काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला बालरोगतज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांचा ‘ओ.आर्.एस्.’, म्हणजेच ‘ओरल रि-हायड्रेशन सोल्युशन’ याविषयीचा लढा वाचला असेल. ज्यांना याविषयी ठाऊक नाही त्यांच्यासाठी थोडक्यात येथे देत आहे.
डॉ. शिवरंजनी संतोष यांनी ‘ओ.आर्.एस्.एल्.’ आस्थापनांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणे आणि तो खटला जिंकणे
जुलाब, उलटी या आजारात भारतीय बाजारपेठांमध्ये विकले जाणारे ‘ओ.आर्.एस्.’ सगळ्यांना ठाऊक असेल. भारतात१ ते ५ वर्षांच्या मुलांमध्ये मृत्यूसाठी कारणीभूत प्रमुख कारणांमध्ये जुलाब झाल्याने पाण्याची कमतरता (डी-हायड्रेशन) होऊन मृत्यू हे तिसर्या क्रमांकाचे कारण आहे. हे होऊ नये; म्हणून सर्रास सरकारी रुग्णालयात वापरले जाणारे ‘ओ.आर्.एस्.’ हे त्यातील घटकांच्या प्रमाणात बनवून मग वापरले जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. एका लिटरमध्ये १३.५ ग्रॅम साखर अपेक्षित असतांना व्यावसायिक लाभासाठी आरोग्य वेठीला धरून आस्थापने ११० ते १३० ग्रॅम साखर घालून विकत असल्याने ती साखर आतड्यात पाणी खेचून घेऊन जुलाबाचे प्रमाण वाढवते. विविध आस्थापनांनी साखरयुक्त द्रव्यांवर ‘ओ.आर्.एस्.एल्.’ अशी किंचित् तफावत ठेवून ग्राहकांची दिशाभूल करून स्वतःच्या लाभासाठी विकणे, हा एक प्रकारचा समाज आरोग्याशी केलेला धोकाच आहे. याविरुद्ध गेली ८ वर्षे डॉ. शिवरंजनी यांनी न्यायालयीन लढा दिला आणि सर्व आस्थापनांना ‘ओ.आर्.एस्.’मधील घटक त्याच प्रमाणात विकले जाईल, अन्यथा ‘लेबल’ (वस्तूवरील चिठ्ठी) पालटावे, यासाठी सर्वाेच्च न्यायालयातून खटला जिंकला.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही एका आंतरराष्ट्रीय आस्थापनाला ‘ओ.आर्.एस्.एल्.’ विकण्याची अनुमती मिळणे
आता यात एक भाग असा हा आहे की, १७ ऑक्टोबरला एक घटना घडली. चुकीचे ‘लेबल’ लावून ‘ओ.आर्.एस्.एल्.’ विकणारी एक केंव्यु कंपनी आहे. भारतात ‘जे.एन्.टी.एल्. कंझ्युमर हेल्थ इंडिया’ नावाने ती कार्यरत आहे. ही ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चेच एक आस्थापन आहे. यांच्या ‘ओ.आर्.एस्.एल्.’ उत्पादनाला त्यांचा १५५ ते १८० कोटी एवढ्या रुपयांचा उरलेला माल विकायला अनुमती मिळाली आहे. यावर डॉ. शिवरंजनी यांनी सांगितले, ‘सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून कार्यवाही होत नाही, तोपर्यंत माझा लढा संपला नाही.’ यातून हेच दिसून येते की, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
आरोग्य क्षेत्रात नैतिक मूल्यांचे पालन होणे महत्त्वाचे !
आरोग्याच्या क्षेत्रात लोकांच्या हितापेक्षा जेव्हा लाभाला महत्त्व येत जाते, तेव्हा समाज आरोग्य सगळ्यात अधिक भरडले जाते आणि सध्या ‘फार्मा सेक्टर’मुळे (औषध निर्मिती क्षेत्रामुळे) सर्व ठिकाणी धंदा आणल्याने हे सर्वाधिक वेगाने घडत जात आहे. प्रचंड विज्ञापने, ‘मिडिया इन्फ्लुएन्स’ (माध्यमांचा प्रभाव), मोठी रुग्णालये उभारणे, त्यात स्वतःची यंत्रणा बसवणे आणि विविध छोट्या छोट्या आरोग्याच्या तक्रारींनी थकलेल्या जनतेची वाढलेली पैसे खर्चायची शक्ती यांमुळे आस्थापनांचे फावले आहे. ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ (पायाभूत सुविधा) वाढल्या की, नफेखोर लोकांचा हस्तक्षेप आणखी आणखी वाढत जाणार, हे नक्की !
काही दिवसांपूर्वी या सगळ्यांवर माझ्याशी बोलतांना अशाच कुठल्या तरी आस्थापनेत काम करणार्या एका उच्च पदाच्या शिकलेल्या व्यक्तीने ‘कंपन्यांनी वहात्या गंगेत हात धुवून घेतला, तर कुठे बिघडले ?…’, असे उद्गार काढले. ‘आरोग्य क्षेत्र वहात्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी वापरू नये’, असे माझे स्पष्ट मत आहे. डॉक्टर हे ‘नामांकित व्यवसाय क्षेत्र’ आहे आणि त्यातील सगळ्यांनी हे तत्त्व नक्कीच पाळले पाहिजे. दुसर्याच्या आयुष्याशी गाठ असतांना नैतिक मूल्ये अजिबात सोडू नये. नैतिकदृष्ट्या काम करून स्वतःला पुरून उरेल इतपत भरपूर मिळते. स्वतःच्या भौतिक गरजा भारंभार वाढवून ‘सगळे कमवतात, मग आम्ही का नाही ?’, असे म्हणत लोकांचे आरोग्य पणाला लावणे, यासारखे पाप नसेल.
यंत्रणा पालटण्याची आणि नैतिकदृष्ट्या चालणार्या आरोग्य तज्ञांकडे स्वतःचे आरोग्य सोपवण्याची आवश्यकता !
डॉ. शिवरंजनी यांसारख्या मूठभर तत्त्वनिष्ठ डॉक्टरांना याविरुद्ध लढा देऊन जिंकायला ८ वर्षे लागली, यातच सगळा भाग लक्षात येतो. यंत्रणा पालटायची, तर प्रत्येक माणूस पालटला पाहिजे, जे घडणे सध्या तर अशक्य, तर आपण रुग्ण म्हणून पालटायला हवे. जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेवून नैतिकदृष्ट्या चालणार्या आरोग्य तज्ञांकडे स्वतःचे आरोग्य सोपवणे, या सगळ्यांच्या प्रभावापासून दूर रहाणे अत्यंत आवश्यक आहे. आधीपासून स्वतःची तब्येत सांभाळणे, गरजेला आयुर्वेदाचीच कास धरणे या गोष्टी वाढत चाललेल्या आजारांना फार वाढू देणार नाहीत. प्रश्न हा पाश्चात्त्य औषधे कि आयुर्वेद, हा नसून बिघडलेल्या यंत्रणेपासून स्वतःला जपणे, हा आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या प्राथमिक आरोग्यासाठी हितकर आणि तोटा न करणारे असे काय आहे, हे निवडण्याचा आहे. मोठ्या धेंड्यांच्या पैशाच्या खेळात आपण दुसर्याच्या हातातील वैचारिक बाहुले होऊ नये, एवढीच काळजी सगळ्यांनी घ्यावी, असे वाटते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२७.१०.२०२५)


जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !