Ayodhya Deepotsav : श्रीराममंदिराचा ७० एकर परिसर दीड लाख दिव्यांनी उजळणार !

  • यंदाचा दीपोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरणार !

  • ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’चे पथक पोचले रामनगरीत !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – यंदाचा दीपोत्सव अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने यंदा दीपोत्सवाला पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि विस्तृत रूप देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रथमच श्रीराममंदिराचा संपूर्ण ७० एकर भव्य  परिसर प्रकाशमय होईल. १९ ऑक्टोबरला दुपारी ५.३० वाजता मंदिराभोवती चारही दिशांना पसरलेल्या अनुमाने ४ किलोमीटर क्षेत्रात दीड लाख दिव्यांचा लखलखाट दिसेल.  मंदिर बांधकामाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. अनेक नव्या उपक्रमांचेही काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दीपोत्सवाचा विस्तार करण्याचे ठरवण्यात आले आहे. श्रीराममंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी नुकतीच बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विविध सेवांचे वाटप केले.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’चे पथक अयोध्येत !

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या ३० जणांच्या पथकाचे नुकतेच अयोध्येत आगमन झाले. या पथकाचे सल्लागार निश्चल बरोट यांनी सांगितले की, यंदा दोन विश्वविक्रम प्रस्थापित होतील. नव्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात असून प्रत्येकाला वेगवेगळ्या घाटांचे दायित्व देण्यात आले आहे.

१ सहस्र १०० स्वदेशी ड्रोनद्वारे आकाशात रामकथा !

राम की पैडीसहित ५६ घाटांवर प्रज्वलित होणार्‍या अनुमाने २६ लाख दिव्यांचा प्रकाश भक्तीभाव आणि आनंद यांचे प्रतीक ठरेल. संगीतबद्ध ‘ड्रोन शो’ आणि त्रिमितीय लेझर-संगीत प्रस्तुत करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाने हा ड्रोन आणि लेझर शो १८ आणि १९ ऑक्टोबर या दोन दिवशी सर्वांसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ सहस्र १०० स्वदेशी ड्रोनद्वारे आकाशात रामायणातील विविध प्रसंगांची झलक दाखवण्यात येणार आहे.