निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक क्र. ८३
‘मानदुखीविषयी वेगळे काही सांगायला नको. आपल्यापैकी अनेकांना कधीतरी ‘मानेत दुखणे’ जाणवले असेलच. काही जणांना अधिक तीव्रतेचे त्रास झाले असतील, तर काहींना लहान-सहान दुखणे होऊन बरेही झाले असेल; पण याविषयी आणखी जाणून घेतले, तर असलेला त्रास न्यून करणे, तसेच पुढे होणारे त्रास टाळणे शक्य होऊ शकेल.

१. मानदुखीची लक्षणे
१ अ. सर्वसामान्य लक्षणे : मानदुखीची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात. काहींना केवळ मानेत जडपणा जाणवतो आणि मानेच्या हालचाली करतांना त्रास होतो, तर काहींची वेदना खांद्यात, हातात किंवा बोटांपर्यंत जाते. काहींना कधी ‘सुन्नपणा, मुंग्या येणे, अशक्तपणा’, असे त्रास होतात किंवा हातांची हालचाल करतांना त्रास जाणवतो. अशा लक्षणांसह जर डोकेदुखी, चक्कर येणे, झोपेत अडथळा किंवा चिडचिड वाढणे, असे होत असेल, तर हा त्रास मानसिक आणि भावनिक पातळीवरही परिणाम करत आहे, याचे हे संकेत असू शकतात.
अशा वेदना काही वेळाने न्यून होतात; पण कधी कधी त्यामागे गंभीर कारणे असतात. विशेषतः अपघातानंतर जर अकस्मात् मान दुखायला लागली किंवा ताप येण्यासह मानेत तीव्र वेदना झाली, तर तातडीने वैद्यांशी संपर्क साधणे आवश्यक असते. जर हा त्रास काही आठवडे न्यून होत नसेल, हातापर्यंत पसरत असेल, डोकेदुखी किंवा चक्कर यांसारखी लक्षणे असतील, तर लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.
‘मानेत वेदना होणे, खांद्यात आणि हातात वेदना होणे, हाताला मुंग्या येणे, बधीरपणा येणे, जडपणा येणे, भाजल्यासारखे होणे’, अशी लक्षणे सर्वसामान्य आहेत. विशेष म्हणजे ‘ही लक्षणे मानेशी संबंधित आहेत’, हे प्राथमिक टप्प्याला लक्षात येत नाही.

१ आ. अन्य लक्षणे
आ १. चक्कर येणे : मानेच्या त्रासामुळे बर्याच वेळा चक्कर येऊ शकते. मानेची हालचाल केल्यावर चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कामात पुष्कळ अडचणी येतात. काही वेळा बसणे किंवा झोपणे, असे एकाच स्िथतीत रहावे लागते.
आ २. कानाचे त्रास होणे : कानामध्ये एक प्रकारचा आवाज येत रहातो. याला ‘टिनिटस’ म्हणतात किंवा काही वेळा ऐकू येण्याचे प्रमाणही न्यून होते. कानाला सारखे दडे बसतात.
आ ३. पचनसंस्थेचे त्रास : मानेच्या त्रासामुळे ‘अन्न गिळायला त्रास होणे, पित्त वर येणे, अपचन होणे, पोट साफ न होणे, पोटात जंतूसंसर्ग होणे’, अशा प्रकारचे त्रासही होऊ शकतात.
आ ४. श्वसनाचे त्रास : मानेतील श्वसनाशी संबंधित नस दबली गेल्यास श्वसनाशी संबंधित त्रास होऊ शकतात. यांमध्ये ‘फुप्फुसांची क्षमता न्यून होणे, छातीच्या स्नायूंची हालचाल न्यून होणे, खोलवर श्वास घेता न येणे’, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात.
आ ५. अन्य गंभीर आजार होणे : कधी कधी मानदुखी ही काही गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते, उदा. मेंदूच्या आवरणाला येणारी सूज (मेनिंजायटिस), काही प्रकारचे कर्करोग, जबड्याचे विकार, संधीवात (रूमॅटोइड आर्थरायटिस). त्यामुळे अशा वेदनांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
१ इ. मानदुखीचे परिणाम : मानदुखीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. मानदुखीमुळे आपल्याला चालणे, खेळणे, घरकाम करणे किंवा संगणकावर काम करणे अशक्य होते. त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित होत नाही आणि सतत वेदना होत असल्यामुळे थकवा अन् चिडचिड वाढते. त्यामुळे काही वेळा आपण सामाजिक कार्यक्रम टाळतो, मित्रांपासून दूर रहातो आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
२. मानदुखीवरील उपाय
काळजीपूर्वक आणि नियमितपणे आपली मान सांभाळणे, भ्रमणभाष किंवा संगणक वापरतांना मान सरळ ठेवणे, योग्य उंचीची उशी वापरणे, काही वेळाने हलणे-फिरणे, हलका व्यायाम करणे, मन शांत ठेवण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करणे इत्यादी सवयी अंगीकारल्यास मानदुखी टाळता येऊ शकते. मानेच्या वेदना कायम रहात असतील किंवा हातापर्यंत पसरत असतील, तर वैद्यांचा सल्ला घ्यायला विलंब करू नका.
मानदुखी ही सामान्य; पण दुर्लक्षित समस्या आहे. तिच्याविषयी थोडी जागरूकता, योग्य सवयी आणि वेळेवर सल्ला घेतल्यास वेदना टाळता किंवा न्यून करता येतात. आपली मान हा शरिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तिची काळजी घेणे, म्हणजे आपल्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी घेणे होय. ‘ती कशी घ्यायची ?’, हे पुढील लेखात पाहूया.’
(क्रमशः पुढच्या बुधवारी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (१३.८.२०२५)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !