Odisha High Court :  मंदिराच्या भूमीवर दीर्घकाळ राहिल्याने संबंधित व्यक्ती मालक बनत नाही ! – ओडिशा उच्च न्यायालय

मंदिर प्रशासनाचा अतिक्रमण हटवण्याचा आदेश वैध असल्याचा निर्वाळा

कटक – ओडिशा उच्च न्यायालयाने भगवान जगन्नाथांची पवित्र ‘अमृतमनोही भूमी’वर अतिक्रमण करणार्‍यांच्या बाजूने निकाल देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीने मंदिराची भूमी केवळ दीर्घकाळ नियंत्रणात ठेवल्याने ती व्यक्ती त्या भूमीची मालक होऊ शकत नाही. हा निर्णय न्यायमूर्ती संजीव कुमार पाणिग्रही यांच्या खंडपिठाने दिला. कटक सदर परिसरात रहाणार्‍या कामगार कुटुंबाची याचिका खंडपिठाने फेटाळून लावली. हे कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून या भूमीवर रहात होते आणि आता मालकी हक्क मागत होते.

१. ही भूमी भगवान श्री जगन्नाथ यांच्या नावाने ‘अमृतमनोही’ म्हणून नोंदणीकृत आहे आणि श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन, पुरी याच्या अंतर्गत आहे. जेव्हा निष्कासनाची सूचना आली तेव्हा लोकांनी मंदिर प्रशासनाकडून भूमी खरेदी करण्याची अनुमती मागितली. या लोकांनी दावा केला की, ते बराच वर्षांपासून तेथे रहात आहेत.

२. न्यायालयाने म्हटले की, मंदिराची ‘अमृतमनोही’ भूमी ही सामान्य सरकारी भूमी नाही आणि सामान्य नियमांनुसार ती विकता येत नाही. ही भूमी धार्मिक आणि सार्वजनिक दृष्टीने महत्त्वाची आहे. केवळ ते तेथे बराच काळ रहात आहेत; म्हणून संबंधित व्यक्तींना मालकी हक्क देता येत नाही.

३. न्यायालयाने मंदिर प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला आणि अतिक्रमण हटवण्याचा आदेश वैध असल्याचे म्हटले आहे.