अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युद्धसंघर्षाचा भडका उडाला असून येणार्या काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोन्ही देशांमधील संबंधांना, तसेच अफगाणिस्तानात शासन प्रस्थापित करणार्या तालिबानशी पाकिस्तानच्या संबंधांना प्रदीर्घ इतिहास आहे; परंतु अलीकडील काळात या संबंधांमध्ये घनिष्ट संबंधांचे पर्व संपून कटुता, वितुष्ट आणि आता तर थेट शत्रुत्व निर्माण झाल्याचे दिसत आहे. तथापि ताज्या संघर्षास कारणीभूत ठरला आहे तो पाकिस्तान ! अफगाणिस्तानात अलीकडेच पाकिस्तानने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये (हवाई आक्रमणामध्ये) ५० हून अधिक निष्पाप महिला आणि बालके यांचा मृत्यू झाला. या आक्रमणानंतर चिडलेल्या तालिबानने पाकिस्तानला कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांना विभागणार्या ‘ड्युरंड’ रेषेवर असणार्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर तालिबानने केलेल्या बाँब आक्रमणांमध्ये ६० हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी दुसर्यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. यापूर्वी वर्ष १९९६ ते वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. वर्ष २०२१ नंतर पहिल्यांदा तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये इतका मोठा संघर्ष उफाळून आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जोरदार बाँब आक्रमणे, आर्टिलरींचा वापर केला जात असून सद्यःस्थिती पहाता लवकरच हा संघर्ष पूर्ण युद्धामध्ये रूपांतरित होण्याचे संकेत मिळत आहेत.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.

१. सध्याचा पाकिस्तान विघटन, अंतर्गत बंडाळी आणि भिकेकंगाल होण्याच्या मार्गावर
भारतापासून विभक्त होत पाकिस्तानची निर्मिती झाली असली, तरी आज भारत जगातील तिसर्या क्रमांकाची महासत्ता बनण्याच्या दिशेने जात आहे, तर पाकिस्तान भिकेकंगाल बनून जगभरात हातात कटोरा घेऊन आर्थिक साहाय्याची भीक मागत आहे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान आज विघटनाच्या मार्गावर आहे, तरीही पाकिस्तान ‘आमच्या देशात सारे काही आलबेल आहे’, असे जगाला सांगत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यासह मेजवानी घेतल्यानंतर जग जिंकल्याच्या आविर्भावात भारतावर डोळे वटारत असले, तरी हा देश अंतर्गत असंतोषाच्या एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये विभक्त होण्यासाठीची नागरी चळवळ आता निर्णायक स्तरावर पोचली आहे. ‘बलुच लिबरेशन आर्मी’कडून पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड मोठी आक्रमणे केली जात आहेत. गिलगिट – बाल्टिस्तानमधील नागरिक पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्या दंडेलशाहीला अन् चीनच्या वाढत्या प्रभावाला विरोध करण्यासाठी पेटून उठलेले आहेत.

२. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अन् तालिबानचा जन्म
सध्याचा संघर्ष खैबर पख्तुनवा भागात पेटलेला आहे. हा भाग अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील प्रांत आहे. या भागात प्रामुख्याने पख्तुन लोकांचे वर्चस्व आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये वर्ष १८९३ मध्ये ‘ड्युरंड रेषा’ ब्रिटिशांनी आखलेली होती. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि त्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाला प्रारंभ झाला. याचे कारण अफगाणिस्तानला ही ‘ड्युरंड रेषा’ मान्य नाही. त्यांच्या मते पाकिस्तानातील इस्लामाबादपर्यंतचा भाग हा प्रामुख्याने अफगाणिस्तानचा आहे. अफगाणिस्तानात अनेक टोळ्या आहेत. या टोळ्यांचे अस्तित्व खैबर पख्तुनवा भागात आहे. त्यामुळेच ते सातत्याने दावा करत आहेत की, हा संपूर्ण प्रदेश आमचा आहे. पाकिस्तानमधील लष्करी हुकूमशाह असोत किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे असोत, त्या सर्वांनी अफगाणिस्तानमध्ये स्वमर्जीतील सरकार प्रस्थापित करण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न केले. यामागचे कारण दोन्ही देशांतील सीमावाद भडकू नये, अशी या राज्यकर्त्यांची इच्छा होती.
विशेष म्हणजे तालिबान या संघटनेचा उदय पाकिस्तानच्या कुशीतूनच झालेला आहे. पाकिस्तानने अल् कायदाच्या साहाय्याने तालिबानला जन्माला घातले. ‘तालिबानी संघटनेच्या माध्यमातून आतंकवाद्यांची, योद्ध्यांची एक मोठी फौज सिद्ध करावी आणि तिचा वापर भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी करावा’, असा पाकिस्तानचा कुटील डाव होता; मात्र बिल क्लिंटन यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य करून पाकिस्तानला खडसावले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘तुम्ही ज्या सापांना दूध पाजत आहात आणि तुमची अपेक्षा आहे की, ते साप शत्रूंना चावावेत; पण असे कधीही घडत नाही. साप हा साप असतो. तो कुणालाही चावू शकतो. उद्या तो तुम्हालाही चावायला कमी करणार नाही.’ हिलरी यांनी दिलेल्या चेतावणीकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले; पण आज हाच साप पाकिस्तानला डंख मारत आहे. वास्तविक अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे फिरल्यानंतर पाकिस्तानच्या साहाय्यानेच तेथे तालिबानचे शासन प्रस्थापित झाले; पण आज याच तालिबानने पाकिस्तानविरुद्ध शस्त्र उगारले आहे. दोन्ही देशांमध्ये अघोषित युद्ध पेटलेले आहे. सुन्नी पंथाच्या दोन देशांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष पहिल्यांदाच पेटलेला आहे.
३. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेण्यामागील प्रमुख भूमिका
अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांशी त्यांची चर्चा-वार्तालाप चालू असतांनाच तिकडे पाकिस्तानने ‘एअर स्ट्राईक’ घडवून आणला. यामागचा अर्थ काय ? तालिबानने पहिल्यांदा जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता, तेव्हा भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी हिंसाचाराने परमोच्च बिंदू गाठला होता. जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांना तालिबानचा पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानशी सर्व संबंध तोडले होते; परंतु वर्ष २०२१ नंतर अफगाणिस्तानात दुसर्यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले, त्या वेळी परिस्थिती पालटलेली दिसून आली. यामागचे कारण, म्हणजे भारताने अफगाणिस्तानात विकास प्रकल्पांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हे विकासात्मक प्रकल्प पुढे चालू रहावेत, तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये, ही यामागची प्रमुख भूमिका होती. अमीर खान मुत्ताकी भारतामध्ये आले, तेव्हा त्यांनी स्पष्टपणाने सांगितले, ‘जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर पाय ठेवू दिलेला नाही.’ हे भारतासाठी पुष्कळ मोठे दिलासादायक आहे.
४. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर येण्यामागील कारणमीमांसा
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतभेटीवर येण्यामागे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारा ‘बगराम एअरबेस’ आम्हाला परत द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा’, अशी उघड धमकी अलीकडेच दिली आहे. बगराम विमानतळाची उभारणी सोव्हिएत महासंघाने केलेली होती. अफगाणिस्तानला मध्य आणि पश्चिम आशियासाठी ‘फ्लड गेट’ (नियंत्रक दार) मानले जाते. याचे कारण अफगाणिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास एकाच वेळी कझाकिस्तान, उजबेकिस्तान, कैरेगिस्तान, म्हणजेच मध्य आशियावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. त्याचप्रमाणे पश्चिम आशियातील सर्व अरब देशांवर नियंत्रण ठेवता येते. इतकेच नव्हे, तर चीनचा शिनशियांग प्रांत आणि रशिया यांच्यावरही नजर ठेवता येते. यामुळेच अफगाणिस्तानला कह्यात घेण्यासाठी रशिया, इंग्लंड आणि अमेरिका या जागतिक महासत्तांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण कुणालाही यामध्ये यश आले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला ‘जगाचे थडगे’ म्हटले जाते. अफगाणिस्तान जिंकणे अत्यंत अवघड आहे. अशा स्थितीत आता ट्रम्प महाशय बगराम विमानतळ कह्यात घेण्याची गर्जना करत आहेत.
‘बगराम एअरबेस’ हा संरक्षण कार्यासाठी वापरल्या जाणार्या जगातील सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. अफगाणिस्तानात स्वतःचे सैन्य घुसवल्यानंतर अमेरिकेने २० वर्षांत या ‘बगराम एअरबेस’चे रूपांतर एका शहरात केलेले आहे. तेथे ‘मॅकडॉनल्ड’सारख्या मोठमोठ्या ब्रँडस्ची उपाहारगृहे आहेत; परंतु जो बायडेन यांनी ‘बगराम एअरबेस’ रिकामा करण्याचा निर्णय घेतला आणि तो तालिबानच्या कह्यात गेला. आता डॉनल्ड ट्रम्प यांना यावर पुन्हा एकदा नियंत्रण हवे आहे. यामागचे कारण बगरामच्या माध्यमातून त्यांना रशिया आणि पाकिस्तान यांवर नियंत्रण ठेवायचे आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानला मांडीवर घेतल्याचे दिसून आले. अन्यथा मागील दशकभराच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानपासून पूर्णपणे फारकत घेतल्याचे दिसत होते; पण आता पाकिस्तानचे लष्करशाह, पंतप्रधान हे थेट ‘व्हाईट हाऊस’मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह मेजवानी घेतांना दिसत आहेत. मागील मासात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी ३ वेळा अमेरिकेला भेटी दिल्या. आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानला विश्वासघातकी म्हणणार्या ट्रम्प यांच्या या ‘यू टर्न’चा (अचानक पालटलेली भूमिका) अर्थ प्रारंभीला अनेकांच्या लक्षात आला नाही; पण बगरामचे सूत्र उपस्थित केल्यानंतर अमेरिका-पाकिस्तान जवळीकीचे कारण समोर आले. बगरामविषयी तालिबानची मनधरणी करण्याचे दायित्व फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना देण्यात आले; पण तालिबानने यास पूर्णपणे नकार दिला. ‘आम्ही एक इंचही जमीन अमेरिकेला देणार नाही’, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे भारताने अमेरिकेच्या विरोधात जाऊन तालिबानच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्वप्न भंगणार आहे. अशा वेळी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर येतात आणि ‘बगराम एअरबेस’वर भारताने उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त करतात, हे पुष्कळ मोठे आहे.
५. भारताकडून अफगाणच्या माध्यमातून पाकला काटशह आणि अमेरिकेला कडक चेतावणी !
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतांनाच्या काळात, म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये एक सामरिक भागीदारीचा करार करण्यात आला होता. त्या करारानुसार अफगाणिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैनिक अफगाणिस्तानात जाऊ शकतात, असे निर्धारित करण्यात आले होते; मात्र वर्ष २०२१ मध्ये तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर भारताने हा करार रहित केला होता. तथापि आता भारताचा तालिबानकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटलेला आहे. काबुलमधील भारतीय दूतावास पुन्हा चालू होणार आहे. कदाचित् वर्ष २०१८ चा करारही पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या माध्यमातून अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्य, वायूदल पुन्हा अफगाणिस्तानात जाऊ शकतात, तसेच ‘बगराम एअरबेस’वर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी पुष्कळ मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन िसंदूर, भाग दुसरा’ म्हणता येईल. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये २६ निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या केली आणि आजवर सहस्रो आतंकवादी आक्रमणे करून भारताला रक्तबंबाळ केले, त्या पाकिस्तानच्या विरोधात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या युद्धशास्त्रातील सुप्रसिद्ध सिद्धांताच्या आधारे भारत एक मोठी खेळी आखण्याच्या सिद्धतेत असल्याची चर्चा आहे. पूर्वेकडील संघर्षाचा सामना करतांना जराजर्जर झालेल्या पाकिस्तानला आता पश्चिमेकडील सीमेवर अफगाणिस्तानचे आव्हान भेडसावणार आहे. पुढील काळात पाकिस्तानचे तुकडे पडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
भारत – अफगाणिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक काळापासून चालत आलेले आहेत. मध्यंतरी तालिबानच्या काळात यामध्ये व्यत्यय आला होता; पण अफगाणी लोकांशी भारतियांचे भावनिक बंध जुळलेले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान सातत्याने भारताकडे साहाय्यासाठी धावून येतो. वर्ष २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर संपूर्ण जगाने या देशाकडे पाठ फिरवली होती. परिणामी या देशातील नागरिकांवर उपासमारीचे संकट आले. त्या वेळी भारताने मानवतेच्या भूमिकेतून १० लाख टन गहू देऊन स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. आता त्याच अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला काटशह देण्याची सिद्धता करत आहे. भारत-अफगाणिस्तान यांच्यातील वाढते संबंध ही डॉनल्ड ट्रम्प यांनाही कडक चेतावणी आहे. (१७.१०.२०२५)
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !