Yale University USA : आयात शुल्कवाढीच्या निर्णयानंतर अमेरिकेत तब्बल ९ लाख लोक गरीब होतील !

अमेरिकेतील येल विश्‍वविद्यालयाचा दावा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – डॉनल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या निर्णयानंतर अमेरिकेत तब्बल ९ लाख लोक गरीब होतील, असा दावा अमेरिकेतील येल विश्‍वविद्यालयाच्या अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताच विशेष परिणाम होणार नाही !

‘ग्लोबल रेटिंग’ यंत्रणेच्या म्हणण्यानुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ६.५ टक्क्यांपासून वाढून ६.९ टक्के झाले. यामध्ये अमेरिकेत होणार्‍या निर्यातीचा केवळ २ टक्के वाटा आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, भारतावर या शुल्कवाढीचा काही विशेष परिणाम होणार नाही. अमेरिकेतील निर्यात अल्प झाली असली, तरीही इतर देशांनी भारतीय वस्तूंचे त्यांच्या बाजारपेठेत स्वागत केले.

वाढीव आयात शुल्क आणि गरिबी यांचा संबंध समजून घ्या !

अमेरिकेने अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क लादले आहे. यामुळे अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंचे मूल्य साहजिकच वाढले आहे. अमेरिका अनेक वस्तूंवर पूर्णपणे आयातीवरच अवलंबून आहे. उदाहरणार्थ मँगेनीज, ग्रॅफाईट, गॅलियम, टँटेलम आदी महत्त्वपूर्ण खनिजे अमेरिकेला आयातच करावी लागतात. त्यामुळे त्यांपासून उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी अमेरिकी नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. एकूण महागाईत वाढ झाल्याने एकप्रकारे साधारण परिस्थिती असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्या गोष्टी परवडणार नाहीत. थोडक्यात सांगायचे, तर त्यांची खरेदी करण्याची क्षमताच अल्प झाल्याने ते एकप्रकारे गरीब होतील.

संपादकीय भूमिका

डॉनल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे तुघलक ठरले असून ते अमेरिकेची प्रगती करण्याऐवजी तिला अधोगतीकडेच नेत आहेत. अमेरिकी नागरिक या संदर्भात अद्याप शांत का आहेत ? हाच प्रश्‍न आहे !