देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत !

११ सप्टेंबर या दिवशी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने …

भारतात सर्वाधिक अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत, त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर पंतप्रधान येतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकारांची मर्यादा स्पष्टपणे ठरवलेली आहे; पण एक व्यक्ती अशी आहे, ज्यांच्या अधिकारांची मर्यादा निश्चित नाही. ते सामान्य लोकांप्रमाणेच रहातात, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे ११ सप्टेंबर या दिवशी ७५ वर्षांचे झाले आहेत. हे तेच डॉ. भागवत आहेत, ज्यांनी भारताला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातून नरेंद्र मोदी यांच्या युगात आणले. वर्ष २०१४ मध्ये डॉ. भागवत यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठीचे सर्व प्रस्ताव फेटाळून लावले आणि अखेर मोदीच पंतप्रधान झाले.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

१. रा.स्व. संघाचे कार्य व्यापक स्तरावर करण्यात अग्रणी !

जेव्हा डॉ. मोहनजी भागवत संघाचे प्रमुख झाले, तेव्हा भाजपची परिस्थिती पुष्कळच वाईट होती. संघाच्या सरस्वती शिशु मंदिर शाळा जुन्या झाल्या होत्या, तर शेतकरी संघटनांवर साम्यवाद्यांचे वर्चस्व वाढले होते. डॉ. भागवत हे असे पहिले संघप्रमुख होते, ज्यांनी राजकारणातील जोडतोड जवळून पाहिली. काँग्रेसमधून भाजपमध्ये येणार्‍या नेत्यांचे ते समर्थक नव्हते; पण त्यांनी स्वतःचा विरोधही घोषित केला नाही. उलट जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये आले, तेव्हा ‘घरी पुन्हा स्वागत आहे’, असे विधान केले.

डॉ. मोहनजी भागवत यांच्या नेतृत्वाखालीच संघाने स्वतःच्या शाळांमध्ये इंग्रजीलाही महत्त्व द्यायला प्रारंभ केला. डॉ. भागवत यांनी प्रसिद्धीचे महत्त्वही ओळखले. त्यांची अनेक भाषणे इंग्रजीमध्येही आहेत की, जी आज सहज ऐकण्यास उपलब्ध आहेत. यामुळे त्यांचे विचार परदेशांपर्यंत पोचले. आज संघ जितका व्यापक झाला आहे, तितका तो पूर्वी कधीच नव्हता. आज महिला, शेतकरी आणि विद्यार्थी या तिन्ही वर्गांमध्ये संघाच्या संघटनांचे मोठे काम चालू आहे.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

२. प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत स्वतः एक मापदंड !

भाजप आज जितका बळकट आहे, तितका तो पूर्वी कधीच नव्हता. त्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांना नक्कीच जाते; पण डॉ. मोहनजी भागवत यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही त्यांच्या काही विधानांवर टीका करू शकता; पण ‘किंग मेकर’ म्हणून त्यांनी जी भूमिका बजावली आहे, त्याला तोड नाही.

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि पू. गोळवलकरगुरुजी यांच्याशी त्यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही; कारण डॉ. भागवत स्वतः एक मापदंड बनले आहेत. संघाच्या इतिहासातील कोणताही अध्याय त्यांच्या उल्लेखाविना पूर्ण होणार नाही, तसेच ते पहिले संघप्रमुख आहेत, ज्यांनी ७५ वर्षे पूर्ण होऊनही पदावर काम चालू ठेवले आहे.

आज भारत देश जागतिक शक्तींच्या बरोबरीने उभा आहे. याचे श्रेय नेतृत्वाला आणि ते नेतृत्व सिद्ध करणार्‍या व्यक्तीलाही जाते. देशाला नरेंद्र मोदींसारखा नेता दिल्याकारणाने देशाचे भविष्य नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आभारी राहील ! प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे मार्गदर्शन देशासाठी कायम उपलब्ध राहो, हीच सदिच्छा !

– जयसिंग मोहन, पुणे