‘माझा मुलगा चायनीज खातो; पण घरी बनवलेले असते…’ एक ८ वर्षांच्या मुलाचे केस पांढरे झाले म्हणून आलेली एक आई तिच्या मुलाविषयी सांगत होती. घरी बनवलेले चायनीज असले, तर त्यात ‘एम्.एस्.जी.’ (मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटो – चव वाढवणारा रासायनिक पदार्थ) नसते. हे सोडले, तरी बाकी सोया सॉस आणि व्हिनेगर, खारट, आंबट तिखट चवी या असतात. विशेषतः लहान मुलांना हे खाणे चालू करायची आवश्यकताच नाही. ‘मंचाव सूप’, ‘हॉट अँड सोर सूप’, ‘हक्का नूडल’ हे सगळ्यांना आवडणारे पदार्थ आपल्या सगळ्यांना त्रासदायक आहेतच; पण लहान मुलांना ज्यांची पचनशक्ती चांगली व्हायची आहे, परिपक्वता यायची आहे, पूर्ण वाढ आणि आयुष्य बाकी आहे, त्यांना तरी अजिबात देऊ नये. असे सांगण्यामागील कारण येथे देत आहे.

१. ‘हायड्रोलाईज्ड सोय प्रोटीन’मुळे होणारी शारीरिक हानी
खरा सोया सॉस १३ ते १४ मासांपेक्षा अधिक दिवस अम्लीकरण करून बनवला जातो, जो बनवायला लागणार्या क्लिष्टतेमुळे मिळतच नाही. या सगळ्यामुळे आपल्याकडे सोया सॉस मिळतो तो अतिशय शक्तीवान अशा ‘हायड्रोक्लोरिक ॲसिड’पासून बनवला जातो. हा ‘फेक’ (बनावट वा खोटा) सोया सॉस काही दिवसांतच बनतो, त्यामुळे बाजारात पुरवठा करायला सोपा आहे. ‘हायड्रोक्लोरिक ॲसिड’च्या वापराने ‘३-एम्.सी.पी.डी.’ (३-मोनोक्लोरोप्रोपेन डायओल) हे रसायन सिद्ध होते, जे ‘अँटी फर्टिलिटी’ (वंध्यत्व), म्हणजेच मूल जन्माला घालण्याच्या शक्तीला न्यून करते. यासह हे रसायन किडनी, मज्जासंस्था यांसाठी त्रासदायक, तसेच कर्करोगाला निमंत्रण देणारे आहे. पदार्थाच्या वेष्टनावर (लेबलवर) ‘हायड्रोलाईज्ड सोय प्रोटीन’ किंवा ‘व्हेजिटेबल प्रोटीन’, म्हणजे या पद्धतीने सिद्ध केलेला सॉस, असे लिहिलेले असते.

२. ‘एम्.एस्.जी.’ आणि चायनीज चवींचा मानवी शरिरावर होणारा परिणाम
हॉटेलमध्ये चायनीज खातांना त्यामध्ये ‘अजिनोमोटो’ / ‘एम्.एस्.जी.’ घालतात कि नाही, हा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न. ‘उमामी चव’ (स्वादिष्ट चवदार चव) ही एक विशिष्ट प्रकारची तिखटसदृश, जिभेवर रेंगाळणारी, तसेच पदार्थाची चव वाढवणारी आणि पदार्थाला चव येण्यासाठी याचा वापर केला जातो. उपाहारगृह मालकांना ‘अजिनोमोटो घातले आहे कि नाही ?’, ही सूचना स्पष्टपणे लिहिणे नियमाधीन आहे; पण बर्याचदा हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. ‘एम्.एस्.जी.’ वापरायला अटकाव घालणार्या अन्न निरीक्षक (फूड इन्स्पेक्टर) व्यक्तींपासून कायद्याने सुरक्षितता आणि आधार देण्याचे कामही ‘एम्.एस्.जी.’ बनवणारी आस्थापने करत आहेत, जेणेकरून याच्या वापरावर गदा येऊ नये. ऊस, कॉर्न (मका) अशा स्टार्ची पदार्थांपासून ‘फर्मेंटेशन’ने (फसफसण्याची क्रिया) बनवले जाणारे, हे एक प्रकारचे मीठ आहे. याला ‘चायनीज सॉल्ट (मीठ)’ असेही म्हणतात. स्थूलता, मज्जासंस्थेवर घातक परिणाम, तसेच प्रजनन क्षमता न्यून करणार्या अनेक हानिकारक गोष्टींशी या रासायनिक द्रव्याचा संबंध जोडला गेला आहे. चायनीज चवींमध्ये सगळ्यात अधिक प्रमाणात आंबट, खारट आणि तिखट चवी असतात, जे केस, डोळे, त्वचा यांच्या आरोग्यापासून शरिरात ते निरनिराळे दाह उत्पन्न करायला कारणीभूत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेले ‘ग्राम्याहार’ हे लिखाण वाचले, तर लक्षात येईल (‘ग्राम्याहार’ म्हणजे आयुर्वेदानुसार हानिकारक पदार्थ). हे दाह सध्याच्या ‘इन्फ्लेमेशन’ (जळजळ) या शब्दाशी संलग्न आहेत. या वजन वाढीसारख्या लक्षणांपासून ‘ऑटोइम्युन’ (स्वतःची प्रतिकार शक्ती स्वतःवरच आघात करते) आजारांपर्यंत निरनिराळ्या आजारांना निमंत्रण मिळते.

३. प्लास्टिकमधील खाणे किंवा प्लास्टिक बाटल्यांमधून पाणी पिणे टाळणे महत्त्वाचे !
‘क्वीन’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना म्हणते, ‘मेरे अंकलने कभी शराब नही पी, सिगारेट नही पी, फिर भी उनको कॅन्सर हुआ’, हे टाळ्या घेणारे वाक्य वाटले, तरी त्याला खोली काहीही नाही, हे लक्षात घ्या. दारू, सिगारेट सोडूनही इतर असंख्य कर्करोगजन्य गोष्टींनी स्वतःच्या आयुष्यात कधीच प्रवेश केला आहे. त्यात ‘फूड डिलिव्हरी ॲप’वरून (अन्नपदार्थ घरपोच देणार्या प्रणालीवरून) मागवले जाणारे प्लास्टिकमधील खाणे असो किंवा प्लास्टिक बाटल्यांमध्ये प्यायले जाणारे पाणी, हे जेवढे टाळता येते, तेवढे तरी करावे आणि किमान संपूर्ण आयुष्य जायचे असणार्या स्वतःच्या मुलांना वारंवार या गोष्टी देतांना फारच सजग रहावे. नाईलाजाने क्वचित् द्यायला लागले, तरी मुलांना याविषयी सतत सांगत रहावे. ठाऊक असूनही स्वेच्छेने तरी या गोष्टी करू नये, असे एक वैद्या आणि एक आई म्हणून कळकळीने वाटते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१७.९.२०२५)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !