आयुर्वेदानुसार ऋतूंना अनुसरून आहार आणि जीवनशैली यांमध्ये पालट करणे, म्हणजेच ‘ऋतूचर्या’ होय. ग्रीष्म ऋतूनंतर चालू होणार्या वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) निसर्गात, तसेच स्वतःच्या शरिरातही अनेक पालट घडून येतात. या काळात आदान (उत्तरायण) काळ संपून जठराग्नी (पचनशक्ती) कमकुवत होतो. परिणामी शरिरात वात दोष वाढतो आणि आम (अपाचित विषारी घटक) साठण्याची शक्यता अधिक असते. परिणामी भूक न लागणे, अपचन, पोट फुगणे, उलट्या, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, ताप, सर्दी, खोकला आणि संसर्ग (इन्फेक्शन) सहज होऊ शकतात. म्हणूनच या ऋतूत आहार-विहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
१. आहारचर्या (आहारात पाळायचे नियम)

अ. जुने धान्य आणि हिरवे मूग खाणे उत्तम मानले जाते.
आ. गरम, हलका, ताजा सिद्ध केलेला अन् सहज पचणारा आहार घ्या.
इ. भुकेनुसार अगदी मर्यादित प्रमाणातच अन्न सेवन करा.
ई. आल्याचा तुकडा (सुंठ), पिंपळी, जिरे, हिंग इत्यादी दीपन-पाचन द्रव्यांचा आहारात वापर केल्याने जठराग्नी वाढतो.
उ. दिवसभर कोमट किंवा उकळून थंड केलेले पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.
ऊ. अतीप्रमाणात खाणे आणि अवेळी जेवणे टाळा.
२. विहारचर्या (जीवनशैली)
अ. प्रतिदिन अभ्यंग (तेलाने मसाज) केल्याने वात शमतो आणि शरिराला बळ मिळते.
आ. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम नियमितपणे करा.
इ. रात्रीच्या वेळी पुरेशी आणि शांत झोप घ्या.
ई. शरीर नेहमी कोरडे आणि उबदार ठेवा.
उ. पावसात भिजल्यास त्वरित कोरडे कपडे परिधान करा.
३. टाळायच्या सवयी (वर्ज्य गोष्टी)
अ. दिवसा झोपणे.
आ. अतीव्यायाम किंवा अधिक शारीरिक श्रम करणे.
इ. थंड हवा आणि पावसात अधिक वेळ रहाणे.
ई. थंड पाणी, बर्फाचे पदार्थ, रात्री दही खाणे, तसेच तेलकट, तळलेले, पचनास जड, आंबट आणि अशुद्ध अन्न खाणे.
उ. आधीचे जेवण पचलेले नसतांना पुन्हा अन्न सेवन करणे.
४. रोगप्रतिकारक शक्ती (व्याधीक्षमत्व) वाढवा !
अ. पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही न्यून होण्याची शक्यता असते. म्हणूनच जठराग्नी चांगला करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आ. एखाद्या तज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्यानुसार खालील औषधांचे सेवन केले जाऊ शकते (टीप : ही औषधे व्यक्तीची प्रकृती, वय, आरोग्य स्थिती आणि आजाराच्या लक्षणांनुसार केवळ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)
१. दशमूलारिष्ट : वात शमन, शारीरिक शक्ती आणि पावसाळ्यातील शारीरिक समस्यांवर लाभदायक.
२. अमृतारिष्ट : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि संसर्ग यांपासून बचावासाठी.
३. बलारिष्ट : शरिराला आणि शिरांना बळकट करण्यासाठी, तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी.
५. निष्कर्ष
आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे ‘अग्नी हाच आरोग्याचा मूळ पाया आहे.’ वर्षा ऋतूत जठराग्नीचे रक्षण केल्यास वात दोष नियंत्रणात रहातो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऋतू पालटामुळे होणार्या आजारांपासून संरक्षण मिळते. ‘ऋतुचर्येचे पालन करा, जठराग्नीचे रक्षण करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि आरोग्यदायी पावसाळ्याचा आनंद घ्या.’
– वैद्या (कु.) नित्यश्री वाय., श्री शारदा आयुर्वेदालय, जिल्हा शिवमोग्गा, कर्नाटक.

प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !