उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्‍या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !

‘ज्येष्ठ शुक्ल नवमी (२३.६.२०२६) या दिवशी श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची सून आणि मुलगी यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी यांना त्यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

श्रीमती सुनंदा सामंत

१. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत (श्रीमती सामंतआजींची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. सतत आनंदी असणे : ‘आई कधी खोलीत एकटी असली, तरीही तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसतो.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

१ आ. वयोमानानुसार येणार्‍या अडचणींवर मात करणे : आई ८९ वर्षांची आहे. तिला आता चालतांना त्रास होतो. आईला वयोमानामुळे उद्भवणार्‍या शारीरिक मर्यादा आणि पुष्कळ अडचणी आहेत. त्यावर ती मात करते. त्याविषयी तिची कोणतीही तक्रार नसते.

१ इ. आई सतत गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) गुणगान गाते. ती सातत्याने हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत असते.

१ ई. सतत अनुसंधानात असणे : आईचे दैनंदिन पोथीवाचन झाले की, उर्वरित सर्व वेळ ती नामजप करत असते.

१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याबद्दल त्यांच्याप्रती सतत कृतज्ञता वाटणे : आई म्हणते, ‘‘अनेक जन्मांची पुण्याई म्हणून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे थोर गुरु लाभले ! त्यांनी मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवले आहे, हे माझ्या ध्यानी-मनीही नव्हते. एवढी मोठी अपार कृपा गुरूंनी केली आहे. त्यांचे ऋण मी कसे फेडणार? हे ऋण फेडण्याची माझी क्षमता नाही आणि खरेतर या ऋणात रहाण्यातही मला आनंद आहे !’’

२. सौ. अदिती अनिल सामंत (श्रीमती सुनंदा सामंतआजींची सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

सौ. अदिती सामंत

२ अ. उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणे आणि ‘आश्रमातच आनंद मिळतो’, असे सांगणे : आम्ही डिचोली, गोवा येथे रहात होतो. ‘वर्ष २०२० मध्ये आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो. डिचोली येथील घर सासूबाईंनी (श्रीमती सामंतआजी यांनी) कष्ट करून बांधले होते. आम्ही आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी येतांना त्यांना थोडे वाईट वाटले; मात्र आता त्या म्हणतात, ‘‘आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात योग्य वेळी आलो.’’ आता आम्ही घरी गेल्यावर सासूबाईंना घरी मुळीच करमत नाही. त्यांनी आता एवढ्या उतारवयातही आश्रमजीवन सहजतेने स्वीकारले आहे. ‘मला आश्रमातच आनंद मिळतो’, असे त्या म्हणतात.

२ आ. वाचनाची आवड असणे : ‘सासूबाई सतत पोथीवाचन करतात, तसेच त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला पुष्कळ आवडते. त्या त्यांच्या नियोजित वेळेत प्रतिदिन वाचन करतात. आता वयोमानानुसार त्यांचे वाचन करण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा न्यून झाले आहे.

२ इ. सासूबाईंचा आधार वाटणे : मी माझे भाग्य समजते, ‘देवाने मला इतक्या चांगल्या सासूबाई आणि सासूबाईंच्या रूपात मला मैत्रीण दिली आहे.’ आम्ही दोघी सतत एकमेकांच्या समवेत असतो. मला कधी काही अडचण आल्यास किंवा एखाद्या प्रसंगाविषयी माझी चिडचिड होत असल्यास मी त्यांच्याशी बोलते. तेव्हा मला त्या योग्य दृष्टीकोन देतात. सासूबाई नेहमीच माझ्या सुख-दुःखात माझ्या समवेत रहातात. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.

२ ई. अनुसंधानात असणे : सासूबाईंचा नामजप सतत चालू असतो. त्या देवाकडे सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

२ उ. जाणवलेले पालट

२ उ १. अपेक्षा नसणे : आम्ही घरी रहात असतांना सासूबाईंना जेवणात ओल्या खोबर्‍याची आमटी हवी असायची. त्यामुळे आश्रमात रहायला आल्यावर ‘त्या ओले खोबरे नसलेली आमटी खातील का ?’, असा मला प्रश्न पडला होता; मात्र आश्रमात आल्यापासून त्यांनी कधीही जेवणाविषयी आवड-नावड व्यक्त केली नाही. ‘मला खोबर्‍याच्या आमटीची सवय आहे, तर ती मिळेल का ?’, अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. सासूबाई आश्रमातील महाप्रसाद आवडीने ग्रहण करतात.

२ उ २. सासूबाईंना पूर्वी गप्पा-गोष्टी करायला पुष्कळ आवडायच्या; मात्र आता त्यांचे बोलणे पुष्कळ न्यून झाले आहे. ‘त्या आता शांत झाल्या आहेत’, असे मला वाटते.

२ ऊ. सिच्चदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा असणे : ‘सासूबाई सतत गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात असतात. जेव्हा आम्ही कधीही त्यांच्याशी बोलत असतो, तेव्हा त्या अन्य कोणतेही विषय अधिक न बोलता गुरूंप्रती असलेला कृतज्ञताभाव व्यक्त करतात. ‘‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! तसेच आपली किती काळजी घेतात !’’, असे त्या म्हणतात. गुरुदेवांप्रती त्यांचा पुष्कळ भाव आहे. मला कधी बरे नसल्यास त्या सांगतात, ‘‘तू प.पू. गुरुदेवांना सांग. तेच तुझी काळजी घेणार आहेत.’’

मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणी प्रार्थना करते, ‘सासूबाईंचे उर्वरित जीवन असेच आनंदात जावो !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.६.२०२६)