आजीची भाजी रानभाजी – महाऔषधी महाळुंग

रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण महाऔषधी महाळुंगाची माहिती वाचणार आहोत.            

(भाग २०)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/947894.html

महाळुंग

महाळुंग

लिंबू, संत्री, मोसंबी अशा वर्गात महाळुंग/गळलिंबू हेही एक अत्यंत रुचकर फळ आहे. फळ साधारण पेरूच्या आकाराचे; पण लिंबापेक्षा ७-८ पटींनी मोठे असते. फळाची साल बरीच जाड असते. फळाचा मध्य भाग आंबट असतो. महाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते.

 महाळुंगाचा लाभ

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल, तर महाळुंग सेवन करावे. अत्यंत रुची उत्पन्न करणारे फळ आहे. उचकी, दमा, जुनाट कोरडा खोकला यात महाळुंग सेवन करणे लाभदायक आहे. महाळुंगचे फळ नियमित खाल्ले की, बराच लाभ होतो. विंचू चावला असता महाळुंगाच्या बिया वाटून लेप लावल्यास लाभ दिसतो.

उलटी, मळमळ, तोंडाला पाणी सुटणे, अशा लक्षणांत महाळुंगाचे सेवन पुष्कळ लाभप्रद दिसते. फळ खाल्ल्यावर रोग्याला तात्काळ आराम मिळून जातो. पोटात दुखत असेल, पोटात गोळा आल्यासारखे वाटत असेल, तर फळाचे सेवन लाभदायक आहे. ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही आणि पाळीच्या वेळी फार कष्ट होतात, त्यांच्यासाठी फळ अन् बिया यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा. अजीर्णामुळे पोट दुखून त्रास होत असेल, तर महाळुंगाचे सेवन अमृततुल्य आहे. महाळुंग हे हृदयाला बळ देणारे आहे. आजाराने हृदय कमकुवत झाले असेल, तर फळाचे सेवन पुष्कळ लाभदायी आहे. महाळुंगाच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते, तसेच दारूची नशा पटकन अल्प करण्यासाठी लाभ होतो.

गळलिंबू आम्ल रसाचे असल्याने क्षारांपासून बनलेल्या मुतखड्यांत अत्यंत प्रभावी ठरते. अनुशापोटी १६ वा भाग गळलिंबू चाखून खावा. नंतर एक पेला कोमट पाणी प्यावे. अर्धा घंटा काहीही न खाता चालावे.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948569.html