
मुंबई, ६ जून – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी कार्यवाहीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘राज्यातील सर्व एस्.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे अथवा त्यांना उतरवणे यावर बंदी असेल. या नियमाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे’, असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. मोहिमेअंतर्गत ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत सर्व विभागांमध्ये संयुक्त पडताळणी आणि कार्यवाही मोहीम राबवण्यात येणार आहे. तसे परिपत्रक महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने जारी केले आहे.
मोहीम दायित्वाने राबवण्याचे आवाहन !
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाची आर्थिक हानी होते; पण प्रवाशांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. बसस्थानक परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षा लक्षात घेता सर्व अधिकार्यांनी मोहीम दायित्वाने राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले आहे.
या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, साहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, तसेच सुरक्षा आणि दक्षता विभागाचे अधिकारी अन् पर्यवेक्षक यांचा सक्रीय सहभाग असेल. संबंधित विभाग प्रमुखांनी संयुक्त पथके स्थापन करून नियमित पडताळणी करणे, नियमभंग करणार्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे, तसेच मोहिमेची प्रभावी कार्यवाही सुनिश्चित करून तिचा सविस्तर अनुपालन अहवाल मुख्यालयास सादर करणे हे निर्देश देण्यात आले आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !