
१. पाकिस्तानची अण्वस्त्र धमकी
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेत दिलेल्या अण्वस्त्र वापराच्या सूचक धमकीने जागतिक सुरक्षेच्या पायाभूत तत्त्वांना धक्का दिला आहे. दक्षिण आशियातील अण्वस्त्र शस्त्रस्पर्धा आधीच चिंताजनक आहे. भारत-पाकिस्तान संबंध अनेक वर्षे बिघडलेले असतांना अशी विधाने परिस्थिती अधिक धोकादायक बनवतात. भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम संरक्षणात्मक आणि शांततामय कारणासाठी राहिला आहे. वर्ष १९९८ च्या पोखरण चाचण्यांनंतर भारताने ‘अण्वस्त्राचा पहिला वापर न करणे’ आणि ‘स्वराष्ट्राची सुरक्षा’, ही दोन महत्त्वाची तत्त्वे स्पष्ट केली. यामागे अण्वस्त्रे आक्रमणासाठी नव्हे, तर संभाव्य आक्रमण रोखणे, हा उद्देश होता.
२. पाकिस्तानचा आक्रमक दृष्टीकोन
पाकिस्तानने अण्वस्त्रांचा उल्लेख नेहमीच आक्रमक राजकीय संदेश देण्यासाठी केला आहे. जनरल मुनीर यांची धमकी हे त्याचेच उदाहरण आहे. आर्थिक संकट आणि अंतर्गत अस्थिरता यांतून सुटका मिळवण्यासाठी पाकिस्तान अशा विधानांनी जागतिक लक्ष वेधून घेतो.
३. पाकिस्तानमुळे जागतिक सुरक्षेला धोका !
अशा धमक्या प्रादेशिक स्थैर्याला बाधा आणतात. जगभरातील अण्वस्त्र धोरण ‘दायित्व’ अन् ‘संयम’ या तत्त्वांवर आधारित आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या महासत्तांनीही थेट अण्वस्त्र वापराच्या धमक्या देणे टाळले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दृष्टीकोन अधिकच धोकादायक वाटतो.
४. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे यांचे दायित्व !
अशा धमक्यांवर अमेरिकेने काही न बोलणे यापेक्षा त्याने ठोस राजकीयदृष्ट्या दबाव आणावा. लष्करी, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य यांवर अटी लावून पाकिस्तानला दायित्वाची जाणीव करून द्यावी. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने याची नोंद घेऊन अण्वस्त्र प्रसारबंदी करारांचे उल्लंघन करून निर्बंध घालावेत.
५. आर्थिक निर्बंधाची आवश्यकता !
पाकला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणारा वित्तपुरवठा थांबवणे आवश्यक आहे. इराणच्या अणूकार्यक्रमावर इस्रायल-अमेरिकेने कडक कारवाई केली, तशीच भूमिका पाकसाठीही घ्यायला हवी. अमेरिका दीर्घकाळ पाकच्या बाजूने उभी राहिल्यामुळेच त्याचे धाडस वाढले आहे.

६. भारताने ठाम भूमिका घेणे आवश्यक !
भारतासाठी ही केवळ शब्दांची लढाई नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे भारताने ठाम भूमिका घेत आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या दायित्वशून्य वर्तनाची जाणीव करून द्यावी. ‘अण्वस्त्रे हा शेवटचा पर्याय असून तो राजकीय खेळीचा भाग नाही’, हा संदेश पुन्हा स्पष्ट करणे आवश्यक आहे.
७. भारताने टप्प्याटप्प्याने उचलण्याची पावले !
भारताने अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्र यांचा दबाव न मानता स्वतःचा अण्वस्त्र कार्यक्रम पुढे न्यायला हवा. शत्रूला अण्वस्त्र आक्रमणाची स्पष्ट धमकी देणे आवश्यक आहे. परिस्थिती गंभीर झाली, तर आक्रमण करून शत्रूराष्ट्राचा पूर्ण नाश करण्याची सिद्धता ठेवावी.
८. शेजारील राष्ट्रांविषयीचे धोरण
भारताने भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस या शेजारी राष्ट्रांवर स्वतःचा प्रभाव कायम ठेवायला हवा. गुप्तचर संस्थांच्या माध्यमातूनही आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक आहे.
९. भूतकाळातील चुकांतून शिका !
‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईच्या वेळी भारतीय सैन्य सिद्ध होते. त्यांचे मनोबल उंचावलेले होते. विरोधकही सरकारच्या बाजूने होते; मात्र आपल्याकडून पाकिस्तानला मोठा फटका न देता सोडले गेले. या चुकीचा आता पश्चात्ताप होत आहे.
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व).
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !