‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते. भगवंताने मनुष्यजन्म ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी दिला आहे. त्यासाठी त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीतील भगवंताच्या चैतन्याचा आस्वाद घेऊन जीवनाचे सार्थक करण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना शिकून त्याप्रमाणे कर्म करायचे असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेद्वारे त्यांना हेच सांगायचे आहे. या मार्गाने केलेल्या साधनेद्वारे जलद ईश्वरप्राप्ती करून घेता येते. याद्वारे आतापर्यंत (वर्ष २०२५ पर्यंत)१३२ साधक संत झाले, तर १०४९ पेक्षा अधिक साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.
या संदर्भात श्रीमद्भागवत्, वेद, श्रीमद्भगवद्गीता, उपनिषदे इत्यादी धर्मग्रंथांमध्ये पुष्कळ श्लोक आहेत. ते पुढे देत आहे.
१. मनुष्याचे शरीर अनेक जन्मांनंतर मिळालेले असून मनुष्य जीवित असेपर्यंतच ईश्वरप्राप्ती होऊ शकणे
लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः ।
तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन्निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय ९, श्लोक २९
भावार्थ : अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्याचे शरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे. या शरिरामुळे जीवित असेपर्यंत परम पुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते, इतके ते महान आहे. मूलतः ‘हे शरीर नश्वर आहे’, हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोपर्यंतच शहाण्याने तात्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्न करावेत; कारण विषयभोग सर्व योनींमध्ये प्राप्त होणारे आहेत.
२. मनुष्यजन्मातच परमात्वतत्त्वाला जाणण्याची जिज्ञासा धरावी !
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा ।। – श्रीमद्भागवत, स्कंध २, अध्याय ९, श्लोक ३५
अर्थ : जे सर्व ठिकाणी सदैव भरून राहिले आहे, तेच आत्मतत्त्व होय. हे तत्त्व जिज्ञासू मनुष्याने ‘अन्वयव्यतिरेकाने’ जाणावे.
‘मनुष्य जन्मात त्या परमात्वतत्त्वाला जाणण्याची एकमेव जिज्ञासा धरावी.’ – संदर्भ – ‘साप्ताहिक प्राजक्त’, धर्मयज्ञ, मार्च २०१८, स्वानुभव)

३. परमेश्वराला जाणणे, त्याची प्राप्ती होणे, हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे गुरूंद्वारे जाणून त्याप्रमाणे साधना केल्यास जीवनाचे ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय साध्य करता येणे
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ।। – कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, वाक्य १४
अर्थ : उठा, जागे व्हा, उत्तम पुरुषांच्या (गुरूंच्या) सत्संगाने परमेश्वराचे स्वरूप जाणून घ्या; कारण बुद्धीमान पुरुष म्हणतात की, (परमेश्वराला जाणण्याचा) हा मार्ग सुरीच्या तीक्ष्ण धारेवरून तिला पार करण्यासम दुर्गम आहे.
विवरण : या श्लोकावरून दिसून येते की, परमेश्वराला जाणणे आणि त्याची प्राप्ती होणे, हेच जीवनाचे लक्ष्य आहे. यासाठी गुरूंद्वारे हे जाणून त्याप्रमाणे साधना केल्यास आपले ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय साध्य करता येते.
४. यमराजाने नचिकेताला ‘सच्चिदानन्दघन परमात्म्याला प्राप्त करणे’, हेच मानवाचे ध्येय असल्याचे सांगणे
एतच्छ्रुत्वा सम्परिगृह्य मर्त्यः प्रवृह्य धर्म्यमणुमेतमाप्य ।
स मोदते मोदनीयं हि लब्ध्वा विवृतं सद्म नचिकेतसं मन्ये ।। – कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली २, वाक्य १३
अर्थ : मर्त्यशील मनुष्य या धर्म-तत्त्वाचे श्रवण करून आणि ते योग्य प्रकारे ग्रहण करून, विचारपूर्वक या सूक्ष्म आत्मतत्त्वाला जाणून घेतो अन् आनंदस्वरूप परमात्म्याची प्राप्ती होऊन तो आनंदमग्न होऊन जातो. त्यामुळेच हे नचिकेता, तुझ्यासाठी परमधामाचे द्वार खुले असल्याचे मी मानतो.
विवरण : नचिकेत (जगातील पहिला जिज्ञासू) जेव्हा यमराजाकडे जातो, तेव्हा तोसुद्धा नचिकेताला हेच सांगत आहे की, ‘सच्चिदानंदघन (टीप) परमात्म्याला प्राप्त करणे, हेच मानवाचे ध्येय आहे’; कारण परमेश्वराच्या ठिकाणी आनंद आहे. तो आनंदमय आहे. तसेच प्रत्येक जीवमात्रामध्ये त्याचेच अस्तित्व आहे; म्हणून मानवाला ‘आनंद घ्यावा’, असे वाटते; परंतु भ्रमामुळे प्रत्येक मानवाला आनंद घेता येत नाही. यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. तेच योग्य मार्ग दाखवणारे आहेत.
टीप : सच्चिदानंदघन : १. ‘सत्’ म्हणजे ‘सत्य.’ ‘चित्’ म्हणजे ‘चैतन्य’ आणि ‘घन’ म्हणजे ‘व्यापलेला’ अथवा ‘व्याप्त.’ ‘सच्चिदानंद’ म्हणजे जो सत्य, चैतन्य आणि आनंद यांनी व्यापलेला आहे तो’, म्हणजे ‘ईश्वर.’
२. संस्कृत भाषेमध्ये ‘चित्’ याला आणखीही एक अर्थ आहे. तो म्हणजे ‘ज्ञान’ आणि ‘घन’ शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे ‘मेघ’ किंवा ‘ढग.’ या अर्थांनी ‘सच्चिदानंदघन’ म्हणजे सत्य, ज्ञान आणि आनंद यांचा मेघ असलेला, असा तो’. हा अर्थ घेतला, तर हे विशेषण एखाद्या सत्पुरुषासाठी वापरता येते.
५. साधना करून परमात्म्यात लीन होण्यासाठी मनुष्याचा जन्म झालेला असणे
मनसस्पत इमं नो दिवि देवेषु यज्ञम् ।
स्वाहा दिवि स्वाहा पृथिव्यां स्वाहान्तरिक्षे स्वाहा वाते धां स्वाहा ।। – अथर्ववेद, काण्ड ७, सूक्त ९७, ऋचा ८
अर्थ : हे मननशील आत्मा आणि चित्त यांच्या स्वामी परमात्म्या, मी देवाला अर्थात् इंद्रियगणांच्या व्यापक यज्ञस्वरूप आत्म्याला मोक्षपदामध्ये अर्पित करून दिले आहे. याला परम तेजोमय अशा ब्रह्मामध्ये चांगल्या प्रकारे आहुती देऊन (अर्पण करून) त्यात लीन होऊन जावो, त्या सर्वाधार महान ब्रह्मामध्ये तो आत्मा स्वयम् लीन होवो, सर्वान्तर्यामी, सर्वव्यापक परब्रह्मामध्येही तो लीन होऊन प्राणरूप सर्वाधार असलेल्या ईश्वरामध्ये तो आत्मा लीन होवो.
वरील विवरणातून ‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे, तसेच ईश्वरातून निर्माण झालेला मानव जीव साधना करून त्याच्यात विलीन होण्यासाठीच झाला आहे’, हे दिसून येते.
६. मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर प्रयत्नपूर्वक अभ्यास करणार्या योग्याने याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परम गतीला प्राप्त होणे
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ४५
अर्थ : प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तात्काळ परम गतीला प्राप्त होतो.

७. परम पदाला प्राप्त होणे, हे जीवनाचे लक्ष्य आहे !
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५१
अर्थ : समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणार्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार ‘परम पदा’ला प्राप्त होतात.
यावरून ‘परम पद प्राप्त होणे’, हे जीवनाचे लक्ष्य आहे, हे दिसून येते.
८. आत्म्याला भगवंताशी जोडल्यास तो भगवत्परायण होऊन भगवंतालाच प्राप्त होणे
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३४
अर्थ : (हे अर्जुना !) तू माझा भक्त व्हावे. तुझे मन माझ्यावर केंद्रित करावे. माझे ध्यान करावे आणि मला नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वतःला माझ्यात समर्पित करून आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करून तू निःसंशयपणे मला प्राप्त करशील.
८ अ. विवेचन आणि विश्लेषण
८ अ १. मन हे स्थूल शरीर आणि अव्यक्त अशा सूक्ष्मातीसूक्ष्म आत्म्याला जोडणारे असल्याने ते सूक्ष्म असणे : या ठिकाणी भगवंत स्वतः उभा असतांना भगवंतच सांगतो, ‘मलाच (ईश्वरप्राप्ती) प्राप्त करून घेण्यासाठी साधना कर.’ यासाठी भगवंताने शरीर रक्षणार्थ बाह्यांगाने पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेद्रिये दिलेली आहेत. शरीर रक्षणार्थ जेवढी क्षमता हवी, तेवढीच त्या इंद्रियांना दिलेली आहे. म्हणजेच त्यांचे कार्य सीमित आहे. तेच अंतस्थ असलेली इंद्रिये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही ४ इंद्रिये अंतर्कार्य करण्यासाठी दिली आहेत. मन हे दोघांनाही जोडणारे आहे. मनाची क्षमता सर्र्वांत अधिक आहे. मन हे स्थूल शरीर आणि अव्यक्त आत्मा यांना जोडणारे असल्याने ते सूक्ष्म आहे; कारण आत्मा सूक्ष्मातीसूक्ष्म आहे.
८ अ २. आत्म्याशी भावपूर्ण अनुसंधानित होऊन कर्म केल्यास मनुष्याचे ईश्वरप्राप्ती हे ध्येय त्याला गाठता येऊन त्याला आनंदाची प्राप्ती होणे : मन आत्मा आणि शरीर यांनाही जोडले जाते; जसे मन + कान = ऐकणे, मन + डोळा = पहाणे, याप्रमाणे असते. जर एखाद्याचे मन आत्म्याशी जोडले न जाता, भौतिक सुखाकडे वळवून बाह्य इंद्रियांद्वारे कार्य करत राहिल्यास ते मायेशी बद्ध होते आणि आत्मस्वरूपाशी विन्मुख होते. त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचे ‘ ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय त्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याला जीवनात आनंद न मिळता दुःखच भोगावे लागते. तेच कर्म आत्म्याशी भावपूर्ण अनुसंधानित होऊन केल्यास त्याचे ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय त्याला गाठता येते आणि त्याला आनंदाची प्राप्ती होते; म्हणूनच प्रत्येकाला ‘आनंद मिळावा’, असे वाटते, त्याचे कारण येथे स्पष्ट होते.
८ अ ३. मन हेच मनुष्याचे बंधन आणि मोक्ष यांना कारणीभूत असणे : भगवंत म्हणतात, ‘यासाठी हे मानवा, तुझे मन माझ्याशी (आत्मस्वरूपाशी) अनुसंधानित ठेव. मी तुझ्या शरिराची यंत्रणा चालवत असल्याने मीच कर्ता, माता, पिता, गुरु इत्यादी सर्वस्व असल्याने तू माझा भक्त हो. माझी पूजा कर.’ म्हणजे ‘प्रत्येक कर्म करतांना त्यात ईश्वर आहे’, असे समजून भावपूर्ण होऊन पूजेप्रमाणे पूज्य (शुद्ध, पवित्र) भावाने कर्म कर ! मला शरण जा, म्हणजे अहंविरहित होऊन ‘इदं न मम’ याप्रमाणे सर्वस्व अर्पण कर! असे केल्याने नेहमी आत्मसंबंध जोडला जाईल आणि तुझ्यावरील रज-तमाचे आवरण, म्हणजेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन तुझे चित्त शुद्ध होईल. त्यामुळे आत्मप्रकाश प्रकट होऊन तुला आनंद प्राप्त होईल, तसेच परमेश्वराची प्राप्ती होईल.’ म्हणूनच म्हटले आहे, ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।’ म्हणजे मन हेच मनुष्याच्या बंधाला (बंधनाला) आणि मोक्षाला कारण आहे.
मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे. त्या दृष्टीने शिष्य गुरूंकडून शिकले असते, तर आजची परिस्थिती आली नसती. साधनेद्वारे आत्मबळ वाढून मनुष्याने जीवनाचे अंतिम ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ हे गाठल्याने त्याचे कल्याण झाले असते. वातावरणात वाढलेले रज-तमाचे आवरण राहिले नसते आणि मानवांची मने विकृत झाली नसती.
९. सच्चिदानन्दघन ब्रह्मामध्ये एकरूप होण्यास योग्य असणार्या पुरुषाची लक्षणे
बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ।।
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ।।
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ५१ ते ५३
अर्थ : विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकान्तात शुद्ध ठिकाणी रहाणारा, सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण आणि इंद्रिये यांवर संयम ठेवून मन, वाणी अन् शरीर नियंत्रणात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित आणि शांतीयुक्त असा पुरुष ‘सच्चिदानन्दघन ब्रह्मा’मध्ये एकरूप होण्यास पात्र होतो.
९ अ. विवेचन आणि विश्लेषण
९ अ १. साधना केल्यावर गुरूंच्या कृपेने बुद्धीचे ‘प्रज्ञा’त रूपांतर होऊन ‘मेधा’ म्हणजे ईश्वरेच्छा सिद्ध होऊन मनुष्याची ‘सच्चिदानन्दघन ब्रह्मा’कडे वाटचाल होणे : मन विकल्परहित होऊन कार्य करते, तेव्हा बुद्धी शुद्ध होऊन ‘विवेक’ निर्माण होतो. साधनेद्वारे गुरूंच्या कृपेने पुढे बुद्धीची प्रज्ञा होऊन ‘मेधा’ सिद्ध होते. ‘मेधा’ म्हणजे ईश्वरेच्छाच असते. जेव्हा मनुष्य अशा प्रकारे ईश्वरेच्छेने वागू लागेल आणि हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन करील, तसेच त्याच्याकडून शब्दादी विषयांचा त्याग होईल, तो एकांतात राहील, तेव्हा त्याची सच्चिदानन्दघन ब्रह्माकडे वाटचाल होते. तशी अवस्था त्याला प्राप्त होईल.
९ अ २. मायेचा अंत करणे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी लीन होणे आणि हीच ईश्वरप्राप्ती असणे : एकांत म्हणजे एक + अंत. येथे १ आकडा हा ‘शून्याशी फाटा काढीजे त्यासी एक (१) म्हणीजे ।’ (एकनाथी भागवत) येथे १ मधील ‘शून्य’ म्हणजे ‘ब्रह्म’ आणि ‘फाटा’ म्हणजे ‘माया’ आहे. माया ही कार्यकारण भाव दाखवते. याद्वारा साधना करतांना एकाग्रतेने (एक + अग्र) नेहमी लक्ष ब्रह्माकडे, म्हणजे शून्याकडे ठेवले पाहिजे. अशा रितीने झालेले कार्यसुद्धा भगवंताला अर्पण करणे, म्हणजेच ‘मायेचा अंत करणे’ असे आहे. असे झाल्यास तो ब्रह्मस्वरूपाशी लीन होतो. हीच ईश्वरप्राप्ती होय; कारण मूलतः सर्व निर्मिती ही चैतन्याद्वारेच झाल्यामुळे चैतन्याविना काहीच नाही. याची गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यावरच प्रचीती येते.
या वरील सर्व विवरणावरून ‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, हे दिसून येते.’
– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (एप्रिल २०१८)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !