हे बिंदामाते, सर्वस्व आमचे गुरुचरणी समर्पित करून घ्यावे ।

‘कुंभमेळ्याचा लाभ घेण्याची संधी एक तपानंतर (१२ वर्षांनंतर) येते; पण सनातनचे साधक आणि धर्मप्रेमी यांना या संधीचा लाभ ३६५ दिवस अन् २४ घंटे अखंड मिळत आहे. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी भक्तीच्या त्रिवेणी संगमात अखंड डुंबत आहेत.

पु. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि (सद्गुरु) अनुराधा वाडेकर

आम्हा पामरांना चैतन्याने न्हाऊ घालणार्‍या भगवतीची (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची) कितीही स्तुती केली, कोटी कोटी वेळा कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. तिच्याविषयी भगवंताने सुचवलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत. 

तूच गंगा, तूच यमुना, तूच आमुची सरस्वती ।
चैतन्याचा अखंड वर्षाव आम्हावरी करिशी ।। १ ।।

सद्गुरु अनुराधा वाडेकर

कोणत्या जन्माचे पुण्य असे आमुचे ।
तुझ्यासारख्या देवीची कृपा अखंड बरसते ।। २ ।।

तूच आमुची माता, तूच आमुचा श्वास ।
तूच लावली या जिवाला, भगवद्भक्तीची आस ।। ३ ।।

सांगतेस आम्हा, अखंड धरूया गुरुचरणांची कास ।
आम्हा पामरांसाठी अखंड तुझे हे प्रयास ।। ४ ।।

तुझ्या प्रेमाचा कुंभ, तुडुंब भरला आमच्यासाठी ।
तूच उभी असतेस, अखंड आमच्या पाठी ।। ५ ।।

असे वाटते, कृतज्ञतेच्या अश्रूंनी तुझे चरण धुवावे ।
चरणरज बनून तुझ्या चरणी रहावे ।। ६ ।।

जगन्माता तू झालीस संपूर्ण जगाची ।
माय भवानी ना केवळ राहिली आमुची ।। ७ ।।

गुरुदेवांना अपेक्षित असे करण्यासाठी सदैव धडपडणारी ।
आम्हा जिवांवर गुरुकृपेचा वर्षाव करणारी ।। ८ ।।

चैतन्यमय बोल तुझे माझ्यासारख्या दगडालाही पाझर फुटला ।
आम्हा रुक्ष जिवांमध्ये तू भक्तीभाव निर्मिला ।। ९ ।।

क्षणोक्षणी असतेस आमच्या समवेत तू सावलीसारखी ।
एकेका साधकाला पारखून, नित्य घडवणारी तू खरी रत्नपारखी ।। १० ।।

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून एकेक मधुर शब्द कानी पडे ।
तुझ्या प्रेरणेने एकेक साधकजीव घडे ।। ११ ।।

कशी वर्णू तुझी गाथा, किर्ती तुझी चोहीकडे ।
तुझी कीर्ती वर्णाया, थिटी पडे मी आणि शब्द माझे ।। १२ ।।

हे जगज्जननी, हे करुणामय माते ।
तुझे आणि आमुचे जन्मोजन्मीचे नाते ।। १३ ।।

अपराध आमुचे पोटात घालूनी, देतेस संधी अखंड गुरुसेवेची ।
कुठे फेडू पांग तुझे, देतेस संधी अखंड गुरुकृपेची ।। १४ ।।

गुरुमाऊलींच्या संकल्पात, घेतलेस सामील करून आम्हाला ।
त्यातून किती आनंद दिलास, कसे सांगू मी शब्दांत कोणाला ।। १५ ।।

असे वाटते, गुरुदेवांना अपेक्षित असेच व्हावे ।
त्यासाठी अपेक्षित असे माध्यम आम्ही बनावे ।। १६ ।।

त्यासाठीच झिजावे, त्यासाठीच रडावे ।
त्यासाठीच घडावे, त्यासाठीच मरावे ।। १७ ।।

असमर्थ आम्ही, करितो याचना तव चरणी ।
अगाध सामर्थ्य तुझे जाणितो आम्ही ।। १८ ।।

तूच गुरुमाऊलींना अपेक्षित असे आम्हा घडवावे ।
तूच आमच्याकडून अपेक्षित ते करून घ्यावे ।। १९ ।।

हीच प्रार्थना तव चरणांशी माते ।
शरण आम्ही तुझ्या चरणी माते ।। २० ।।

सर्वस्व आमचे गुरुचरणी समर्पित करून घ्यावे ।
सर्वस्व आमचे गुरुचरणी समर्पित करून घ्यावे ।। २१ ।।

– (सद्गुरु) अनुराधा वाडेकर, मुंबई (२६.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक