वर्ष २०२५ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

१. वर्ष २०२५ मध्ये मी पहिल्यांदाच सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे सर्व जण मला पहिल्यांदाच भेटले, तरी ‘सगळे माझेच आहेत. एक परिवारच आहे’, असे मला वाटत होते. सगळे मिळून सेवा करत होते. तिथे मला कुणाच्याच मनात भेदभाव किंवा परकेपणा जाणवला नाही.

२. गुरुपौर्णिमेचे वातावरण समाजातील कार्यक्रमापेक्षा वेगळेच होते. माझ्या मनाला प्रसन्न वाटत होते.

३. सर्व साधक छान आणि तेजस्वी दिसत होते. तिथे लहान मुले-मुलीही पुष्कळ गोड, म्हणजे समर्पणभावाने वागत होते.

४. तिथे अधूनमधून प्रार्थना होत होत्या. आम्ही सेवा केली. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आम्हाला सेवेविषयी मार्गदर्शन केले गेले.

५. मला मध्येच एक काम आल्याने घरी परत जावे लागले; परंतु तिथे माझे मन लागतच नव्हते. मला असे वाटायचे, ‘कधी गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी जाऊन सेवा करायला मिळेल.’

‘अन्य कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत असे अनुभवायला मिळाले नव्हते’, त्याबद्दल देवाच्या चरणी कृतज्ञता.’

– कु. हर्षदा देशमुख, यवतमाळ (२५.७.२०२५)

‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या सनातनच्या ग्रंथाचा अभ्यास करून आपली साधनावृद्धी करण्यास पू. मंदाकिनी डगवार यांनी सांगणे

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

एका सत्संगात पू. मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांनी साधकांना मार्गदर्शन करतांना ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या सनातनच्या ग्रंथाचा अभ्यास करून आपली साधनावृद्धी करूया’, असे कळकळीने सांगितले. त्यांनी या ग्रंथाचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवल्यामुळे अनेक साधकांनी ग्रंथाची मागणी दिली. या ग्रंथाच्या माध्यमातून आमची साधनेत प्रगती व्हावी, अशी त्यांची तळमळ होती.’

– श्री. लहू खामणकर (वय ६९ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ. (२५.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक