‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात. त्यामुळे श्राद्धविधींवर टीका करणार्यांना उत्तर देता यावे, यासाठी माहिती देणारा लेख येथे देत आहोत.
संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१. अन्य पंथांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी केल्या जाणार्या पारंपरिक कृती !
१ अ. पारशी पंथ : पारशी बांधवांच्या ‘पतेती’ या मुख्य सणानिमित्त वर्षातील शेवटचे ९ दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात. दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाला प्रारंभ होतो. हिंदु संस्कृतीत आत्मा ‘अमर’ मानला आहे, तीच धारणा पारशी समाजात दिसून येते. ‘अवेस्ता’मध्ये (पारशींचा धर्मग्रंथ) पितरांना ‘फ्रावशी’ म्हटले असून ‘दुष्काळाच्या वेळी ते स्वर्गातील सरोवरांतून त्यांच्या वंशजांसाठी पाणी आणतात’, असे मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी ९ दिवस वेगवेगळे विधी केल्यानंतर शेवटच्या दिवशी ‘पतेती’ साजरी केली जाते. पारशी लोकांची मूळ देवता ‘अग्नि’ असल्याने ते अग्नीची पूजा करतात. यामध्ये जळत्या अग्नीत चंदनाची लाकडे टाकली जातात. ‘पतेती’ म्हणजे पापातून मुक्त होण्याचा दिवस ! ‘पापेती’ म्हणजे पापाचे नाश करणारा दिवस. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘पतेती’ असा झाल्याचे जाणकार सांगतात. साधारणपणे ऑगस्ट मासात हा कालावधी येतो.

१ आ. कॅथॉलिक पंथ : अमेरिका, लॅटीन अमेरिका आणि युरोप यांतील अनेक देशांमध्ये नोव्हेंबर मासात पितरांना तृप्त करण्याची प्रथा आहे. हा पूर्वजांच्या आत्म्याशी संबंधित दिवस असला, तरी त्याला उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची प्रथा आहे. ३१ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून ते २ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यात ३१ ऑक्टोबरच्या सायंकाळी ‘हॅलोवीन यात्रा’ (यातील ‘हॅलो’ हा ‘होली’ म्हणजे पवित्रचा अपभ्रंश आहे.) काढली जाते.
१ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सेंट्स डे’ (सर्व संत दिन), तर २ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’ (सर्व आत्मा दिन) असतो. या काळाला ‘हॅलो मास’ म्हणजेच ‘पवित्र काळ’ असेही म्हटले जाते.
ख्रिस्ती पंथातील हा उत्सव असला, तरी त्याचे मूळ ख्रिस्तपूर्व काळातील मूर्तीपूजक रोमन संस्कृतीशी जोडलेले आहे. रोमन लोक मृतांच्या आत्म्यास संतुष्ट करण्यासाठी सार्वजनिक बलीदानांसह ‘लेमुरिया’ नावाचा सण साजरा करत असत. ते स्मशानात जाऊन तेथील मृतात्म्यांना केक आणि वाईन अर्पण करत असत. कालांतराने चर्चने या दिवसाला ‘ऑल सोल्स डे’ म्हणून स्वीकारून साजरा करणे प्रारंभ केले. हा उत्सव २ नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो.
१ आ १. ‘ऑल सेंट्स डे’ : या दिवशी स्वर्गप्राप्ती झालेल्या ज्ञात-अज्ञात सर्व पूर्वजांचे, संतांचे स्मरण केले जाते. या दिवशी शासकीय सुटी घोषित केली जाते.
१ आ २. ‘ऑल सोल्स डे’ : मरण पावलेल्या; परंतु स्वर्गप्राप्ती न झालेल्या ज्ञात-अज्ञात सर्व पूर्वजांचे पापक्षालन व्हावे, यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते.
काही देशांत पितरांच्या आगमनाच्या आनंदात तेथे ‘सोल केक’ नावाचा गोड पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तेथील लोकांचा विश्वास आहे की, तो पदार्थ खाल्ल्यामुळे परलोकामध्ये रहाणार्या मृतात्म्यांना सुख आणि शांती यांची प्राप्ती होते.
१ इ. बौद्ध पंथ : चीनच्या बुद्धीस्ट आणि ताओ परंपरेनुसार चिनी दिनदर्शिकेच्या ७ व्या मासातील १५ व्या दिवशी पूर्वजांच्या संदर्भात ‘घोस्ट फेस्टिव्हल’ (भूतांचा/मृतांचा उत्सव) किंवा ‘युलान फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. ऑगस्ट ते सप्टेंबर मासाच्या कालावधीत हा दिवस येतो. या ७ व्या मासाला ‘घोस्ट मास’ (भूतांचा/मृतांचा मास) म्हणून ओळखले जाते. या काळात ‘स्वर्गातील, तसेच नरकातील पूर्वजांचे आत्मे भूतलावर येतात’, अशी तेथील मान्यता आहे. या काळात पूर्वजांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात परंपरागत भोजन बनवणे (बहुतांश शाकाहारी), धूप जाळणे, ‘जॉस पेपर’ (बांबूच्या कागदापासून बनवलेले आत्म्याचे चलन/धन) जाळणे आदी केले जाते. या कागदापासून वस्त्र, सोन्याच्या दागिन्यांचे प्रतीक असणारे दागिने आदी बनवून जाळले जातात. या वेळी भोजन करतांना ‘पूर्वज जणूकाही तेथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत’, अशा प्रकारे त्यांच्यासाठी आसन रिकामे ठेवून त्यांना भोजन वाढले जाते. रात्री कागदी नाव, तसेच दिवे पाण्यात सोडून पूर्वजांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बौद्ध परंपरा असणार्या बहुतांश देशांत हा उत्सव थोड्याफार फरकाने साजरा केला जातो.
२. विदेशातील विविध देशांत पूर्वजांच्या आत्म्यासाठी केल्या जाणार्या पारंपरिक कृती
२ अ. युरोपातील देशांत पूर्वजांच्या शांतीसाठीच्या विविध कृती
२ अ १. बेल्जियम : २ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’च्या दिवशी सुटी नसल्याने आदल्या दिवशी म्हणजे ‘ऑल सेंट्स डे’च्या दिवशी दफनभूमीत जाऊन प्रार्थना करतात, तसेच मृताम्यांच्या कबरीवर दिवा लावला जातो.
२ अ २. पोर्तुगाल : २ नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण परिवारासह दफनभूमीत जाऊन प्रार्थना केली जाते. तसेच सायंकाळी लहान मुले जमून प्रत्येक घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थांबतात. तेथे त्यांना केक आदी मिष्टान्न दिले जाते.
२ अ ३. जर्मनी : जर्मनीमध्ये कबरींची रंगरंगोटी केली जाते, भूमीवर कोळसा पसरवून त्यावर लाल रंगाच्या बोरांनी चित्र काढले जाते आणि कबरींना फुले अन् कळ्या यांच्या माळांनी सजवले जाते. शेवटी सर्व जण मिळून प्रार्थना करतात.
२ अ ४. फ्रान्स : फ्रान्समध्ये चर्चच्या रात्रकालीन प्रार्थनेच्या शेवटी लोकांनी त्यांच्या पितरांच्या संदर्भात चर्चा करणे आवश्यक समजले जाते. त्यानंतर ते त्यांच्या घरी भोजनगृहामध्ये एक नवीन पांढरे वस्त्र पसरवतात आणि त्यावर सरबत, दही, पक्वान्न आदी ठेवून सजावट करतात, तसेच जवळच अग्नीपात्रामध्ये लाकडाचा एक मोठा बुंधा जळण्यासाठी ठेवतात. त्यानंतर लोक झोपायला निघून जातात. थोड्या वेळाने व्यावसायिक वादक वाद्ये वाजवून त्यांना झोपेतून जागे करतात आणि मृतात्म्यांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतात. त्या वेळी सजावटीतील सर्व खाद्यपदार्थ त्या वादकांच्या प्रमुखाला अर्पण करतात.

३. लॅटीन अमेरिकेतील देशांत केल्या जाणार्या पारंपारिक कृती
३ अ. लॅटीन अमेरिकेतील ब्राझिल, अर्जेंटिना, बोलिविया, चिली, इक्वाडोर, पेरू, उरुग्वे आदी देशांत २ नोव्हेंबर या दिवशी लोक दफनभूमीत जाऊन त्यांच्या पूर्वजांना, तसेच नातेवाइकांना फुले अर्पण करतात.
३ आ. मेक्सिको : या देशात याला ‘मृतांचा दिन’ म्हणून ओळखले जाते. याला स्थानिक भाषेत ‘अल् देओ दे लॉस मुर्ताेस’ असे नाव आहे. हा मूळ उत्सव ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपूर्वीच्या काळातील ‘ॲझटेक’ या मूर्तीपूजकांचा असल्याचे मानले जाते. स्पेनने आक्रमण करून ही संस्कृती संपवली. सध्याच्या काळात तो मूळ मेक्सिकन, युरोपियन आणि स्पॅनिश संस्कृती यांच्या संमिश्र परंपरेतून साजरा केला जातो. यात १ नोव्हेंबर या दिवशी बालपणी मृत झालेल्यांसाठी, तर २ नोव्हेंबरला वयस्कर मृतांसाठी प्रार्थना केली जाते.
३ इ. ग्वाटेमाला : या दिवशी मांस आणि भाज्या यांपासून ‘फियांब्रे’ नावाचा पदार्थ करून तो मृतांच्या थडग्यांवर ठेवला जातो. तसेच या दिवशी पतंग उडवण्याचा विशेष उत्सव असतो. मृतात्म्यांशी संबंध जोडण्याचे प्रतीक म्हणून हे पतंग उडवले जातात.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
संपादकीय भूमिकाभारतात केल्या जाणार्या श्राद्धविधींविषयी टीका करणारे कथित पुरो(अधो)गामी विदेशात केल्या जाणार्या पितरांच्या शांतीविषयी काही बोलतील का ? |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/956753.html
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !