हरित गोव्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ मोहीम
डिचोली, ६ जून (वार्ता.) – हरित, स्वच्छ आणि नितळ गोवा साकारण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यावश्यक असून निसर्ग संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे सामाजिक दायित्व आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण मित्र, लोकप्रतिनिधी, तसेच विविध अधिकार्यांशी व्हर्च्युअल (आभासी) माध्यमातून संवाद साधला. या वेळी त्यांनी वृक्ष लागवड मोहीम, महामार्ग सुरक्षा, अतिक्रमणापासून मुक्त रस्ते, कचरा व्यवस्थापन या सूत्रांवर महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी मांडलेली सूत्रे खालीलप्रमाणे आहेत.
१. ‘एक पेड माँ के नाम’ या राज्यव्यापी उपक्रमाच्या अंतर्गत पुढील ३ महिन्यांत १० लाख झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. राज्यात विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असून पावसाळ्यांत ही झाडे जिवंत रहावीत, यासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. स्वच्छता आणि निसर्ग रक्षण हे केवळ सरकारचे उत्तरदायित्व नसून विद्यार्थी, पालक, सरकारी कर्मचारी, सामाजिक संस्था या सर्वांच्या सहभागातून ही चळवळ यशस्वी होईल. जैविक संपत्ती जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ हरित कॉरिडॉर (रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावणे) म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.’’
२. हरित स्वच्छ आणि नितळ गोवा यासाठी विशेष योगदान देणार्या संस्था आणि घटक यांचा १९ डिसेंबर या दिवशी राज्य सरकारकडून गौरव करण्यात येईल.
३. रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत स्टॉल्समुळे (छोट्या दुकानांमुळे) अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे स्टॉल्स उभारणे टाळावे.
४. राज्यातील अनेक भाड्याच्या इमारती आणि निवासस्थाने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंचायतींनी अशा भाडेकरूंच्या वास्तूंवर स्वतंत्र कचरा कर आकारावा आणि त्या परिसरातून नियमित कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी अधिक सक्रीय भूमिका घ्यावी.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान