणे मूळ मतदार आणि दुबार (दोनदा नोंद असलेले) मतदार यांची संख्या वाचून दाखवली. पुराव्याच्या कागदांचा ढीग त्यांनी मोर्चाच्या ठिकाणी आणला होता.
मतदारसूचीतील माणसे आपल्या घरात रहात आहेत कि नाही तपासा ! – उद्धव ठाकरे
लोकसभेच्या वेळी कोणत्या मतदारसंघाला लाभ झाला ? ते मुख्यमंत्री सांगणार होते. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी मतचोरी होते, हे मान्य केले आहे. निवडणूक आयुक्त त्यांचे नोकर झाले आहेत. ‘सक्षम’ नावाच्या ‘ॲप’वरून माझ्या नावाने खोटा अर्ज केला गेला आहे. त्या माध्यमातून मतदार सूचीतून माझ्या कुटुंबातील चौघांची नावे काढण्याचा हा प्रयत्न झाला का ? ते पहावे लागेल. कुणाचीही नावे मतदार सूचीत घेत आहेत. मतदारांना आवाहन करतो की, मतदारसूचीतील माणसे आपल्या घरात रहात आहेत कि नाही तपासा.
शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले, ‘‘आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चांची आठवण करून देणारा आहे. पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात.’’ काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ९ सहस्र ५०० बोगस मते आहेत. या संदर्भात तहसीलदारांनी उत्तर दिले की, हे दुरुस्त करण्याचा आम्हाला अधिकार नाही.
भाजपचा मूक मोर्चा
या मोर्चाच्या विरोधात भाजपने मूक मोर्चा आयोजित केला होता. ‘मतचोरी नाही, मती चोरी झाली आहे’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण त्या मोर्चात म्हणाले.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !