रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण ‘दिंडा आणि पाथरी’ या भाजीची माहिती वाचणार आहोत.
(भाग २४)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948945.html
१. दिंडा

दिंडा या वनस्पतीला ‘ढोलसमुद्रीका’ असे स्थानिक नाव आहे. औषधामध्ये दिंडाचे मूळ वापरले जाते. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायट्यावरही प्रसिद्ध आहे.
१ अ. भाजी करण्याची पद्धत : दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे दिसेपर्यंत सोला. नंतर चिरून धुवून घ्या. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंग टाका. त्यात कांदा, लसूण घाला. गुलाबी झाल्यावर गरम मसाला आणि चिरलेली भाजी टाका. झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी. ती शिजल्यावर त्यात गूळ, कोकम, कोंथिबीर, ओले खोबरे आणि चवीनुसार मीठ घालावे.

२. पाथरी
पाथरीला बोली भाषेत पात्री, पात्रंची भाजी असेही म्हणतात. ही कडू, शीतल, स्नेहन, ग्राही, वस्तन्यजनन गुणांची आहे. औषधात संपूर्ण वनस्पती वापरली जाते. पाथरीचा अंगरस ज्येष्ठमधासमवेत दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. याचे चाटण कोरड्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांनाही पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते.
पाथरीच्या पानांची भाजी ही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. कावीळ, यकृत विकारांत ही भाजी हितावह आहे. या भाजीने पित्ताचा त्रास न्यून होतो.

२ अ. भाजी करण्याची पद्धत क्र. १ : पाथरीची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत. तेलात कांदा परतून नंतर त्यात वाटलेले लसूण, तिखट, दाण्याचे कूट आणि भाजी घालावी. भाजी चांगली परतून घ्यावी. नंतर आवश्यकतेएवढे मीठ घालावे. वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी परतवून वाफेवर शिजवावी. दाण्याच्या कुटाऐवजी डाळीचे पीठ लावूनही भाजी करता येते.
२ आ. भाजी करण्याची पद्धत क्र. २ : दुसर्या पद्धतीत पाथरीची चिरलेली भाजी शिजवून घोटून घ्यावी. त्यामध्ये मीठ, साखर, बेसन आणि ताक टाकून एकजीव करावे. शिजवलेली डाळ आणि दाणे घालावेत. फोडणीत २ मिरच्या आणि इतर साहित्य घालून त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी अन् ढवळत राहून उकळावी. ताकाऐवजी चिंचेचा कोळ किंवा कोकम, गुळ घालूनही भाजी करता येते. त्याचसमवेत नारळाचे दूध आणि चिंचेचा थोडा कोळ घालूनही भाजी छान होते.
(समाप्त)
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !