आरोग्यासाठी संतुलित आहारासह संतुलित मन महत्त्वाचे !

निरोगी जीवनासाठी व्यायाम लेखांक क्रमांक ९१

‘आपण नेहमी ऐकतो की, शरिराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळण्यासाठी संतुलित आहार घ्यावा लागतो. त्यामुळे अनेकांना वाटते, ‘अमुक एक पदार्थ खाल्ल्याने शरिराला अमुक पोषक द्रव्ये मिळतील.’ ती पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. ‘काही पोषक द्रव्ये केवळ प्राणीजन्य आहारातून मिळतात’, अशी समजूत असल्याने अनेक शाकाहारी व्यक्ती प्राणीजन्य आहाराकडे वळतांना दिसतात; परंतु अजूनही अनेक पोषक द्रव्यांचे संशोधन चालूच आहे. ‘जी पोषक द्रव्ये अजून शोधलेलीच नाहीत, ती मिळवण्याचा प्रयत्न आपण कसा करणार ? शरीर स्वतः काही पोषक द्रव्ये निर्माण करते का ? या सर्वांचा व्यक्तीच्या मनःस्थितीशी काही संबंध असावा का ?’, असे प्रश्न निर्माण होतात. आरोग्य टिकवण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे; पण मनाची भूमिका त्याहून अधिक महत्त्वाची आहे. याविषयी आपण जाणून घेऊया.

१. आरोग्य हे अन्नापेक्षा मनःस्थितीवर अधिक अवलंबून 

आपल्याला अन्नातून मिळणारी जीवनसत्त्वे ही अन्नपदार्थांपेक्षा मनाच्या स्थितीवर अधिक अवलंबून आहेत. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१ अ. कारागृहातील एका बंदीवानाचा अनुभव : मनाने सकारात्मक असणारी एक व्यक्ती काही कारणास्तव ९ वर्षे कारागृहात होती. ‘कारागृहातील अन्नाची गुणवत्ता कशी असते ?’, याची कल्पना सर्वांनाच असेल, तरीही त्या व्यक्तीच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमी १६ ते १८ ग्रॅम / डेसीलिटर, इतके असायचे. (‘सर्वसाधारण निरोगी पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १४ ते १८ ग्रॅम / डेसीलिटर इतके असते.’ – संकलक) यावरून ‘शरिराच्या शक्तीत केवळ अन्न नाही, तर मनःस्थितीचा मोठा वाटा असतो’, हे लक्षात येते.

सौ. अक्षता रेडकर

१ आ. प्रयोगशाळेतील कोंबड्यांवर केलेला प्रयोग : एका प्रयोगशाळेत २ कोंबड्यांवर प्रयोग केला. एका कोंबडीला कॅल्शियमयुक्त खाद्य देण्यात आले, तर दुसर्‍या कोंबडीला कॅल्शियमविरहित खाद्य देण्यात आले, तरीही दोन्ही कोंबड्यांच्या अंड्यांचे कवच सारखेच टणक निघाले. असे असेल, तर कॅल्शियमविरहित आहार देण्यात आलेल्या कोंबडीला तिच्या अंड्याचे कवच टणक होण्यासाठी कॅल्शियम कुठून मिळाले असेल ? यावरून ‘शरिरामध्ये आवश्यक घटक निर्माण करण्याची अद्भुत क्षमता असते’, हे लक्षात येते.

१ इ. होमिओपॅथी उपचार आणि मन : होमिओपॅथी औषधोपचारात रोगांचे मूळ कारण ‘मन’ हे आहे. त्यामुळे मनासाठी औषधे देण्यात येतात आणि रुग्ण बरा होतो. ‘कर्करोगासारखे गंभीर आजारही केवळ मनातील िवचारांत पालट करून नाहीसे झाले आहेत’, अशी उदाहरणे ऐकीवात आहेत.

१ ई. काही लोक नेहमीचा आहार घेऊनही अनेक वर्षे निरोगी रहातात. 

१ उ. स्वभावदोष-निर्मूलनासाठी नियमितपणे स्वयंसूचना दिल्याने एका रुग्णात झालेला सकारात्मक पालट : एका रुग्णाला १ – २ वर्षे भूक लागत नव्हती. तो ‘भूक कशी लागत असते ?’, हेच विसरला होता. त्याच्यावर औषधोपचार करूनही लाभ होत नव्हता. त्यानंतर त्या रुग्णाने स्वभावदोष-निर्मूलनासाठी नियमितपणे स्वयंसूचना (Autosuggestion / Affirmations) दिल्या. काही कालावधीनंतर त्या रुग्णाला भूक लागू लागली. मानसिक ताणांमुळे भूक मंदावते, पचनशक्ती न्यून होते आणि हार्मोन्स (शरिरातील संदेशवाहक द्रव्ये) बिघडतात; याउलट आनंद, समाधान अन् सकारात्मकता यांमुळे शरिरातील हार्मोन्स संतुलित रहातात.

२. अन्न ग्रहण करतांना कोणती काळजी घ्यावी ? 

अ. आपल्याला प्रतिदिन जे अन्न मिळते, ते मनापासून आणि आनंदाने ग्रहण करावे. काही वेळा आपल्या आवडीचा पदार्थ नसेल, तरीही आपल्या पुढे आलेले अन्न मनापासून ग्रहण करावे.

आ. प्रत्येक वेळी आपल्याला सर्व जीवनसत्त्वे मिळवून देणारे पदार्थ उपलब्ध होतीलच, असे नाही. ‘आपल्याला सर्व जीवनसत्त्वे असणारे पदार्थ खायला मिळत नाहीत’, असा विचार न करता जे मिळते, ते समाधानाने ग्रहण करावे.

इ. आपल्या मनातील विचारांमुळे शरिरात विविध रसायने निर्माण होतात. मिळेल त्या पदार्थातून आपल्या शरिराला जे आवश्यक असते, ते निर्माण करण्याची यंत्रणा शरिरात असते. त्यासाठी आपले मन निरोगी असावे लागते. संतुलित आहार घेण्यासह मनाने आनंदी, तसेच समाधानी रहावे.

आपला आहार संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे; पण त्याहूनही मनाची स्थिती चांगली ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. ताण, असमाधान, राग इत्यादींमुळे शरिरातील पोषक द्रव्ये अपेक्षित अशी उपयोगात येत नाहीत. मन आनंदी असेल, तर शरिराला पोषक द्रव्यांचा लाभ अधिक मिळतो. त्यामुळे समाधानाने आणि कृतज्ञतेने अन्न ग्रहण करावे.’ (१८.८.२०२५)

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷