सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ७ वर्षे) यांची सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री मधुरा भोसले यांनी वर्णिलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘जन्मतःच संत असल्याचे मंगळुरू, कर्नाटक येथील बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ८ वर्षे) हे सनातन संस्थेचे पहिले उदाहरण असून पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर हे सनातन संस्थेचे दुसरे बालसंत आहेत. बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ७ वर्षे) यांचा वामन जयंतीला, म्हणजचे ४.९.२०२५ या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. श्री गुरूंची दिव्य कृपा आणि संतांनी गेल्या जन्मांमध्ये केलेली कठोर साधना यांमुळे त्यांनी जन्मतःच संतपद प्राप्त केले आहे. या लेखमालिकेतून आपण पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांना संतपदापर्यंत नेणार्‍या त्यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत.

पू. वामन राजंदेकर

१. पू. वामन राजंदेकर हे श्रीविष्णूच्या हातातील कौमुदी गदेचे अंश-अवतार असणे

पू. वामन हे श्रीविष्णूच्या हातातील दिव्य कौमुदी गदेचे अंशावतार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये मुळातच १० टक्के विष्णुतत्त्व आहे. जेव्हा मी पू. वामन यांना पहिल्यांदा बालस्वरूपात पाहिले, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी गडद निळी वस्त्रे आणि त्यांना सोनेरी किनार असलेल्या पोषाखातील गदाधारी चतुर्भुज नारायणाच्या बाल रूपाचे दर्शन झाले. तेव्हा माझे लक्ष श्रीमन्नारायणाच्या हातातील भारदस्त आणि दैवी असलेल्या सोनेरी गदेकडे वेधले जात होते. त्याचा अर्थ मला आज उलगडला.

२. कौमुदी गदेने विविध रूपे धारण करून विविध जन्मांमध्ये विविध युगांमध्ये केलेली साधना

सुश्री (कु.) मधुरा भोसले

श्रीविष्णु संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी विविध युगांमध्ये अवतार धारण करतो. सत्ययुगात श्रीविष्णूच्या हातातील कौमुदी गदेलाही श्रीविष्णूसमवेत अंशावतार धारण करून त्याच्या अवतारी लीलेत सहभागी होण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे कौमुदी गदेने सत्ययुगात ध्रुवबाळ बनून वनामध्ये जाऊन सहस्रो वर्षे श्रीविष्णूची आराधना केली. त्यानंतर श्रीविष्णूने ध्रुवबाळावर प्रसन्न होऊन त्याला राजमहाली परतून पृथ्वीचे राज्य सांभाळण्यास सांगितले आणि जन्माच्या शेवटी ‘तू ध्रुवतारा बनून नक्षत्र मंडलात स्थापित होशील’, असे वरदान दिले. त्याप्रमाणे ध्रुवबाळाने अनेक वर्षे पृथ्वीवर धर्मपरायण राहून धर्मराज्य केले आणि नंतर तो ध्रुवतारा बनून नक्षत्र मंडलात स्थित झाला. तेव्हा सत्ययुगाच्या अंती आणि त्रेतायुगाच्या प्रारंभी ध्रुवतार्‍यातील कौमुदी गदेचा अंश बाहेर येऊन त्याने वामदेवऋषींचे रूप धारण केले आणि त्यांनी ध्रुवतार्‍यावर राहून सहस्रो वर्षे श्रीविष्णूचे तप केले. त्यानंतर द्वापरयुगात श्रीविष्णूने कौमुदी गदेचे अंशावतार असणार्‍या वामदेवऋषींना सांगितले, ‘कलियुगात तुम्ही जन्मतः संत असणार आहात. तुमच्या मनात श्रीविष्णूच्या अवतारांविषयी विशेष आकर्षण असल्यामुळे तुम्हाला कलियुगात होणार्‍या श्रीविष्णूचा ज्ञानावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत अवतारी कार्य करून समष्टी साधनेची धुरा सांभाळण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. त्या मनुष्य अवतारात तुमचे नाव ‘श्री. वामन’ असेल.’

३. पू. वामन यांनी ध्रुवबाळ, वामदेवऋषि आणि पू. वामन यांच्या स्वरूपात विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेचे प्रमाण अन् त्यामुळे त्यांच्यात विकसित झालेले विविध दैवी गुण

टीप १ – पू. वामन यांची सतत ध्यानसाधना चालू असल्याने त्यांची वृत्ती सतत अंतर्मुख असते. त्यामुळे ते इतरांशी अल्प प्रमाणात बोलून अधिक वेळ मौन धारण करून भगवंताविषयीच्या चिंतनात मग्न असतात.

टीप २ – पू. वामन यांनी हठयोगाप्रमाणे साधना केल्यामुळे ते त्यांच्या साधनेत विघ्ने आणू पहाणार्‍या पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींनी दिलेल्या त्रासावर मात करून त्यांच्याशी क्षात्रभावाने लढत असतात.

  (क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १.८.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/954871.html