५ मिनिटांचे व्यायामप्रकार केल्याने साधकांना झालेले लाभ !

आतापर्यंत प्रसिद्ध लेखात आपण बैठे काम करणार्‍यांनी ५ मिनिटांचे कोणते व्यायामप्रकार करायचे, याविषयीची माहिती वाचली. आजच्या लेखात हे व्यायामप्रकार केल्यानंतर साधकांना झालेले लाभ येथे देत आहोत.

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक क्र. ८५

१. श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

१ अ. कंबरदुखी, मानदुखी आणि ‘सायटिका’चा त्रास न्यून होणे : ‘मला सतत कंबर आणि मान दुखण्याचा त्रास होत असतो. सायटिकाच्या (कमरेपासून पायापर्यंत होणार्‍या वेदना) त्रासामुळे माझ्या पायाची नस दबली जाऊन अधूनमधून दुखत असते. मला संगणकीय सेवा करण्यासाठी सलग काही घंटे बसावे लागत असल्यामुळे माझी कंबर सतत दुखत रहाते.

५ मिनिटांचे व्यायाम चालू केल्यामुळे मला कंबरदुखीचा त्रास अल्प जाणवतो, शरिराला हलकेपणा जाणवतो, तसेच मानेवरही अधिक ताण येत नाही; पण व्यायामात खंड पडल्यास पुन्हा त्रास जाणवू लागतो.’

२. सौ. वैशाली कोथमिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.   

२ अ. वातामुळे होणार्‍या वेदना आणि संगणकीय सेवा करतांना डोळ्यांवर येणारा ताण न्यून होणे : ‘माझी वात प्रकृती आहे. त्यामुळे पाय, सांधे आणि पोटर्‍या यांमध्ये वेदना होत असतात. रात्री झोपल्यावर मध्यरात्री माझ्या पोटर्‍यांमध्ये गोळे येऊन मला जाग येत असे, तसेच सकाळीही माझ्या पायांमध्ये चमक (क्रँप) येऊन मला जाग येत असे; परंतु ५ मिनिटांचे व्यायाम केल्याने पोटर्‍यांमध्ये गोळे येणे न्यून झाले आणि पूर्वी कडक झालेल्या पोटर्‍या आता काही प्रमाणात मऊ झाल्या आहेत. वेदनांचेही प्रमाण न्यून झाले आहे, तसेच डोळ्यांच्या व्यायामांमुळे संगणकीय सेवा करतांना डोळ्यांवर येणारा ताण न्यून झाला आहे.’

३. श्री. अरुण कुलकर्णी, फोंडा, गोवा. 

३ अ. खांदे आणि मान दुखी न्यून होऊन उत्साह जाणवणे : ‘शारीरिक सेवा करतांना मला शारीरिक त्रास होत असत आणि उत्साह जाणवत नसे. माझे खांदे आणि मान दुखायची. ५ मिनिटांचे व्यायाम चालू केल्यानंतर माझे खांदे आणि मान दुखण्याचे प्रमाण न्यून झाले आहे, तसेच मला उत्साह जाणवू लागला आहे.’

४. डॉ. (सौ.) साधना जरळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा 

‘हे व्यायाम प्रकार केल्यामुळे ‘आधीपेक्षा माझी शारीरिक क्षमता काही अंशी वाढली आहे’, असे मला जाणवते.’

५. श्रीमती गीता प्रभु (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा  

‘मला माझ्या शरिरात हलकेपणा जाणवत आहे, तसेच शांत झोप लागत आहे.’

६. सौ. शुभांगी गवळकर (वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा. 

६ अ. संपूर्ण शरीर मोकळे झाल्यासारखे वाटून सेवेतूनही आनंद मिळणे : ‘दिवसातून एकदा व्यायाम करणे आणि सेवा करतांना प्रत्येक दोन घंट्यांनी व्यायाम करणे’, यांतील भेद माझ्या लक्षात आला. आम्ही दिवसभर सेवा करण्यासाठी सलग बसून असायचो. तेव्हा माझी मान, हात आणि पाय आखडून जायचे. घरी गेल्यावर तेलाने मर्दन करावे लागायचे. आता ५ मिनिटांचे व्यायाम केल्यापासून माझी केवळ मान आणि हात-पायच नाही, तर संपूर्ण शरीर मोकळे झाल्यासारखे वाटते. मला सेवेतून पुष्कळ आनंद मिळत आहे.’

७. श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘व्यायाम चालू केल्यापासून माझ्या सेवेची गती वाढू लागली. मला सेवेत आनंदही मिळू लागला.

आ. माझ्या मनातील सकारात्मक विचार वाढून मला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटू लागला.

इ. आता व्यायामामुळे मला भूक लागते, तसेच अन्नपचनही चांगले होते.’

८. सौ. कमल शिंदे (वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा 

‘व्यायामामुळे वेदना न्यून होऊन ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवत आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.६.२०२४)  

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷