रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण

पोलिसांनी मुसलमानाचा एक अवैध स्टॉल पाडला

मंदिर परिसरातील हटवण्यात आलेला स्टॉल

मडगाव, ६ जून ( वार्ता.) – रुमडामळ, मडगाव येथील हाऊसिंग बोर्ड भागात असलेले श्री मारुति मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर (समर्थ गड) यांच्या परिसरातील एका स्टॉलवर गोरक्षक भगवान रेडकर यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना घायाळ केले. बजरंग दलाचे निमंत्रक विराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जूनच्या रात्री खाद्यपदार्थ मागायला गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला स्टॉलचा मालक इम्रान (सलमान) रजा यांनी शिवीगाळ केली. त्या वेळी कार्यकर्त्याने गोरक्षक भगवान रेडकर यांना तेथे बोलावल्यावर मुसलमानांनी त्याच्यावर आक्रमण केले.

या विरोधात ६ जून या दिवशी बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात श्री मारुति मंदिराजवळ एकत्र येऊन चौकशी केली असता जेली इमारतीच्या वाहनतळात असलेला हा स्टॉल अवैध असल्याचे लक्षात आले. या अवैध मांसाहारी आणि बीफ (गोमांस) विक्रीच्या स्टॉल्सच्या विरोधात बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतांना निमंत्रक विराज देसाई यांनी मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तेथील एका स्टॉलवर कारवाई करत तो स्टॉल पाडला.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पवित्र अशा श्री मारुति मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर यांच्या अगदी जवळ हे अनधिकृत स्टॉल्स आहेत. मंदिराच्या एवढ्या जवळ मांसाहारी खाद्यपदार्थ आणि बीफची विक्री होत असल्याने स्थानिक रहिवासी अन् दर्शनासाठी येणारे भाविक यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारीत या स्टॉल संदर्भातील इतर समस्याही नोंद करण्यात आल्या.

बजरंग दलाने पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, या स्टॉल्सधारकांकडे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने आणि कायदेशीर संमती आहे का, याची त्वरित चौकशी करण्यात यावी. जर हे स्टॉल्स अवैध आढळले, तर ते तातडीने तेथून हटवून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दवर्ली ग्रामपंचायतीनेही हे स्टॉल अवैध ठरवून ते हटवण्याची नोटीस काढली आहे.

याविषयी पोलीस निरीक्षक कपिल नाईक यांनी माहिती दिली की, अवैध स्टॉल्सचे परवाने पडताळण्यासाठी आरोग्य खाते, वीज खाते, अग्नीशमनदल आणि संबंधित इतर शासकीय कार्यालये येथे पत्र पाठवणार आहे. तक्रारीची नोंद घेऊन मंदिर परिसरातील एक स्टॉल त्वरित हटवल्याबद्दल विराज देसाई यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.