बुद्धीभेदाच्या षड्यंत्रात अडकू नका !

हिंदु संस्कृतीवर होणारे आक्रमण आपण सहन करायचे नाही. त्याला विरोध करणे, हेच आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण बौद्धिकदृष्टीने सक्षम असले पाहिजे, तरच आपण हिंदु संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणांना वैचारिक आणि भावनिक पातळीवरही विरोध करण्यास समर्थ ठरू. आपल्या देशावर, हिंदु संस्कृतीवर सहस्रो वर्षे आक्रमणे होत आली आहेत. आता त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढले आहे. सामाजिक माध्यमांमुळे आपल्यावर सातत्याने बौद्धिक आणि वैचारिक आक्रमणे करून संभ्रमात पाडण्याचा अन् हिंदु संस्कृती, परंपरा यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला आहे. त्यात आपण फसलो, तर आपणच हिंदु संस्कृतीचा, परंपरेचा नाश करण्यास कारणीभूत ठरू. असे घडू नये, यासाठीच हा लेख प्रपंच आहे.

१. हिंदु संस्कृतीपासून दूर नेण्यासाठी बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न

‘देवाला फुले वाहणे, देवळातील दानपेटीत पैसे अर्पण करणे, देवाला सोने अर्पण करणे, हा दानधर्म आहे का ? त्याऐवजी अपंग, अनाथाश्रम, वृद्धाश्रम या आणि अशा संस्थांना दान दिले, तर खर्‍या अर्थाने दानधर्म होईल’, असे सांगितले जाते. याचा आपल्या मनमस्तिष्कावर परिणाम होतो आणि ते मत सहजतेने पटते.

श्री. दुर्गेश परुळकर

देवळात जाऊन आपण वस्त्रदान, धनदान करतो आणि पूजा करण्यासाठी फुले, हार देवाच्या मूर्तीला अर्पण करतो. हे देऊळ म्हणजे हिंदूंचे सांस्कृतिक केंद्र आहे. ते हिंदु संस्कृतीचे आणि धर्माचे प्रमुख स्थान आहे, तसेच ते आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जाते; कारण तिथे हरिकथा, कीर्तने, प्रवचने, होम, यज्ञ अशी कार्ये होत असतात.

हिंदु संस्कृतीने मानवी जीवनाची भौतिक आणि पारमार्थिक, अशी २ अंगे सांगितली आहेत. ‘भौतिक जीवनातील आसक्तीवर विजय मिळवण्यासाठी आपण कष्टाने मिळवलेल्या उत्पन्नातील काही वाटा दान देण्यासाठी उपयोगात आणायला पाहिजे’, असा आपल्याकडे एक अलिखित नियम आहे. हा नियम आपण जेव्हा पाळतो, त्या वेळी कळत नकळत हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा आणि संस्कृतीचे केंद्र असलेले मंदिर यांचे एकप्रकारे रक्षण अन् संवर्धन करत असतो. त्याला खीळ पडली की, स्वाभाविकपणे धर्म, संस्कृती, परंपरा आपोआप नष्ट होतात. हिंदूंची मंदिरे म्हणजे बळकट असे सांस्कृतिक गडकोट आहेत, जे संस्कृतीचे रक्षण करण्यास समर्थ ठरतात. त्यांनाच उद्ध्वस्त करण्यासाठी ‘देवावर दुधाचा अभिषेक करू नका, देवाला फुले वाहू नका, देवाला नारळ अर्पण करू नका’, अशा प्रकारचा बुद्धीभेद करून हिंदु संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. या बुद्धीभेदाच्या षड्यंत्राला आपण फसलो, तर आपणच स्वतःची हानी करून घेऊ.

हिंदु संस्कृतीवर सातत्याने होणारी बौद्धिक आणि वैचारिक आक्रमणे

२. सामाजिक संस्थांना देणग्या देण्यामध्ये हिंदु समाजच अग्रणी

दुसरे महत्त्वाचे असे की, आजही अनाथाश्रम, अपंगांसाठीचे साहाय्य केंद्र, वृद्धाश्रम यांना हिंदु समाज मोठ्या प्रमाणात देणग्या देत असतो. तिथे देणग्या दिल्या गेल्या नसत्या, तर त्या संस्था आज आपल्याला आढळून आल्या नसत्या. देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांना दानरूपात जेव्हा देणग्या दिल्या जातात, तेव्हा हिंदु समाज हा इतर सामाजिक संस्थांना देणग्या देत नाही, असे गृहीत धरले आहे. जे वास्तवतेला धरून नाही, तसेच अनेक देवस्थाने भंडार्‍याच्या रूपात अन्नदान करत असतात. एवढेच नाही, तर समाजातील रुग्णांनासुद्धा काही देवस्थाने आर्थिक साहाय्य करत असतात. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या मनमस्तिष्कावर आक्रमण होत आहे, हे लक्षात घ्यावे.

३. राष्ट्राला घातक असलेले मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय यांना अशा प्रकारचा उपदेश का नाही ?

हा उपदेश केवळ हिंदूंना केला जातो. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय यांना अशा प्रकारचा उपदेश केला जात नाही. सर्वांत घातक आहेत त्या मशिदी, मदरसे आणि ख्रिस्त्यांची चर्चेस; पण त्या विरोधात कुणीही एक अवाक्षर उच्चारत नाही, ही वस्तूस्थितीसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. मशीद, मदरसे आणि चर्च यांमधून जे कार्य चालते ते मानवतेला काळीमा फासणारे आहे. मुसलमानांच्या मशिदी आणि मदरसे हे जिहादी निर्माण करणारे अन् त्यांना शस्त्रास्त्रे पुरवणारे प्रमुख केंद्र आहे. याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला आहे. मशिदीत अनेक प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे अनेक वेळा सापडली आहेत. ही शस्त्रास्त्रे अवैधपणे साठवण्यात आली होती. हिंदु मंदिरांमध्ये मानवतेला काळीमा फासणारा असा कोणताही प्रकार घडत नाही. मशिदीतील शस्त्रास्त्रांचा उपयोग हा हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच केला जातो, हा आपला नेहमीचा अनुभव आहे.

चर्चचा उपयोग धर्मांतर करण्यासाठी राजरोसपणे केला जातो. त्यासाठी सर्व प्रकारचे आर्थिक साहाय्य ख्रिस्ती समाजाकडून सातत्याने होत असते. अमली पदार्थांची तस्करीसुद्धा चर्चकडून होत असते, असे आढळून आले आहे, विशेषतः ईशान्य भारतात ! अशा मानवी समाजाला घातक ठरणार्‍या कार्याच्या विरोधात केव्हाही, कधीही आणि कुठेही एका अवाक्षराने लिहिले जात नाही. ही गोष्ट ज्यांना मंदिरांना आणि तीर्थक्षेत्रांना दिलेले दान खटकते त्यांच्यासाठी सांगणे नितांत आवश्यक आहे. मंदिराच्या दानपेटीत पडणार्‍या धनाचा उपयोग असा मानवतेच्या विरोधात केला जात नाही. याकडे या निमित्ताने लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे.

४. हिंदु धर्माकडे पहाण्याची विकृत दृष्टी

मुसलमान समाज दर्ग्यांवर फुलांची चादर चढवतो, तर ख्रिस्ती समाज पुष्पगुच्छ अर्पण करतो. त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले, तर तो धर्म ठरतो; पण हिंदूंनी त्यांच्या देवीदेवतांना पुष्प, पुष्पमाला अर्पण केल्या, तर मात्र तो व्यवसाय ठरतो. हिंदु धर्म आणि अन्य धर्म यांकडे पहाण्याची दृष्टी किती विकृत आहे, त्याचे हे उदाहरण आहे.

शेतकर्‍यांना साहाय्य करणारी ‘शबरी सेवा समिती’ आणि हिंदु करत असलेले दान !

बहुतांश वेळेला ‘शेतकर्‍यांना साहाय्य करा, मंदिरांना देणग्या देऊ नका’, असेही आपल्याला सांगितले जाते. आपल्या हिंदु समाजातील अनेक लोक देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांना देणग्या देऊनही शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या काही संस्थांना सढळ हस्ते आर्थिक साहाय्य करत असतात. याचे एक उदाहरण येथे देत आहे.

‘शबरी सेवा समिती’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने वनवासी क्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणीपुरवठा करणे, विहिरी खोदून देणे यांसारख्या शेतीसाठी उपयुक्त ठरणार्‍या सर्व  सोयींची व्यवस्था करते, वनवासी क्षेत्रातील स्त्रियांना छोट्या व्यवसायांसाठी आर्थिक  साहाय्य करते; आजारी, अपंग बांधव यांना सर्व  प्रकारचे वैद्यकीय साहाय्य तत्परतेने करते. वनवासी क्षेत्रातील तरुण-तरुणींचे सामूहिक विवाहसुद्धा या संस्थेद्वारे केले जातात आणि त्यांना प्रपंचाला उपयुक्त असलेल्या वस्तू अहेर म्हणूनही देतात. या संस्थेचे श्री. प्रमोद करंदीकर आणि सौ. रंजना करंदीकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अत्यंत श्रद्धेने कार्य करत आहेत.

हिंदु समाजातील बांधव या संस्थेला त्यासाठी देणग्या देत आहेत. हे वानगी दाखल दिलेल्या एका संस्थेचे उदाहरण आहे. अशा अनेक संस्था कार्यरत आहेत आणि त्यांना हिंदु बांधवच देणगीच्या रूपात साहाय्य करत असतात. याकडे दुर्लक्ष करून देवळांना दिलेल्या देणग्यांविषयी आक्षेप घेतला जातो आणि हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्नही त्याच वेळी केला जात आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हिंदु समाज देवळांच्या दानपेटीत धन अर्पण करून अन्य समाजसेवी संस्थांनासुद्धा देणग्या देत असतो. याकडे पाठ फिरवून केवळ हिंदु धर्म, संस्कृती नष्ट करण्याच्या हेतूने केलेल्या लिखाणाला फसू नका, अशी कळकळीची विनंती या लेखाद्वारे करत आहे.

– श्री. दुर्गेश परुळकर

५. भंडारे, अनाथालये आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांना साहाय्य करणारे हिंदूच !

बहुतेक देवस्थानांमध्ये अन्नदान होत असते. मोजक्या ठिकाणी अल्प पैसे द्यावे लागतात किंवा पैसे न देताही तुम्हाला भोजन मिळते. गणपति, नवरात्र उत्सवात, अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हा भंडारा असतोच असतो. अनेक देवस्थानांनी रुग्णांसाठी आर्थिक साहाय्य करण्यास पुढाकार घेतला आहे. सर्वेक्षण केले, तर अनेक मंदिरांची सूची समोर येईल. अनेक धर्मादाय संस्था या संसारिक लोकांच्या देणग्यांवर चालतात. वनवासी क्षेत्रांतील अनेक संस्थांना शहरातील लोक देणग्या देतात. देवस्थानांनाही जशी देणगी दिली जाते, तशा अनाथालयालासुद्धा देणग्या देणारे लोक आहेत. याखेरीज अनाथालये चालणार नाहीत. अनेक स्वयंसेवी संस्था अत्यंत श्रीमंत आहेत त्या लोकांनी दिलेल्या देणग्यांवरच.

६. हिंदु धर्म, संस्कृती आणि भारत यांना नष्ट करण्यासाठी ‘डीप स्टेट’कडून षड्यंत्र !

सर्वांत महत्त्वाचा भाग ज्यांना कदाचित् ठाऊक नसेल, त्यांच्यासाठी देत आहे.  ‘डीप स्टेट’ नावाचा प्रकार आता सर्वाधिक प्रमाणात कार्यरत झाला आहे. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते, जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) अमेरिका हे त्याचे मुख्य केंद्र आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि भारत यांना नष्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न देश स्वतंत्र झाल्यापासून चालू आहेत.

जेम्स वॉटसन नावाचा अमेरिकेतील सैन्यामधून निवृत्त झालेला मेजर आहे. त्याने नुकतेच भिवंडीमध्ये तेथील चिंधी पाडा नावाच्या एका छोट्याशा गावात हिंदु धर्माच्या विरोधात अशाच प्रकारचे कार्य करून तेथील हिंदूंना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न केला. हा माणूस व्यावसायिक ‘व्हिसा’वर (एका देशातून दुसर्‍या देशात जाण्यासाठी दिला जाणारा तात्पुरता परवाना) भारतात आला आणि येथे हे उद्योग तो करत आहे. त्याने धर्मांतरित झालेल्या काही हिंदूंना सरकारच्या विरोधात भडकवून हातात शस्त्रेही दिली; म्हणून तेथील स्थानिक लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याच ‘डीप स्टेट’ने बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका या आणि अशा अनेक देशांमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. ‘देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा आणि अंतर्गत बंडाळी निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी धर्मावर आघात करून अस्तित्वात असलेल्या सत्तेच्या विरोधात उठाव करण्यासाठी पाठबळ देणे’, हा त्यांचा कुटील डाव आहे. या कुटील डावात हिंदु धर्मियांनी अडकू नये; म्हणून सातत्याने हिंदु समाजाने स्वतःचा बुद्धीभेद करून घेऊ नये; त्यासाठी त्यांना सजग रहाणे नितांत आवश्यक आहे.

७. हिंदूंनी कुटील कारस्थानाच्या विरोधात सजग रहाणे आवश्यक !

हिंदु धर्म, संस्कृती नष्ट करण्यासाठी हिंदूंची श्रद्धास्थाने, देवता, मठ, मंदिरे, अशा प्रकारचे आक्षेप हेतूतः घेतले जात आहेत आणि बुद्धीभेद केला जात आहे. असे करण्यासाठी त्यांना पैसा दिला जातो. त्या विरोधात कुणी आवाज उठवत नाही, हे दुर्दैवी आहे. हिंदु समाजाच्या विरोधात अकारण अपसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या बुद्धीभेदाला फसणारे हिंदूच त्यांचा पक्ष घेऊन हिंदूंशी भांडत आहेत. त्यांना सजग करण्यासाठीच हा अल्पसा प्रयत्न आहे.

आपल्या धर्माने गृहस्थाश्रम हा राष्ट्रीय जीवनाचा पाया मानला आहे. त्याचे कारण असे की, समाजातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांना आर्थिक साहाय्य गृहस्थाश्रमी लोकांकडूनच केले जाते; म्हणून दानधर्म हे पुण्य कर्म म्हणून सांगितले जाते. ते केवळ देवळातच नव्हे, तर अन्य ठिकाणीसुद्धा आपण करतो. याकडे दुर्लक्ष का केले जाते ? लोकांनी जर सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था यांना देणग्या दिल्या नसत्या, तर आज त्या संस्थांचे आपल्याला अस्तित्व दिसले असते का ? मानवी समाजाच्या पूर्ततेसाठी आर्थिक साहाय्य एकीकडे करत असतांना दुसरीकडे देवळांना  सुवर्ण दान दिले, तर काय हरकत आहे ? अशा परिस्थितीत पोटशूळ का उठतो ? असे दान दिल्यावर हिंदु समाजाच्या विरोधात आणि त्यांच्या  धार्मिक , सांस्कृतिक विषयाशी निगडित असलेल्या गोष्टींविषयी अपसमज समाजात पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना असे आपण प्रश्न विचारले पाहिजेत.

यामुळेच हिंदूंना कळकळीची विनंती आहे, ‘स्वतःचा बुद्धीभेद करणार्‍यांपासून सावध रहा आणि त्यांच्या कुटील कारस्थानाला, म्हणजेच बुद्धीभेदाला फसू नका.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१०.१०.२०२५)