पावसाचे पाणी पुणे येथील अनेक सोसायट्यांमध्ये शिरले !

नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर चालू !

पावसाचे पाणी अनेक सोसायट्यांमध्ये

पुणे – मुसळधार पावसाने पुणे शहरात हाहाकार माजला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरातील एकतानगर येथे ओढ्याचे बॅकवॉटर शिरल्याने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. पुणे महानगरपालिका आणि अग्नीशमनदल यांनी तातडीने कारवाई चालू केली. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. प्रशासनाने एकतानगरमधील रहिवाशांचे जवळच्या सुरक्षित ठीकाणी स्थलांतर चालू केले आहे. यासाठी स्थानिक शाळा आणि सामुदायिक सभागृह यांचा वापर केला जात आहे.

पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क रहाण्याचे आणि नदीकाठच्या भागात न जाण्याचे आदेश दिले आहेत, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील २४ घंट्यांतही पावसाची चेतावणी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकारेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले !

ओंकारेश्वर मंदिर

पुण्यातील मुठा नदी दुथडी भरून वहात असून नदीकाठच्या वस्त्या आणि गावे यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे. शनिवार पेठेतील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे ते भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनीही पूर परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. मावळ तालुक्यातही पावसाचा हाहा:कार चालू आहे.

पवना, मुळा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता !

जोरदार पाऊस होत असल्याने धरणाची पाणीपातळी वाढली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे मुळा आणि पवना या नद्यांना पूर आला आहे. सध्या पवना नदीपात्रात १५ सहस्र ५७० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे, तर मुळशी धरणातून ३१ सहस्र ५०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे. सध्या पावसाचा जोर अल्प झाला असला, तरी धरणातून पाण्याचा विसर्ग चालूच असल्याने नदीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने याचा पुन्हा एकदा फटका पिंपरी-चिंचवड शहरातील नदीकाठी असलेल्या भागाला बसणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. भिमानदीवरील पूलही पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.