‘दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम, म्हणजे ‘अर्गोनॉमिक्स’. कोणतेही नियम पाळायचे म्हटले की, कठीण वाटते. ‘आयुष्यभर आम्ही हवी तशी उठ-बस करत आलो आहोत. मग ‘भ्रमणभाष कसा धरावा ? कसे बसावे ? कसे झोपावे ?’, इत्यादी नियमांची काय आवश्यकता आहे ?’, असे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. प्रत्यक्षात ‘चुकीच्या पद्धतीने कामे केल्यामुळे आपल्या शरिराला काय काय भोगावे लागते ? आपले स्वास्थ्य किती पटींनी खालावते ?’, याची कल्पना अत्यल्प लोकांना असते. ‘अर्गोनॉमिक्स’ हा आपल्या प्रतिदिनच्या हालचालींचा अविभाज्य भाग का आहे ? ते नियम सोप्या पद्धतीने कसे पाळायचे ?’, हे आपण या लेखमालेतून जाणून घेणार आहोत.
(भाग १)

१. सर्वच स्थितींमध्ये शारीरिक समतोल साधण्यासाठी शरिराची ठेवण योग्य असणे आवश्यक !
मनुष्यजन्म दुर्मिळ असून तो ८४ लाख योनींनंतर मिळतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत आपल्याला बुद्धीमत्ता, कला, भावना इत्यादी गुण मिळाले आहेत. या व्यतिरिक्त आपल्या देहात काय वेगळेपण असते ? तर आपल्या शारीरिक जडणघडणीमुळे आपण २ पायांवर उभे राहून तोल सावरून चालू शकतो; पण हे कसे शक्य होते ? मनुष्यात ताठ उभे रहाण्याइतकी शक्ती कशी येते ? चला जाणून घेऊया.
एक लाकडी ओंडका भूमीवर उभा केला आणि तो पडू नये; म्हणून ३ बाजूंनी दोर्यांनी बांधला. ओंडका सरळ उभा असल्यामुळे दोर्यांवरील ताण अत्यल्प असतो; कारण गुरुत्वाकर्षण ओंडक्यावर मधोमध कार्य करत असल्यामुळे ओंडका संतुलित रहातो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ताठ उभे रहातो, तेव्हा शरिरातील पुढचे, मागचे किंवा आजूबाजूचे स्नायू संतुलित रहातात. शरिराच्या सरळ आणि योग्य ठेवणीमुळे सर्व स्नायूंना अत्यल्प शक्ती व्यय करून तोल सावरता येतो. (चित्र क्र. १ पहा.)

आपण उभा केलेला ओंडका एका बाजूला कलला, तर काही दोर्यांवर निश्चितच अधिक ताण येणार. त्याचप्रमाणे आपल्या शरिराची ठेवण थोडी जरी बिघडली, म्हणजे पूर्ण शरीर किंवा शरिराचा एखादा भाग जर पुढे, मागे किंवा एका बाजूला झुकला, तर गुरुत्वाकर्षणाची दिशा पालटल्याने शरीर, स्नायू आणि सांधे यांचा समतोल बिघडतो. यावरून लक्षात येते की, ‘दोन पायांवर चालणे’, ही जादू नसून शरिराच्या ठेवणीची किमया आहे. त्यामुळे सर्वच स्थितींमध्ये शारीरिक समतोल राखण्यासाठी शरिराची ठेवण योग्य असणे अत्यंत आवश्यक असते. (चित्र क्र. २ पहा.)
२. ‘शरिराची ठेवण सुधारणे किंवा बिघडवणे’, हे आपल्याच हातात असणे

मनुष्य जिवंत असेपर्यंत त्याचे शरीर कुंभाराच्या चाकावरील मातीच्या मडक्याप्रमाणे असते. त्याला जसे वळण दिले जाते, तसे ते वळण घेत जाते. वयोमानानुसार आकार पालटण्याचा कालावधी निरनिराळा असू शकतो; पण वयोवृद्ध व्यक्ती वगळता शरिराची ठेवण सुधारणे किंवा बिघडवणे हे पूर्णपणे आपल्याच हातात असते. शरिरातील प्रत्येक पेशीत प्रत्येक क्षणी पालट होत असतो. ‘हा पालट चांगला किंवा वाईट असणे’, हे आपल्या सवयींवर अवलंबून असते. स्नायूंच्या संदर्भात पहायचे झाले, तर आपण दिवसभरात ज्या हालचाली अधिक करतो किंवा ज्या स्थितीत अधिक असतो, त्याचे परिणाम शरिरावर होतात. कालांतराने त्यानुसार शरिराची ठेवण होऊ लागते आणि ती पालटण्यासाठी तितकाच कालावधी लागतो.
३. आधुनिक आणि बैठ्या जीवनशैलीमुळे शरिराची योग्य ठेवण राखून कामे करण्याची (‘अर्गोनॉमिक्स’ची) आवश्यकता असणे
पूर्वीच्या काळी कधी कुणी ‘अर्गोनॉमिक्स’ हे नावही ऐकले नसावे. त्या वेळी त्यांना त्याची आवश्यकताच भासली नसावी. पूर्वी महिला नदीकाठी कपडे धुतांना कपडे वर उचलून आपटत असत. यामध्ये खांदे आणि पाठ यांची वर-खाली हालचाल होत असे. दळण दळतांना खांदे, तसेच शरीर पुढे-मागे होत असे, तसेच वर-खाली असलेल्या खडकाळ भूमीवर चालतांना पायांच्या लहानसहान सांध्यांनाही चालना मिळत असे. पुरुष बाहेरून लाकडे तोडून आणत असत. त्यामध्ये खांदे आणि पाठ यांची वर-खाली अन् पुढे-मागे हालचाल होत असे. नांगरण्यासाठी बैल हाकणे, शेतात आलेले प्राणी हाकलणे इत्यादी करतांना त्यांची चांगलीच शारीरिक कसरत आणि सर्व सांध्यांची सर्व दिशांनी हालचाल होत असे.
इंग्रजांनी भारतात पटल-आसंदीवर बसून कामे करण्याची पद्धत (clerical job) आणली. गेल्या काही दशकांत आपले राहणीमान बरेच पालटले आहे. आपण बहुतेक कृती शरिराच्या पुढच्या दिशेने करतो, उदा. संगणक हाताळणे, स्वयंपाक बनवणे, कारखान्यात यंत्रे हाताळणे इत्यादी. या सर्वांमध्ये एक तर पुढच्या दिशेने परत परत कृती कराव्या लागतात किंवा सतत एकाच स्थितीत बसावे किंवा उभे रहावे लागते. यामुळे कालांतराने एकाच बाजूच्या स्नायूंवर ताण पडून आपली शारीरिक ठेवणच बिघडते. आपले राहणीमान बरेच इंग्रजाळलेले असले, तरी ते लगेच पालटणे कठीण आहे. आपण ॲलोपॅथीची एक गोळी घेतली की, तिचे दुष्परिणाम निस्तरायला दुसरी गोळी घ्यावीच लागते, त्याप्रमाणे आताच्या राहणीमानामुळे होणारी शारीरिक हानी टाळण्यासाठी ‘अर्गोनॉमिक्स’ पाळण्याविना पर्याय नाही.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (१६.१०.२०२५)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/971418.html
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !