आजीची भाजी रानभाजी – बहुपयोगी कंदमुळ ‘रताळे’

रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण रताळ्याची माहिती वाचणार आहोत.  

(भाग १९)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/947208.html

रताळे

शरिराला ऊर्जा देणारे रताळे !

रताळे हे एक पौष्टिक कंदमूळ आहे. उपवासाच्या दिवसात विशेषतः महाशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. ‘गोड बटाटा (स्वीट पोटॅटो)’ म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरिराला ऊर्जा देण्याचे काम होते.

रताळ्यामुळे मिळणारे लाभ 

‘स्टार्च’ने परिपूर्ण असल्यामुळे रताळ्यामधून शरिराला त्वरित ऊर्जा मिळते. रताळ्यांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. विशेषतः केशरी रंगाच्या रताळ्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात आढळते. हे डोळे, त्वचा, हाडे आणि नसा यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. रताळ्यांमध्ये पोटॅशियम असल्याने ते हृदयाच्या कार्यासाठी साहाय्य करते. रताळ्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नाही. ते पचायला हलके असतात.

रताळ्यांचा गर पांढरा, पिवळसर किंवा केशरी रंगाचा असतो. रताळे भाजून, उकडून किंवा त्यापासून एखादा चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले जातात. गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारांनी ते रुचकर लागतात. उपवासाच्या व्यतिरिक्त नियमित आहारातही रताळ्यांचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळू शकतात.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

रताळ्यांमध्ये कॅन्सरशी (कर्करोगाशी) लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. यातील ‘प्रोटीन इनहिबिटर’ या प्रथिनांत कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे. तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने चालू राहून लवकर भूक लागत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाते.

रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये ‘बीटा कॅरोटिन’ हे ‘अँटिऑक्सिडंट’ असते. त्यामुळे कॅन्सर (कर्करोग), तसेच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात रहाण्यास कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते. वजन वाढण्यात अन्नातील ऊर्जेचा (‘कॅलरीज’चा) सर्वांत मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचे प्रमाण प्रत्येक १०० ग्रॅमच्या मागे केवळ ८६ एवढे असते.

रताळ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. या गुणधर्मामुळे निर्जलीकरण होत नाही. लोहाचेही अधिक प्रमाण असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास साहाय्य होते. पिष्टमय पदार्थांमुळे शरिरातील अतिरिक्त मेद न्यून करण्याचे काम करतो, त्यासह सिद्ध होणार्‍या नवीन मेदावरही नियंत्रण आणतो.

रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्‍या भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रताळे खाल्ल्यानंतर फायबरमुळे पुष्कळ वेळ पोट भरलेले रहाते, तसेच भुकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे ४ ग्रॅम फायबर असते. म्हणून उपवासाच्या दिवसाच्या व्यतिरिक्त एरव्हीही रताळ्याचा आहारात समावेश करावा.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948252.html