US Navy Aircrafts Crashed : दक्षिण चीन समुद्रात अर्ध्या घंट्याच्या अंतराने अमेरिकी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि विमान कोसळले !

बीजिंग (चीन) – अमेरिकेची २ विमाने अर्ध्या घंट्याच्या अंतराने दक्षिण चीन समुद्रात २६ ऑक्टोबर या दिवशी कोसळली. यामध्ये एक ‘एम्एच्-६० आर् सीहॉक’ हेलिकॉप्टर आणि दुसरे ‘एफ् / ए – १८ एफ् सुपर हॉर्नेट’ लढाऊ विमान होते. दोन्ही विमाने अमेरिकेच्या ‘यूएस्एस् निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौकेवरून नियमित मोहिमेवर निघाली होती. अपघातानंतर हेलिकॉप्टरमधील तिन्ही सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. या घटनेनंतर अवघ्या ३० मिनिटांनी ‘एफ् / ए – १८ एफ् सुपर हॉर्नेट’ हे लढाऊ विमानही कोसळले. या विमानाच्या वैमानिकालाही वेळीच बाहेर पडण्यात यश आले आणि त्याला सुरक्षित वाचवण्यात आले. नौदलाने दोन्ही घटनांची चौकशी चालू केली आहे.

भू-राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घटना

हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या सैनिकी हालचालींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोचला आहे. चीन या समुद्रातील मोठ्या भागावर स्वतःचा हक्क सांगतो, जो आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला आहे. अमेरिका या भागात नियमितपणे त्याच्या युद्धनौका आणि विमाने पाठवून चीनच्या हक्काला आव्हान देत असतो. ‘यूएस्एस् निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका १७ ऑक्टोबरला या समुद्रात पोचली होती.