हनुमंत, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांना प्रार्थना केल्यावर पंढरपूर येथील श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना आलेल्या अनुभूती

१. हनुमंत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सोलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करणे

‘एक दिवस मी सकाळी स्नानानंतर नामजप करत होतो. तेव्हा माझ्याकडून हनुमंत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना अंतर्मनातून प्रार्थना झाली, ‘सोलापूर जिल्ह्यात ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव आहे. त्या सर्व ठिकाणी मी प्रसारासाठी जाऊ शकत नाही.

श्री. अप्पासाहेब सांगोलकर

तेथील सर्व साधकांना आनंद मिळू दे आणि गुरुपौर्णिमा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे. गुरुपौर्णिमेला समाजातील व्यक्तींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभू दे.’ माझी प्रार्थना पूर्ण होताच क्षणी हनुमंताने मला त्याच्या समवेत आकाशमार्गे नेले आणि सोलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सव असलेल्या पाचही ठिकाणी पांढर्‍या फुलांचा वर्षाव केला. तेव्हा ‘पाचही ठिकाणी गुरुपौर्णिमेला उत्तम प्रतिसाद मिळणार आहे’, असे मला जाणवले. ‘गुरुकृपेने मला ही अनुभूती आली’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.

२. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांचे स्मरण करून त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे होणारे वारकर्‍यांचे महाअधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करणे

६.७.२०२५ या दिवशी आषाढी एकादशी होती. त्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मी नामस्मरण करत होतो. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांचे स्मरण करून मी त्यांना प्रार्थना केली, ‘आज आषाढी एकादशी आहे. आज पंढरपूर येथे वारकर्‍यांचे महाअधिवेशन आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे. आम्हा साधकांचे रक्षण होऊ दे. मोठ्या संख्येने कीर्तनकार आणि वारकरी यांची उपस्थिती लाभू दे.’ त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या कृपेमुळे अधिवेशन अत्यंत आनंदात पार पडले.

२ अ. उपस्थित सर्वांना आनंद होणे आणि त्यांना वेळेचे भान न रहाणे अन् अधिवेशन दुपारी ४.१५ वाजेपर्यंत चालू रहाणे : अधिवेशनाची वेळ दुपारी १ ते ३.३० अशी होती. अधिवेशनात उपस्थित सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला. सर्व जण सकारात्मक होते. त्यांना वेळेचे भान राहिले नाही. अधिवेशन दुपारी ३.३० ऐवजी ४.१५ वाजेपर्यंत चालू होते. हे केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांच्या कृपेमुळे झाले. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. आप्पासाहेब सांगोलकर (वय ६६ वर्षे), पंढरपूर (६.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक