MP Insults Jagadguru Rambhadracharya : (म्हणे) ‘ज्यांना डोळेच नाहीत, त्यांची पापे किती असतील !’

आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांची जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्यावर अश्लाघ्य टीका

खासदार चंद्रशेखर आझाद यांची जगद्गुरु रामभद्राचार्य (वर्तुळातील) यांच्यावर अश्लाघ्य टीका

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्यावर आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि नगिना येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांनी नाव न घेता ‘ज्यांना डोळेच नाहीत, त्यांची पापे किती असतील’, अशी अश्लाघ्य टीका केली.

बरेली येथे १७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या एका सभेत चंद्रशेखर बोलत होते. जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे नाव न घेता ते म्हणाले की, संत असलेल्या व्यक्तीला ना जात असते, ना धर्म. संत हा सर्वांचा असतो. मेरठ शहराचे नाते वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडले आहे. त्यामुळे त्या भूमीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणे अयोग्य आहे. मी ऐकले आहे, ‘त्यांना लहानपणापासून दिसतही नाही.’ ‘माणसाला पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचे फळ मिळते’, असेही आपण ऐकले आहे; मग मागील जन्मी त्यांनी किती वाईट कृत्ये केली असतील की, निसर्गाने त्यांना डोळेच दिले नाहीत. त्यांच्या पापांचे फळ किती असेल ? आणि लोक अशा अपराध्याकडून ज्ञान घेत आहेत !

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी मेरठ येथे आयोजित रामकथेच्या वेळी जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी पश्चिम उत्तरप्रदेशाला ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले होते. ‘आज हिंदूंवर मोठे संकट ओढवले आहे. येथे आल्यावर छोट्या पाकिस्तानात आल्यसारखे वाटते’, असेही त्यांनी म्हटले होते.

संपादकीय भूमिका

यातून आझाद यांची हिंदुद्वेषी मानसिकता यातून दिसून येते. हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि संत-महंत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍यांचा भरणा असलेल्या अशा पक्षांचे राजकीय अस्तित्व हिंदू निश्चितच संपवतील !