
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाची पूर्वसूचना मिळणे
‘७.१.२०२५ या दिवशी मी झोपेतून जागी होत असतांना मला सूक्ष्मातून एक विशाल मैदान दिसले. त्या मैदानात मला पांढरी वस्त्रे आणि केशरी रंगाचा फेटा परिधान केलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. ते मैदानात उभे होते. तेव्हा ते इतके विशाल दिसत होते की, त्यांच्या दोन पावलांनी संपूर्ण मैदान व्यापले होते आणि त्यांचे मस्तक उंच आकाशात होते. त्यांचे ते दिव्य स्वरूप पहाण्यासाठी आकाशात यक्ष, गंधर्व आणि किन्नर यांसह अनेक देवीदेवता अन् ऋषीमुनी जमले होते. काही ऋषींनी सामवेदाचे गायन केले. तेव्हा यक्ष, गंधर्व आणि किन्नर यांसह अनेक देवीदेवता अन् ऋषिमुनी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा होणार असून त्याला सहस्रो हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती असेल’, अशी आकाशवाणी मला सूक्ष्मातून ऐकू आली. त्यानंतर ‘मला स्वप्नात दिसलेले मैदान हे गोव्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘इन्फिनिटी’ नावाचे मैदान आहे’, हे समजले. ‘इन्फिनिटी’चा मराठीत अर्थ ‘अनंत’ असा होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील कार्य अत्यंत भव्य, दिव्य अन् अवतारी असून ते अनंत काळापर्यंत टिकणारे आहे. यावरून ‘त्यांना श्रीविष्णूचे ‘अनंत’ हे नाव किती साजेसे आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
२. साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाविषयी निरोप मिळाल्यावर पशू-पक्षी, निसर्ग आणि देवता यांनी सोहळ्याची पूर्वसिद्धता चालू केल्याचे जाणवणे
१२.२.२०२५ या दिवशी आम्हा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याविषयी निरोप मिळाला. त्या वेळी मला जाणवले, ‘रामनाथी आश्रमाच्या परिसरातील पशू-पक्ष्यांची वाणी सुमधुर झाली आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या सेवेत कोण कोण सहभागी होणार ? हा जन्मोत्सव ३ दिवस नक्की पहायचा’, अशी चर्चा ते आपापसांत करत आहेत. आकाशात निरनिराळ्या रंगांच्या छटा दिसून ढगही निराळ्याच सुबक आकारात आकाशात जमले आहेत. तेव्हा मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाची सिद्धता करण्यासाठी केवळ देवशिल्पी विश्वकर्माचे सैन्य उतरले नसून त्याच्यासह संपूर्ण देवलोकच पृथ्वीवर अवतरला आहे. पृथ्वीवर देवलोकाचे वायूमंडल निर्माण झाल्याने आकाशात विविध रंगांची छटा दिसत आहे. यावरून संपूर्ण निसर्ग आणि भूमाता ‘न भूतो न भविष्यति’, असा जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहाण्यासाठी आतुर झाली आहे.’
३. साधिकेवर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे करणे; परंतु कार्यक्रमाच्या ओळखपत्राने तिचे रक्षण करणे

१५.५.२०२५ या दिवशी मी सायंकाळी मैदानाची पहाणी करून आल्यावर रात्री माझी मान कुणीतरी पंजाने घट्ट धरल्याचे मला जाणवले. ती नखे माझ्या मानेत घुसल्याने माझ्या मानेवर ओरखडे येऊन माझी मान सुजली होती. असाच त्रास मला १७.५.२०२५ या दिवशी रात्री झोपल्यावर होऊ लागला. तेव्हा ‘कुणीतरी माझे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले. सकाळी उठून पाहिल्यावर मला दिसले की, कार्यक्रमाचे ओळखपत्र माझ्या डोक्याशी होते.
त्यानंतर १८.५.२०२५ या दिवशी मी कार्यक्रम पाहून झाल्यावर माझ्या गळ्यातील सुस्थितीतील हार तुटून पडला, तसेच रात्री झोपल्यावर माझ्या डाव्या हातावर व्रण उमटले. तेव्हा ‘वाईट शक्तीने मला बोचकारले’, असे मला जाणवले. माझ्या अंथरुणावर कार्यक्रमाचे केशरी रिबनमध्ये गुंफलेले ओळखपत्र होते आणि ‘त्या ओळखपत्रातून केशरी रंगाचा प्रकाश माझ्या दिशेने प्रक्षेपित होत असून वाईट शक्तींपासून तो माझे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यक्रमाच्या ओळखपत्रातही किती चैतन्य आहे !’, हे मला प्रकर्षाने अनुभवण्यास मिळाले.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सौदामिनी (विद्युत्) शक्तीने श्री भूदेवीचे वाईट शक्तींपासून रक्षण करणे
१७.५.२०२५ या दिवशी कार्यक्रमस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व्यासपिठावर शुभागमन होताच आकाशात जोराने वीज कडाडली. तेव्हा अवतारांच्या हातातील सौदामिनी (विद्युत् शक्ती) कार्यरत झाल्याचे जाणवले. २१.५.२०२५ या दिवशी कार्यक्रमस्थळी शतचंडी याग झाल्यावर पूर्णाहुतीनंतर काही क्षणांनी पुन्हा जोराने वीज कडाडली. तेव्हा ‘श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सौदामिनीशक्ती पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून पाताळातील वाईट शक्तींवर जोराने कडाडत आहे आणि त्यांना भयकंपित करून पृथ्वीपासून दूर पळवून श्री भूदेवीचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले.
५. ‘श्री दुर्गादेवी मारक रूपात जन्मोत्सवाच्या मैदानात उभी आहे’, असे जाणवणे आणि महोत्सवानंतर शतचंडी याग होणार असल्याचे नंतर समजणे
‘हा कार्यक्रम पृथ्वीवर होत नसून वैकुंठात श्रीविष्णूचा ब्रह्मोत्सव चालू आहे’, असे जाणवून मला क्षणोक्षणी दिव्यत्वाची अनुभूती येत होती. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत आरंभी शतचंडी यागाचा उल्लेख नव्हता, तरीही मला जाणवत होते, ‘श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या मैदानावर कार्यरत आहे.’ ‘जन्मोत्सवाशी निगडित सेवा करणार्या साधकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे करणार्या वाईट शक्तींचा नायनाट करण्यासाठी श्री दुर्गादेवी मारक रूपात जन्मोत्सवाच्या मैदानात उभी आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसत होते. त्यानंतर कार्यक्रमाच्या पूर्वी मला समजले की, कार्यक्रमानंतर १ – २ दिवस श्री शतचंडी याग होणार आहे. यावरून मला ‘श्री आदिशक्ती श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात कशी सहभागी आहे !’, याची दिव्य अनुभूती आली.
६. हनुमानाने वाईट शक्तींवर गदेने तीव्र प्रहार करून साधकांचे रक्षण करणे
‘श्री हनुमानही साधकांच्या संरक्षणासाठी गदा घेऊन मारक पवित्र्यात विराट स्वरूपात मैदानाच्या मध्यभागी उभा आहे’, असे मला जाणवले. हनुमानाने दशदिशांनी मैदानावर सूक्ष्मातून आक्रमण करणार्या वाईट शक्तींवर गदेने तीव्र प्रहार करून अनेक वाईट शक्तींना यमसदनी धाडले, तर मोठ्याने हुंकार करून अनेक वाईट शक्तींना पिटाळून लावले.
७. दैवी शक्ती, अवतारी शक्ती आणि सप्तर्षी यांचे सामर्थ्य दर्शवणार्या आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव पूर्वनिर्धारित होता. पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे २२.४.२०२५ या दिवशी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यामुळे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भारतात सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु नाडीपट्टीत सप्तर्षींनी उल्लेख केला होता, ‘कुणीही घाबरून जाऊ नये. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव थाटात साजरा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांना दिलेल्या जन्मोत्सवाच्या सेवा चालू ठेवाव्यात.’ १०.४.२०२५ या दिवशी दोन्ही देशांनी युद्ध थांबवले.
‘बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्यामुळे गोव्यात मुसळधार पाऊस पडेल’, अशी शक्यता कार्यक्रमापूर्वी २ दिवस हवामान खात्याने वर्तवली असूनही जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपल्यावर २०.५.२०२५ पासून मुसळधार पावसाला आरंभ झाला. या दोन्ही घटनांवरून लक्षात येते, ‘भारत-पाकिस्तान युद्ध असो किंवा पंचमहाभूतांचा प्रकोप असो, या सर्वांवर दैवी शक्ती, अवतारी शक्ती आणि सप्तर्षी यांचे नियंत्रण असून मनुष्य त्यांच्या हातातील कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे आहे.’ ‘देवाच्या कृपेने मला दैवी शक्ती, अवतारी शक्ती आणि सप्तर्षी यांचे सामर्थ्य दर्शवणार्या अनुभूती आल्या’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या संदर्भात मला या दिव्य अनुभूती आल्या’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे कमलपुष्प अर्पण करते.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२५)
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !