श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या अन् ‘साधकांची साधना व्हावी’, असा ध्यास असलेल्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामधील अनुभवलेल्या शिष्यभावाविषयी येथे दिले आहे.

१. ‘श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हावी, तसेच साधकांची साधना व्हावी’, हा समष्टी भाव आणि श्री गुरूंप्रती असलेली दृढ श्रद्धा !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या कालावधीत कार्यक्रमस्थळी समयमर्यादेत सेवा पूर्ण होण्यात अडचणी आहेत’, असे लक्षात आल्यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अनेक वेळा कार्यक्रमस्थळी गेल्या. त्यांनी तेथील सेवेचा आढावा घेऊन सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी कार्यक्रमस्थळी अनेक सत्संग घेतले आणि साधकांना मार्गदर्शन केले. हे सर्व करतांना ‘श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हायला हवी आणि साधकांची साधना व्हायला हवी’, हा समष्टी भाव त्यांच्यात होता, तसेच ‘श्री गुरु करून घेतील’, अशी त्यांची दृढ श्रद्धाही होती.

२. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त देण्यात येणार्‍या प्रसादासंबंधी भाव !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रसादाच्या पुड्या आणि भेटवस्तू पाठवायच्या होत्या. काही साधक ही सेवा करतच होते. ‘ही सेवा परिपूर्ण होणे आवश्यक आहे. ‘प्रसाद आणि भेटवस्तू’ यांवर येथील हवामानाचा परिणाम होऊन ते खराब होऊ नयेत, जिज्ञासूंना प्रसाद वेळेत मिळावा, शेष प्रसाद टिकून रहावा’, यानिमित्तच्या सेवांमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ जातीने लक्ष देत होत्या. ‘प्रसादाचा प्रत्येक कण हा श्री गुरूंचा प्रसाद आहे आणि शेष प्रसाद हे गुरूंचे धन आहे’, या भावाने त्या या संदर्भातील सेवा करत होत्या.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे असलेल्या सेवांची अफाट व्याप्ती आणि त्यांची ‘गुरुकार्य अन् समष्टी कल्याण’ यांची तीव्र तळमळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

त्यांच्याकडे अनेक सूत्रे प्रतिदिन येत असतात. सर्वसामान्यपणे एवढ्या सूत्रांचे वाचन करणे, प्रत्येक विषयावर चिंतन करणे आणि दिशादर्शन करणे, हे फार कठीण आहे; मात्र त्यांच्यामधील ‘गुरुकार्य आणि समष्टी कल्याण’ यांच्या तीव्र तळमळीमुळे त्या अनेक घंटे सूत्रे वाचतात. त्या लहान कागदांवर लिहिलेली सूत्रेही तेवढ्याच तन्मयतेने वाचतात. त्या सूत्रे वाचत असतांना ‘त्यांचे जागृतावस्थेत ध्यान लागले आहे’, असे मला वाटते. त्या महत्त्वाची सूत्रे अधोरेखित करतात. त्यानंतर त्या प्राधान्यक्रमाने साधकांना दिशादर्शन करतात. त्या रात्री उशिरापर्यंत सेवा करतात.

४. अहंशून्यता

काही महत्त्वाच्या विषयांवर साधकांच्या समवेत सत्संग घेण्यापूर्वी त्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, महर्षि आणि देवता यांना प्रार्थना करतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सगळे कर्तेपणा त्यांना अर्पण करतात. त्या आवश्यक असल्यास संबंधितांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारून घेतात.’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, वाराणसी (१.८.२०२५)


श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामधील शिष्यभाव अन् प्रत्येक सेवेची नोंद करून सेवा परिपूर्ण होण्यासाठी साधनेच्या स्तरावर मार्गदर्शन करणे

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या सत्संगात श्री. रमेश शिंदे (डावीकडे) सांगत असलेली सूत्रे लिहून घेतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (वर्ष २०२५)


‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने मी गोवा येथे सेवेसाठी गेलो होतो. तेव्हा मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत आयोजन समितीमधील साधकांच्या काही सत्संगांत उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सत्संगांत आयोजनाच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूत्रांवर चर्चा होत असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रत्येक सूत्र लिहून ठेवत असत. त्या सूत्रांवर सखोल चर्चा करून त्या साधकांना साधनेच्या स्तरावर दिशादर्शन करत होत्या. तेव्हा ‘साधकांना दिशा दिली असली, तरी दायित्व स्वत:चेच आहे’, असा त्यांच्यामधील शिष्यभाव मला त्या वेळी अनुभवता आला.

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (१.८.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक