संस्कृतीची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारा गणांचा अधिपती !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने…

श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ आवरता घेत सृष्टी नवसृजनाने सजते. तिची शुभ, मंगल आणि कल्याणकारक पावले जीवनाचे रहाटगाडगे चालू ठेवण्याची प्रेरणा देतात. निर्मितीपासून विलयापर्यंतचा हाच सृजनोत्सव आपण प्रतिवर्षी साजरा करतो, ज्याला ‘गणेश चतुर्थी’ म्हटले जाते ! हा सण आणि देव सर्व आबालवृद्धांना अत्यंत आवडतो. प्रतिवर्षी मातीचा गणपति सिद्ध करण्यापासून त्याचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यापर्यंत हा सण अक्षरश: साजरा केला जातो. गणेश हे भारतातील सर्वांत लोकप्रिय दैवत. तो गणांचा ईश (देव) म्हणून ‘गणेश’ आहे. तो गणांचा अधिपती असल्याने ‘गणपति’ म्हणून ओळखला जातो.

१. नवप्रेरणा देणारा श्री गणेश

ज्याचा याच अर्थाने उल्लेख ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडलातील २३ व्या सूक्ताच्या पहिल्या मंत्रात येतो.

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।। – ऋग्वेद, मण्डल २, सूक्त २३, ऋचा १

अर्थ : हे ब्रह्मणस्पति, तू देवांमध्ये गणपति आणि कवींमध्ये कवी आहेस. तुझे अन्न सर्वोच्च अन् उपमानभूत (इतरांना उपमा ठरलेले) आहे. तू प्रशंसनीय लोकांमध्ये राजा असून मंत्रांचा अधिपती आहेस. आम्ही तुझ्या आगमनाची इच्छा करतो. तुझ्याविषयीची आमची ही स्तुती ऐकून आश्रय देण्यासाठी या यज्ञामध्ये तुझे अस्तित्व निर्माण कर.

ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील ११२ व्या सूक्ताच्या ९ व्या मंत्रातही

नि षु सीद गणपते गणेषु त्वामाहुर्विप्रतमं कवीनाम् ।
न ऋते त्वत्क्रियते किं चनारे महामर्कं मघवञ्चित्रमर्च ।। – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त ११२, ऋचा ९

अर्थ : ‘हे गणपते, तू स्तुती करणार्‍या आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित हो. तुला भविष्यद्रष्ट्या कवींमध्ये अतिशय बुद्धीमान म्हटले जाते. तुझ्याविना कोणत्याही शुभकार्याचा आरंभ केला जात नाही. (म्हणून) हे मघवन् (महान दाता), आमच्या या स्तोत्राचा अन् प्रार्थनेचा स्वीकार कर’, असा उल्लेख येतो.

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच रहातो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत रहातो.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

२. कार्यकर्ता महादेवांप्रमाणे, तर नेता गणेशांसारखा असावा !

गणपति सर्व संकटे, विघ्ने, अडथळे त्याच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर दूर करतो. हा गणपति गजानन (गज – हत्ती आणि आनन – तोंड, म्हणजे हत्तीचे तोंड असलेला) कसा झाला, याच्या अनेक कथा शिवपुराण, भविष्यपुराण, स्कंदपुराण अशा अनेक पुराणांमध्ये येतात. वानगीदाखल तिथे आलेल्या तपशीलात शिरायचे नसते; त्यात असलेले तप आणि शील पहायचे असते. तत्त्वांना प्रतीकात्मक रूपात रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे पुराण. प्रतिकांतून पुराणकथा नेमके काय सांगू पहाते, याचा विचार होणे आवश्यक आहे. समुद्रमंथनाची कथा कार्यकर्ता कसा असावा, हे सांगते, तर गणेशजन्माची कथा नेता कसा असावा, हे सांगते !

‘अमृत प्राशन करतात ते देव’ आणि ‘हलाहल विष प्राशन करतो तो महादेव’. एरव्ही कापरासारख्या गोर्‍या असलेल्या महादेवास आपण संपूर्ण निळा रंगवतो; वास्तविक त्याचा कंठ फक्त निळा आहे. समाजात वावरतांना कार्यकर्त्याला अनेक मंथनांना सामोरे जावे लागते. त्यातून निर्माण झालेले हलाहल प्राशन करणे क्रमप्राप्त असते. ते पोटात गेले, तर स्वतःचा जीव जातो आणि बाहेर ओकले, तर समाज नष्ट होतो. म्हणून त्या नीलकंठाप्रमाणे ते गळ्यातच ठेवावे लागते. ‘कार्यकर्ता असावा, तर तो महादेवासारखा’ आणि ‘नेता असावा, तर त्याच्याच मुलासारखा म्हणजे गणपतीसारखा’ !

३. गणेश जन्माची कथा

‘चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असतांना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती सिद्ध करून त्यात प्राण घातले होते. मग देवी पार्वती तिचे स्नान होईपर्यंत तिच्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगते आणि कुणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. हा मुलगा कक्षाबाहेर पहारा देत असतो, त्याच वेळी देवी पार्वतीला भेटण्यासाठी महादेव तिथे येतात. लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवही ते मान्य करत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही. त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो. मग शंकर आपल्या त्रिशुळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी अन् संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्या वेळी भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा ज्या प्राण्याचे डोके दिसेल ते आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेशाचा जन्म होतो’, अशी ही कथा आहे.

४. गजमुखामध्येच नेता कसा असावा ?, याचे सारे सार दडलेले असणे !

निर्मिती, विनाश आणि पुन्हा नवनिर्मितीची ही प्रतीकात्मक कथा आहे. गणेशाचा जन्म शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांतून झाला आहे. तो बुद्धीमत्ता आणि चैतन्याचे प्रतीक आहे. अगदी गजमुख असले तरी तो हत्तींचा अधिपती नाही, गणांचा अधिपती म्हणजेच नेता आहे. ‘हत्तीचेच तोंड का बरे या कथेत निवडले असावे ?’,

हा प्रश्न आपल्याला त्या प्रतीकामागील विचाराकडे घेऊन जातो. या गजमुखामध्येच नेता कसा असावा ?, याचे सारे सार दडले आहे. तोंडवळ्यास पहाता गजमुखाचे डोळे पुष्कळच लहान आहेत. नेत्याची दृष्टी बारीक आणि दृष्टीकोन सूक्ष्म असायला हवा. या शूर्पकर्णाचे कान सुपासारखे आहेत. नेत्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे आणि निवडून योग्य असेल, ते आत घ्यावे. हत्तीला परिसराचा सुगावा सोंडेमुळे लागतो. सुईसारखी लहानातील लहान आणि ओंडक्यासारखी मोठ्यातील मोठी गोष्ट उचलण्याचे सामर्थ्य त्या सोंडेत असते. हे दोनही गुण नेत्यात असावे लागतात. हे सर्व सांभाळणारी, समतोल साधणारी कुशाग्र, प्रवाही बुद्धीमत्ता हे गणपतीचे वैशिष्ट्य आहे. बुद्धी, संतुलन आणि स्पष्टता यांचे जतन करून परिवर्तन घडवणे, हे नेत्याचे काम आहे.

बुद्धीमत्ता म्हणजे माहितीवर प्रक्रिया करून तिचा संचय करण्याचे सामर्थ्य नव्हे. अस्तित्वाशी सुसंगत रहाण्याची, प्रतिकार न करता प्रवाहित होण्याची, अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची आणि मर्यादांच्या पलीकडे विस्तारत जाण्याची क्षमता म्हणजे बुद्धीमत्ता ! म्हणूनच अडथळे दूर करणारी, समरसतेने सर्वांना एकत्र आणणारी आणि जीवनात संतुलन जपणारी बुद्धीमत्ता जोपासणे आवश्यक आहे. अशी बुद्धीमत्ता असलेल्या नेतृत्वाला जपणे आवश्यक आहे.

५. खरा गणेशोत्सव

खरी बुद्धीमत्ता कधीही निष्ठूर, एककल्ली आणि एकाच जागी साचलेली नसते. ती प्रवाही आणि अबाधित असते. शुद्ध चैतन्याचे प्रकट रूप असलेली हीच बुद्धीमत्ता ऋषींनी निसर्गाशी प्रामाणिक असलेल्या कृषी संस्कृतीत रुजवली. निसर्गचक्राशी जुळणारी व्यवस्था मानवी जीवनाशी जोडली. भावनेशी, उपासनेशी जोडली. म्हणूनच गणेश चतुर्थीसारखे सगळे सण निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. त्यासह ते शुद्ध चैतन्याच्या प्रवाही असण्याच्या विचाराशीही ऋषींनी जोडले. मूर्ती सिद्ध करण्याची आणि नंतर विसर्जित करण्याची पद्धत ही अस्तित्वाच्या प्रवाही स्वरूपाची ओळख पटवण्याचा एक सांस्कृतिक मार्ग आहे. हा मार्ग वेदकाळापासून ऋषी आणि कृषी संस्कृतींचा संगम आहे. मूर्त प्रतीकांच्या पलीकडे जात त्यांचे गुण आत्मसात् करणे, म्हणजे गणेश चतुर्थी; हा साकारातून निराकाराकडे जाण्याचा, जड (मॅटर) हे शुद्ध चैतन्याचेच (प्युअर कॉन्शिअसनेस) रूप आहे, हे ओळखण्याचा उत्सव आहे !

६. प्रार्थना

ही गणेशचतुर्थी आम्हा सर्वांमध्ये असलेल्या शुद्ध चैतन्यास ओळखण्याचे सामर्थ्य आम्हाला देवो. संस्कार, संकेत आणि संस्कृती यांची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारे गणांचे अधिपती आम्हास लाभो !

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(साभार : ‘प्रसन्न वदने…’ या ब्लॉगवरून)

संपादकीय भूमिका

संघर्षाच्या वेळी देशांतर्गत शत्रूंकडून होणारी हानी रोखण्यासाठी भारतियांनी सजग रहाण्यासह सरकारने त्यांच्यावर कठोर करायला हवी !