आजीची भाजी रानभाजी आणि रानमेवा : करवंद

रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण करवंदांची माहिती वाचणार आहोत.                                

(भाग १८)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/945900.html

१. करवंद

करवंदांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे फळ पित्तावर अत्यंत गुणकारी ठरते. ‘कोलॅस्ट्राल’चे प्रमाण न्यून करण्यास हे फळ साहाय्य करते. त्याचसमवेत रक्तातील साखरेचे प्रमाणही करवंद न्यून करते. करवंदाच्या सालीचा उपयोग विविध त्वचारोगावर केला जातो. ‘च्युईंगगम’ बनवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग करतात. करवंदाचे सरबत, चटणी आणि लोणचेही बनवतात.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

१ अ. सरबत करण्याची पद्धत 

सरबत सिद्ध करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली एक किलो करवंदे निवडावीत. २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावीत. १ लिटर पाण्यात ही फळे टाकून शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर मलमलच्या कपड्यातून हा लगदा गाळून घ्यावा. सिद्ध झालेल्या रसामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम साखर, १२०० मि.ली. पाणी टाकून ढवळून घ्यावे.

चवीसाठी थोडे मीठ आणि जिर्‍याची पावडर घालावी. हे सरबत अधिक काळ टिकवून ठेवायचे असल्यास ७० अंश तापमानास १५ ते २० मिनिटे गरम करावे. त्यानंतर हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.

१ आ. चटणी करण्याची पद्धत 

करवंदाची चटणी बनवण्यासाठी १ किलो कच्च्या फळांच्या काढलेल्या गरात साखर आणि मीठ मिसळून हे मिश्रण उकळण्यास ठेवावे. एका कपड्यात कांदा, लसूण, आले बांधावे आणि दुसर्‍या कपड्यात मिरची पावडर, वेलदोडे, दालचिनी मसाले बांधावेत.  दोन्हीच्या पुरचुंड्या बनवून उकळत्या मिश्रणात सोडाव्यात. थोड्या थोड्या वेळाने पळीने या पुरचुंड्या दाबाव्यात. मिश्रण घट्ट झाल्यावर पुरचुंडी चांगली पिळून काढावी. व्हिनेगर टाकून एक ते दोन मिनिटे उकळून घ्यावे. हे मिश्रण बाटलीत भरण्यापूर्वी २५० पीपीएम् सोडिअम बेंझॉईट मिसळावे. हवाबंद बाटलीत मिश्रण भरून थंड करून घ्यावे.

१ इ. लोणचे करण्याची पद्धत 

करवंदाचे लोणचे करण्यासाठी दीड किलो कच्ची करवंदे २५० ग्रॅम तापवून घेतलेले मीठ, २० ग्रॅम मेथी, ३० ग्रॅम हळदपूड, ५० ग्रॅम हिंगपूड, ५० ग्रॅम लाल मिरची पावडर, १०० ग्रॅम मोहरी पावडर, ४०० ग्रॅम गरम करून थंड केलेले गोडेतेल साहित्य घ्यावे. निरोगी फळे निवडून त्यांचे देठ काढून घ्यावेत. पाण्याने स्वच्छ धुवून निम्मे मीठ आणि हळद लावून २ ते ३ घंटे एका पातेल्यात ठेवावे. निम्म्या गोडेतेलात मेथी, हिंग, मोहरी, हळद यांची फोडणी द्यावी. पाणी निथळून गेल्यावर ही फोडणी करवंदांवर घालावी. हे मिश्रण चांगले मिसळून त्यात २५० पीपीएम् सोडिअम बेंझॉईट टाकावे.

एका काचेच्या बाटलीत हे लोणचे भरून उरलेले तेल त्यात ओतावे. तेलाची पातळी लोणच्याच्या वर राहील, याची काळजी घ्यावी. हे लोणचे कोरड्या जागी साठवून ठेवले, तर वर्षभर टिकते.

करवंदांपासून चेरी, जॅम, सिरप आदी प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात. या पदार्थांना बाजारात भरपूर मागणी आहे.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/947894.html