साधकाने स्वतःच्या साधनेचा आलेख पाहून, गुरुदेवांवर अतूट श्रद्धा ठेवून आणि सतत कृतज्ञताभावात राहून सतत साधनेचे प्रयत्न वाढवणे अपेक्षित !

१. केवळ सनातन संस्थेमध्ये साधकांच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाते !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी (गुरुदेवांनी) साधकांना सांगितले आहे, ‘‘योग्य साधना केली, तर साधक प्रतिवर्षी १ – २ टक्के आध्यात्मिक प्रगती करू शकतो.’’ साधक पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करतो, तेव्हा त्याची मायेतील ओढ अनुमाने ५० टक्क्यांनी उणावलेली असल्याने त्याची आध्यात्मिक पातळी ५० टक्के असू शकते. त्यानंतर साधक १० ते २० वर्षे सतत साधना करत राहिला, तर तो ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ शकतो किंवा ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद गाठू शकतो. प्रत्यक्षात सर्व साधकांच्या संदर्भात असे होतांना दिसत नाही; कारण ‘प्रत्येक क्षणी योग्य साधना होईलच’, असे सांगता येत नाही आणि साधकाची स्थितीही सतत दोलायमान रहाते. साधकाचे अहंकारी मनच अधोगतीचे कारण असू शकते. हे मी स्वतः अनुभवले आहे.

पू. शिवाजी वटकर

गुरुकृपेने केवळ सनातन संस्थेमध्ये साधकांच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनामुळे साधकांना साधनेत प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून योग्य साधना करून घेतली जाते. साधकाची आध्यात्मिक प्रगती झाली नाही, तरी त्याने सतत गुरुचरणी श्रद्धा, कृतज्ञताभाव आणि शरणागतभावात रहावे. साधकाच्या साधनेच्या प्रगतीचा वर-खाली असलेला आलेख पाहून त्याला त्याच्या साधनेची स्थिती कळल्याबद्दल त्याने गुरुचरणी कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे. त्याने प्रगतीचा किंवा अधोगतीचा आलेख पाहून निराशेत किंवा विकल्पात न जाता गुरुदेवांवर अतूट श्रद्धा ठेवावी आणि सतत कृतज्ञताभावात राहून, त्यातून शिकून साधनेचे प्रयत्न वाढवणे अपेक्षित आहे. त्यामुळे साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. माझ्या साधनेच्या प्रवासातील चढ-उताराच्या परिस्थितीत गुरुदेवांच्या कृपेने मी हेच आचरणात आणत असून अनुभवतही आहे.

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.८.२०२५)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कृतज्ञताभावात रहाण्या चरणी द्यावा विसावा ।
वासना कारण असे मायेत अडकण्याचे ।
गुरुचरण (टीप) असे कारण भवबंधन सुटण्याचे ।। १ ।।

अहंकारी मन माझे कारण असे बंधनाचे ।
गुरुदेवांची कृपाच कारण असे मोक्षाचे ।। २ ।।

माझ्या अहंकारी मनाचे संकल्प-विकल्प जावो ।
गुरुदेवांच्या चरणी केवळ श्रद्धा अन् भावभक्ती वाढो ।। ३ ।।

आता नाही आस माझ्या प्रगतीची अन् मोक्षाची ।
प्रार्थना करतो, केवळ गुरुचरणांची धूळ होण्याची ।। ४ ।।

विनवणी असे केवळ गुरुचरणी शरणागत होण्याची ।
प्रार्थना करतो गुरुचरणी कृतज्ञताभावात रहाण्याची ।। ५ ।।

शरण आलो मी आपल्या चरणी गुरुदेवा ।
कृतज्ञताभावात रहाण्या चरणी द्यावा विसावा ।। ६ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी

– (पू.) शिवाजी वटकर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक