‘फर्मागुडी, गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला जाऊन आल्यावर माझ्या मनात कृतज्ञतेचे विचार वाढले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला तेथे जाण्याची अमूल्य संधी मिळाली आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात चैतन्याचा वर्षाव झाला. ‘१० जुलै या दिवशी असलेल्या गुरुपौर्णिमेची सेवा झोकून देऊन करूया आणि याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया’, असे विचार माझ्या मनात येत होते. मागील २ वर्षांपासून गुरुदेवांनी ‘साधनावृद्धी आणि साधकनिर्मिती’ ही २ ध्येये दिली आहेत. त्यातून केंद्रात अनेक धर्मप्रेमी कृतीशील झाले आहेत. ‘सनातनशी जोडलेल्या प्रत्येक जिवाला लवकरात लवकर गुरुदेवांच्या चरणांशी जाण्याची ही अमूल्य संधी आहे, तसेच या जिवांना ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेतूनच गुरुतत्त्वाचा लाभ होईल’, असे विचार येऊन गुरुपौर्णिमेच्या सेवेचे चिंतन देवानेच माझ्याकडून करून घेतले. यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत आनंददायी, उत्साह वाढवणारी आणि चैतन्यदायी ठरली. त्याविषयीची कृतज्ञतेची शब्दसुमने गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. गुरुपौर्णिमेच्या प्रसाराचे नियोजन
१ अ. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या वंदनीय उपस्थितीत उत्साहात पार पडलेला आयोजनाचा पहिला सत्संग ! : वर्ष २०२५ मध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व जिवांच्या नावांचा विचार केला. त्यांची शिकवण कृतीत आणण्याच्या दृष्टीने या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये माझ्याकडून तसा प्रयत्न झाला. केंद्रात दायित्व घेऊन सेवा करू शकणार्या साधकांच्या नावांचा विचार करून त्यांचा पहिला आयोजनाचा सत्संग ठरवण्यात आला. त्याला सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांची वंदनीय उपस्थिती लाभली. या सत्संगाचा लाभ अनेक साधकांनी घेतला. सद्गुरूंच्या चैतन्याचा लाभ होऊन सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या अनेक सेवांचे दायित्व स्वीकारले. आयोजन सेवेपासून बहुतांश सर्व सेवांमध्ये नवीन नावे घेण्याचा प्रयत्न झाला. एकंदरीत या सत्संगात सर्वांचा उत्साह पाहून गुरुदेवांप्रती माझा भाव जागृत झाला.

१ आ. साधक आणि धर्मप्रेमी यांनी एकत्रितपणे ‘अर्पण अन् विज्ञापने घेणे’, या सेवांसाठी ध्येय ठेवून प्रयत्न करणे आणि गुरुकृपेने उत्तम प्रतिसाद लाभणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त नुकतेच अनेकांकडून अर्पण घेतले असल्याने ‘आता पुन्हा त्यांच्याकडे जाऊन गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पणाची मागणी कशी करावी ?’, असा विचार काही साधकांच्या मनात होता. गुरुकृपेने आमच्या केंद्राचे प्रसारक्षेत्र पुष्कळ मोठे असल्याने त्यानुसार सर्वांनी एकत्रित नियोजन करून नवीन नावे काढायला आरंभ केला. दायित्व असणारे सर्व साधक आणि धर्मप्रेमी यांनी एकत्रितपणे ‘अर्पण अन् विज्ञापने घेणे’, यांसाठी ध्येय ठरवले अन् त्यासाठी प्रत्येकाने वेळेचा त्याग करण्याचे ठरवले. त्यानुसार आयत्या वेळी आलेल्या अडचणींवर मात करून सर्वच साधकांनी तळमळीने प्रयत्न केले. प्रत्येक वर्षी केवळ ३ – ४ साधकच विज्ञापने आणण्याची सेवा करायचे; परंतु या वर्षी ही सेवा १० जणांनी केली. त्यामुळे ठरवलेल्या ध्येयापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळून साधकांना ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात’, याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली.
१ इ. प्रतिदिन आढावा सत्संगात साधक आणि धर्मप्रेमी सहभागी होणे, त्यांनी मोकळेपणाने आढावा सांगितल्याने सांघिक भाव निर्माण होऊ लागणे अन् नियोजनात आवश्यक ते पालट केल्याने सेवेची फलनिष्पत्ती वाढणे : ६.६.२०२५ या दिवसापासून गुरुपौर्णिमेच्या प्रसारसेवेला आरंभ झाला. या वर्षी अनेक जण प्रथमच दायित्व घेऊन ‘प्रसार करणे, तसेच अर्पण आणि विज्ञापने मिळवणे’, या सेवा करत होते. त्यामुळे ‘सेवेचा आढावा घेणे, आलेल्या अडचणींवर उपाययोजना सांगणे आणि दुसर्या दिवसाचे नियोजन करणे’, यांसाठी प्रतिदिन आढावा चालू झाला. देवाच्या कृपेने सर्व साधक आणि धर्मप्रेमी यामध्ये सहभागी होऊन आपापल्या चुका अन् अनुभूती मांडू लागले. प्रत्येक जण मनमोकळेपणे आपापला आढावा सांगत असल्याने सांघिक भाव निर्माण होण्यास साहाय्य झाले. त्या बैठकीतून ‘साधक कुठे न्यून पडत आहेत ? मी त्यांना कोणते साहाय्य केले पाहिजे ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागले. त्यानुसार प्रतिदिन आवश्यक पालट करत नियोजन केल्यामुळे ‘सेवेची फलनिष्पत्ती वाढत असून अल्प कालावधीमध्ये परिणामकारक प्रसार होत आहे’, हे लक्षात येऊ लागले.
१ ई. प.पू. गुरुदेवांच्या वचनाचे स्मरण होणे : प.पू. गुरुदेवांनी काही काळापूर्वी साधकांना सांगितले होते, ‘भविष्यात समाजातून आपल्याकडे येणार्या जिज्ञासूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्या वेळी आपल्याला नेतृत्व करणारे साधक तयार करता आले पाहिजेत !’ त्यांच्या या वचनाचे मला स्मरण झाले.
२. साधकांना कृतीच्या स्तरावर केलेले साहाय्य
२ अ. साधकांमध्ये नेतृत्वगुण वाढावेत; म्हणून प्रयत्न करणे : ‘सेवेला वेळ देणार्या, तसेच दायित्व घेऊन सेवा करण्याची सिद्धता असणार्या साधकांमधील नेतृत्वगुण वाढावेत’, यासाठी मी त्यांचे गट तयार करून ‘गटसेवक’ म्हणून एकाला दायित्व दिले. यात प्राधान्याने धर्मप्रेमींचा सहभाग करून घेतला. त्यांना काही खेड्यांमधील प्रसारसेवेचे ध्येय दिले, तसेच समयमर्यादाही घालून दिली. हे ध्येय गटातील धर्मप्रेमींकडून पूर्ण करून घेण्याचे दायित्व त्या गटसेवकाकडे होते. यांतून त्यांच्यात नेतृत्वगुण वाढण्यास साहाय्य झाले. सर्वच गटसेवकांनी गुरुदेवांच्या कृपेने झोकून देऊन सेवा केली.
२ आ. ‘साधकांना प्रसारात विषयाची मांडणी करता यावी’, यासाठी त्यांची सिद्धता करून घेणे : ‘गुरुपौर्णिमेचा प्रसार करतांना आणि अर्पण, तसेच विज्ञापने घेतांना विषय कसा मांडायचा ?’, यांविषयी बर्याच साधकांना अडचणी असायच्या. त्यामुळे काही ठराविक साधकच ही सेवा ठराविक भागात करायचे. या वर्षी धर्मप्रेमी आणि साधक यांची ‘प्रसारात विषय कसा मांडायचा ?’, याविषयी तयारी करून घेतल्याने नवीन साधकही सिद्ध झाले. त्यामुळे अधिक भागात प्रसार करता आला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, साधकांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना आनंद अनुभवता आला. ‘देवाच्या कृपेने सर्व धर्मप्रेमी तन-मन-धन अर्पण करून सेवेस प्राधान्य देत होते’, हे पाहून कृतज्ञतेने माझे मन भरून यायचे.
३. प्रसारसेवा करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. समाजातील लोकांना साधकांमधील दैवी गुण लक्षात आल्याने प्रसाराला उत्तम प्रतिसाद मिळणे : गुरुपौर्णिमेचा प्रसार करतांना गुरुदेवांच्या कृपेने साधकांना अनेक अनुभूती आल्या, तसेच समाजातून उत्तम प्रतिसादही मिळाला. समाजातील काही जणांनी प्रसार करणार्या साधकांना सांगितले, ‘‘आम्ही सनातनच्या साधकांमध्ये देव पहात आहोत.’’ यातून ‘प.पू. गुरुदेव साधकांमध्ये दैवी गुणांचे भांडार निर्माण करत असल्यामुळे समाजाला तसे वाटत आहे’, असे मला जाणवले.
३ आ. गुरुकृपेने साधकांमधील सेवेची तळमळ वाढल्याने पावसाळ्याचे दिवस असूनही सेवेत अडथळा न येणे : साधकांना प्रतिदिन निसर्ग आणि वरुणदेवता यांची कृपादृष्टी अनुभवता आली. पावसाळ्याचे दिवस असतांना आणि पाऊस चालू असतांनाही अडथळ्यांचा विचार न करता साधक प्रतिदिन प्रसारासाठी बाहेर जायचे. विशेष म्हणजे साधक ज्या क्षेत्रात प्रसारासाठी जायचे, तेथे पाऊस थांबायचा अथवा अल्प प्रमाणात पडायचा. त्यामुळे साधकांना कोणताही अडथळा न येता प्रसार करता आला. यातून ‘गुरुकृपेनेच साधकांमध्ये सेवेची तळमळ वाढली आहे’, हेही लक्षात आले.
३ इ. ‘एका दुकानदाराला संपर्क करायला हवा’, असा विचार मनात येणे, अन्य साधकांनी त्यांना संपर्क केल्यावर चांगला प्रतिसाद मिळणे, तेव्हा ‘धर्मकार्यात कुणाला सहभागी करून घ्यायचे ?’, हे ‘देवच सुचवतो’, हे लक्षात येणे : एके दिवशी अमळनेर (जि. जळगाव) येथे प्रसार करणे, अर्पण आणि विज्ञापन घेणे इत्यादी सेवा करत असतांना ‘महाजन टी सेंटर’ या नावाची एक दुकानाची पाटी मी पाहिली. सात्त्विक पद्धतीने बनवलेली ती पाटी पाहून ‘त्या दुकानाच्या मालकांना संपर्क करायला हवा’, असा विचार माझ्या मनात आला. थोड्या वेळाने अन्य साधकांनी त्यांना संपर्क केला. त्या दुकानदारांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण दिले, तसेच ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले. तेव्हा ‘देवच धर्मकार्यात कुणाकुणाला सहभागी करून घ्यायचे’, हे सुचवत आहे’, हे लक्षात येऊन गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
४. जिज्ञासूंना निमंत्रणे देण्याचा वस्तूनिष्ठतेने केलेला प्रयत्न
सनातन संस्था वर्षभर जे विविध उपक्रम राबवते, त्यातून साधकांना अनेक जिज्ञासूंची नावे मिळतात. अशा सात्त्विक, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्याची आवड असणार्या प्रत्येक जिज्ञासूला गुरुपौर्णिमेला बोलावण्याचे नियोजन करण्यात आले.
५. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अनुभवल्यावर पूर्वी पुरो(अधो)गामी चळवळीत सक्रीय असलेल्या एका आधुनिक वैद्यांनी दिलेला उत्स्फूर्त अभिप्राय
या वर्षी १० गावांतून जवळपास २२ कि.मी.च्या अंतरावरून जिज्ञासू गुरुपौर्णिमेसाठी आले होते. यावरून ‘गुरूंचे चैतन्य कसे कार्य करते’, हे लक्षात आले. प्रसाराच्या वेळी एकदा आम्हाला पूर्वी पुरो(अधो)गामी चळवळीत सक्रीय असलेले एक आधुनिक वैद्य भेटले होते. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अनुभवल्यावर त्यांच्यामध्ये पालट झाल्याचे मला जाणवले. ते स्वतःहून गुरुपौर्णिमेचे प्रवचन घेणार्या वक्त्याला भेटले आणि म्हणाले, ‘‘आपण ज्याप्रमाणे धर्माची परिभाषा मांडली, त्यावरून ‘धर्म म्हणजे काय ?’, हे मला आज खर्या अर्थाने सुस्पष्ट झाले.’’ हे ऐकून ‘काळानुसार गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून गुरुदेव आपल्याकडून विषय मांडून घेतात आणि त्याद्वारे समाजात परिवर्तन करून समाजव्यवस्था आदर्श करण्याचे प्रयत्नही करून घेतात’, हे लक्षात येऊन मला गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटली.
६. गुरुपौर्णिमेची सेवा करतांना मनाच्या स्तरावर देवाने करून घेतलेले साधनेचे प्रयत्न
यापूर्वी विविध प्रकृती असलेल्या साधकांच्या सेवांचे नियोजन करतांना काही अडचणी आल्यावर माझे मन अस्थिर व्हायचे आणि मनात प्रतिक्रिया यायच्या; पण या गुरुपौर्णिमेच्या वेळी सर्व प्रकारच्या साधकांना एकत्र करून त्यांच्याकडून सेवा करून घेता आली. ‘भावना न जोपासता तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून देणे, तसेच त्यांना साहाय्य करणे’, असे प्रयत्न गुरुकृपेने या वर्षी झाले. यापूर्वी मला काही प्रमाणात स्वकौतुकाची अपेक्षा असायची. या वेळेस कितीही प्रतिसाद मिळाला, तरी ‘सर्व कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे, शांत, स्थिर रहाणे आणि ‘आणखी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याचे चिंतन करणे’, या गोष्टी गुरुकृपेने मला करता आल्या.
७. गुरुपौर्णिमेमुळे धर्मप्रेमींमध्ये उत्साह आणि कृतीशीलता वृद्धींगत होणे
गुरुपौर्णिमेच्या संपूर्ण कालावधीत गुरुकृपेने मला आनंद घेता आला. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पहिल्या आयोजन बैठकीत साधकांना सांगितले होते, ‘‘सभागृह पूर्ण भरून जागा न्यून पडली पाहिजे’, असा प्रसार करा.’’ त्यांच्या संकल्पानुसार या वर्षी संपूर्ण सभागृह भरले होते. अनेक धर्मप्रेमींनी २ दिवस झोकून देऊन सेवा केली. एका धर्मप्रेमीने गुरुपौर्णिमा झाल्यावर ‘मला नियमित सेवा द्यावी’, असे स्वतःहून सांगितले.
यावरून लक्षात आले की, आता समाजातील जिज्ञासू प्रत्यक्ष कृती करण्याच्या सिद्धतेत आहेत. गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाप्रमाणे या वर्षी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यातही सर्व साधकांना उत्साह, चैतन्य आणि आनंद पुष्कळ प्रमाणात अनुभवता आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. विनोद शिंदे, पाळधी, जिल्हा जळगाव. (२४.७.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !