
पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्याने चालू झालेली हिंसक निदर्शने निदर्शकांच्या मागण्या मान्य करण्याचे पाकने आश्वासन दिल्यानंतर शांत झाली. असे असले, तरी धुगधुगी कायम आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सहस्रो लोक रस्त्यावर उतरून पाकचा निषेध करतांना, त्याच्या विरोधात घोषणा देतांना आणि पाकच्या सैन्यावर आक्रमण करतांना जगाने पाहिले आहे. पाकच्या सैन्याने क्रूरपणे अत्याचार करत हे आंदोलन दडपले आहे. या हिंसाचारात १० ते १२ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. आंदोलकांनी पाकच्या २५ सैनिकांना ओलीस ठेवल्यामुळे सैन्याला आणखी पुढील कारवाई करता आली नाही. त्यामुळे पाकने जनरेट्यापुढे नमते घेतले आहे.
एकूणच पाक सरकारच्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात तेथील लोकांमधील जनक्षोभ दिसला. भारत सरकारने पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांचा निषेध केला असून ‘तेथे निष्पाप लोकांवर आक्रमणे करण्यात येत आहेत’, असे भारताकडून सांगण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेची ही काही पहिलीच निदर्शने नाहीत. तेथे प्रत्येक काही महिन्यांनी निदर्शने आणि हिंसक आंदोलने स्थानिकांकडून केली जात आहेत. एवढेच नाही, तर हा भाग भारतात समाविष्ट करण्याची मागणीही वेळोवेळी केली जात आहे. पाक सरकार आणि जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती यांच्यात करार झाल्यानंतर निदर्शने थांबली आहेत. तरी आजवरचा अनुभव असा आहे की, पाक सरकार दिलेली आश्वासने पाळत नाही. याची कल्पना असल्याने आंदोलकांनी त्यांच्या पुढच्या आंदोलनाच्या योजनाही सिद्ध ठेवल्या आहेत. ही आंदोलने मात्र सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर इतक्या तीव्र स्वरूपाची असतील, असे समजते.

काश्मीरचा इतिहास !
काश्मीरचा विषय आला म्हणून येथे थोडे इतिहासात डोकवायला हवे. वर्ष १९४७ मध्ये जेव्हा भारत ब्रिटिशांच्या कह्यातून स्वतंत्र झाला, तेव्हा जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र संस्थान होते. पाकने त्या वेळी या संस्थानामध्ये घुसखोरी केली आणि तेथील काही भागांवर नियंत्रण मिळवले. या वेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात कारवाई चालू केली आणि भारत-पाक यांच्यात पहिले युद्ध झाले. वर्ष १९४९ मध्ये युद्धबंदी झाली, तोपर्यंत जो भाग पाकच्या कह्यात होता, तो त्याच्या कह्यात आजतागायत तसाच आहे. पाकने या प्रदेशावर नियंत्रण मिळवले; मात्र त्याला पाकमध्ये समाविष्ट न करता स्वत:चे प्रशासन तेथे चालवले. त्यामुळे या भागाला ‘पाक नियंत्रित अथवा पाकव्याप्त काश्मीर’ असे संबोधले जाते. भारताच्या कह्यात असलेले काश्मीर १ लाख ६ सहस्र ५६६ चौरस कि.मी., तर पाकच्या कह्यात ७२ सहस्र ९३५ चौरस कि.मी. आणि अक्साई चीन म्हणून जो काश्मीरचा भूभाग चीनच्या नियंत्रणात आहे तो ४२ सहस्र ७३५ चौरस कि.मी. एवढा आहे. या व्यतिरिक्त काही भाग चीनच्या कह्यात आहे. जम्मू-काश्मीरचा एकूण जो भूभाग आहे तो बेल्जियम, डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रिया आणि अल्बानिया या देशांच्या एकूण भूभागाएवढा आहे.
जम्मू-काश्मीरचे तत्कालीन महाराज हरिसिंह यांना भारतातच त्यांच्या संस्थानाचे विलीनीकरण करायचे होते; मात्र पाकने कपटाने आक्रमण केले, म्हणजेच महाराज हरिसिंह यांच्यासह एकूण समाजाच्या इच्छेविरुद्ध पाकने आतापर्यंत कारवाया केल्या आहेत. चीननेही भारताची भूमी त्याच्या कपटी, क्रूर आणि अविश्वासूपणामुळे मिळवली आहे.
काश्मीरसाठी निर्णायक लढा !
पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांची भारतात समाविष्ट होण्याची इच्छा लपून रहात नाही. मागील आंदोलनाच्या वेळी तेथे मोदी यांच्या नावाने आणि भारतात समाविष्ट होण्यासाठी घोषणा देण्यात आल्या, तर पाक सरकारचा निषेध करण्यात आला. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या वृत्तवाहिन्यांनी प्रतिक्रिया घेतल्या. त्या वेळी नागरिकांनी सांगितले, ‘त्यांना पाक सरकारकडून काहीही सुविधा मिळत नाहीत, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर भारतीय प्रदेशातील काश्मीरमधील त्यांच्या नातेवाइकांना शिधा, धान्य यांसह अनेक सरकारी सुविधा मिळतात. त्यामुळे त्यांचे जीवन सुखकर आहे.’ नागरिकांच्या या प्रतिक्रियांवर पाक केवळ आतंकवादाचा कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतो; परंतु एखादा भूप्रदेश आणि तेथील जनतेचे पालनपोषण करण्यासाठी पूर्णपणे अपात्र असल्याचे लक्षात येते. पाकने पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही चांगले करण्याऐवजी तेथे आतंकवाद्यांचे तळ उभारले आहेत, जेथून आतंकवादी काश्मीरच्या भारतीय भूभागात प्रवेश करून जिहादी कारवाया करतात. या आतंकवाद्यांमध्ये भारतीय मुसलमान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुसलमान सहभागी असतात, म्हणजेच पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरच्या भूभागाचा केवळ आतंकवाद पोसण्यासाठी, आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी वापर करतो, त्याला तेथील सामान्य जनतेशी काही देणे-घेणे नाही. याउलट आतंकवादी सामान्य जनतेचा ढाल म्हणून उपयोग करून स्वत:चा बचाव करतात. सामान्य जनतेला अल्प मूल्यात गव्हाचे पीठ, वीजपुरवठा, विनामूल्य शिक्षण आणि आरोग्यसुविधा, तसेच शासनात प्रतिनिधीत्व या गोष्टी हव्या असल्या, तरी भिकेकंगाल पाकची स्थिती अशी आहे की, तेथील अधिकारीच पाकीटचोरी करतांना सापडले आहेत. पाकच्या हिंसाचाराविरुद्ध पत्रकार उभे ठाकल्यावर पोलिसांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत घुसून मारहाण केली.
गत ३ दिवसांतील भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सैन्यदलप्रमुख द्विवेदी, वायूदलप्रमुख अमरप्रीत सिंह यांची विधाने पाहिल्यास भारतीय सैन्य पाकवर ‘ऑपरेशन सिंदूर २.०’च्या अंतर्गत पुढील कारवाई करण्यास सज्ज आहे. भारताचे सध्याचे सैन्यदलप्रमुख द्विवेदी यांनी ‘पाकला भूगोलावरून पुसून टाकण्यासाठी सिद्ध रहा’, असे आवाहन केले आहे. एकूणच पाकव्याप्त काश्मीर येथील जनतेच्या उद्रेकाची परिस्थिती पहाता आणि पाकच्या भविष्यातील आतंकवादी कारवायांचा विचार करता पाकला अधिक संधी देण्याची आवश्यकता नाही. भारताने कधीही प्रथम आक्रमण केलेले नाही, तर आक्रमणाला प्रत्युत्तर देऊन युद्ध जिंकले आहे. पाकला पुन्हा संधी देणे म्हणजे त्याला आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी आणि अधिक कपटी कारवाया करण्याची मोकळीक देणे होय ! भारत आता पाकच्या अणूबाँबच्या धमक्यांना भीक घालत नाही, तसेच अमेरिकेच्या पाकवर कारवाई न करण्याच्या विनंतीलाही जुमानत नाही. त्यामुळे आता पाकला जगाच्या नकाशातून पुसण्यासाठी सज्ज असलेल्या भारतानेच आक्रमण करून पाकला इतिहासजमा करावे, हीच अपेक्षा !
| जनतेचे शोषण आणि आतंकवाद्यांचे पोषण होत असलेला पाकव्याप्त काश्मीर भारतीय सैन्याने कह्यात घ्यावा ! |
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
आतंकवाद्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची केली रेकी !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !
संपादकीय : चीनची आण्विक सिद्धता !