Katz Warns Hamas : शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा गाझाच्या आणि स्वतःच्या विनाशाला सामोरे जा !

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची हमासला चेतावणी

हमासला ‘शेवटची चेतावणी’

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी ८ सप्टेंबरला हमासला ‘शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा गाझाच्या आणि स्वतःच्या विनाशाला सामोरे जा’, अशी चेतावणी दिली. काट्झ यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले की, गाझा शहराच्या आकाशात एक शक्तीशाली वादळ धडकेल. गाझा आणि परदेशातील आलिशान हॉटेल्समध्ये रहाणार्‍या हमासच्या आतंकवाद्यांना ही अंतिम चेतावणी आहे. इस्रायली ओलिसांना सोडा आणि तुमची शस्त्रे खाली ठेवा. इस्रायली सैन्याने ८ सप्टेंबरच्या सकाळपासून केलेल्या आक्रमणात ५० जण ठार झाले आहेत. यांतर्गत गाझा शहरातील अनेक उंच इमारतींवर बाँबद्वारे आक्रमण करण्यात आले.

निणार्यकपणे पराभूत करण्याची सिद्धता !

काट्झ म्हणाले की, ‘इस्रायल डिफेन्स फोर्सेस’ त्यांच्या नियोजित योजनेनुसार काम करत आहेत. गाझाला निर्णायकपणे पराभूत करण्यासाठी युद्धाचा विस्तार करण्याची सिद्धता केली जात आहे. डॉनल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या ओलिसांना सोडण्यासाठी हमासला ‘शेवटची चेतावणी’ म्हणून केलेल्या वक्तव्यानंतर काट्झ यांचे हे विधान आले आहे.

अमेरिकेचा नवीन प्रस्ताव !

ट्रम्प म्हणाले होते की, इस्रायलींनी माझ्या अटी मान्य केल्या आहेत. हमासनेही स्वीकारण्याची वेळ आली आहे. मी हमासला न स्वीकारण्याच्या परिणामांवरून चेतावणी दिली आहे. ही माझी शेवटची चेतावणी आहे. अमेरिकेतील ‘अ‍ॅक्सिओस’ या वृत्तसंस्थेने सांगितले की, व्हाईट हाऊसचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी गेल्या आठवड्यात हमासला गाझातील ओलीस आणि युद्धबंदी करार, यांविषयी एक नवीन प्रस्ताव पाठवला होता. यानुसार इस्रायलच्या कारागृहांत असलेल्या २ ते ३ सहस्र पॅलेस्टिनी बंदीवानांच्या बदल्यात गाझामधील सर्व इस्रायली ओलिसांची त्वरित सुटका आणि गाझामध्ये युद्धबंदी होईल.

दुसरीकडे हमाससमर्थक प्रसारमाध्यम ‘अल्-जझीरा’च्या मते हमासचे नेतेसुद्धा युद्धबंदी करण्यासाठी चर्चा करण्यास सिद्ध आहेत. युद्धाच्या समाप्तीची स्पष्ट घोषणा, गाझा पट्टीतून पूर्णपणे माघार आणि गाझा पट्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र पॅलेस्टिनींची एक समिती स्थापन करण्याची हमासची मागणी आहे.