श्रीमती चित्रा श्रीधर खटी यांना कमळाच्या नवीन रोपांना आलेल्या फुलांना पाहून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

श्रीमती चित्रा खटी यांच्या अंगणात उमललेले कमळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी लावलेल्या कमळाच्या रोपाला फूल उमललेले दिसणे आणि त्या फुलाकडे पाहून भावजागृती होणे

‘एक मासापूर्वी मी आमच्या घरी कमळाचे रोप लावले होते. तेव्हा त्या रोपावर १ कळी होती; पण ती उमलण्याआधीच गळून गेली. नंतर त्या रोपाला कळ्या आलेल्या दिसल्या. तेव्हा ‘त्या कळ्या नवरात्रीमध्ये उमलतील’, असा विचार माझ्या मनात आला.

२.१०.२०२४ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुळशीला पाणी घालण्यासाठी अंगणात गेले, तेव्हा मला कमळाचे एक फूल उमललेले दिसले. त्या फुलाकडे पाहून माझा भाव जागृत झाला. त्या फुलात मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवले. मी माझा मुलगा आणि सून यांना कमळाचे फूल पहायला बोलावले. तेव्हा त्यांनाही ते फूल पुष्कळ सात्त्विक असल्याचे जाणवले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. नवरात्रीमध्ये प्रतिदिन एक कमळाचे फूल उमलणे आणि ‘कमळाच्या रूपात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ घरी आल्या आहेत’, असे जाणवणे

श्रीमती चित्रा खटी

दुसर्‍या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता. त्या दिवशी कमळाची दुसरी कळी उमलली. तेव्हा ‘श्रीदेवी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि भूदेवी (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) कमळाच्या रूपात घरी आल्या आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर नवरात्रीमध्ये प्रतिदिन कमळाचे १ फूल उमलत होते. ते पाहून प्रतिदिन माझी दोन्ही देवींच्या स्मरणाने भावजागृती झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही अनुभूती माझ्याकडून लिहून घेतली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती चित्रा श्रीधर खटी (वय ७३ वर्षे), नागपूर (६.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक