वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात सूत्रसंचालन करण्याची सेवा मिळाल्यावर साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘वर्ष २०२५ मधील फोंडा, गोवा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्यावर या संपूर्ण कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

 १. गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात सूत्रसंचालनाच्या सेवेचा सराव करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने नामजपादी उपाय होणे 

सौ. गौरी प्रभास नायक

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सूत्रसंचालन सेवेचा सराव करतांना माझ्याकडून नामजपादी उपाय झाले. माझ्यात व्यष्टी साधनेचे गांभीर्य अत्यल्प होते, तरीही ‘माझ्याकडून नामजपादी उपाय कसे होत होते ?’ हे माझ्या लक्षात येत नव्हते. माझी सतत भावजागृती होत होती. प.पू. गुरुदेवांना आर्ततेने प्रार्थना होत होती, तसेच ‘मला ही माया समजत नाही. विचार कसा करावा ?’, हे मला सुचत नाही. मला तुमच्याविना काहीच ठाऊक नाही. ‘तुमचे चरण आणि मी’ असेच मला रहायचे आहे. मला एवढेच जमते. अन्य सगळे तुम्ही बघून घ्या’, असे विचार माझ्या मनात पूर्ण दिवस चालू असायचे.

२. ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’च्या दिवशी संतांच्या उपस्थितीमुळे तेथील वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवणे 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरचे सगळे आवरून मी दुचाकीवरून महोत्सव स्थळी पोचले. तिथे पोचता क्षणी मला सगळ्याचाच विसर पडला. केवळ ‘मला सेवा करायची आहे’ एवढेच मला ज्ञात होते. महोत्सवाच्या स्थळी भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७६ वर्षे), सनातनच्या १३२ व्या संत पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) या संतांच्या उपस्थितीमुळे तेथील वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मला शांतीची अनुभूती येत होती.

३. ‘संहितेतील काही लिखाणाचे कागद घरी रहाणे, ते लिखाण मुखोद्गत नसणे आणि अन्य साधिकेने ते कागद त्वरित आणून देणे 

सेवेची रूपरेषा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पालटत होती; पण गुरुदेव आम्हाला वर्तमानात रहाण्यास शिकवत होते. ‘माझा प्रत्येक शब्द गुरुचरणी सेवापुष्प होऊन अर्पण व्हावा’, अशी प्रार्थना सतत होत होती. असाच धावा चालू असतांना गुरुदेवांनी लक्षात आणून दिले, ‘संहितेतील काही लिखाणाचे कागद माझ्याकडून घरी राहिले आणि ते लिखाण मला मुखोद्गतही नव्हते. तेव्हा मी सहसाधिकेला सांगितल्यावर तिने मला ते कागद त्वरित आणून दिले. माझ्याकडून होऊ शकणारी चूक गुरुकृपेनेच टळली.

४. ‘संत चैतन्य प्रक्षेपित करत आहेत’, असे साधिकेला जाणवणे

सूत्रसंचालनाची सेवा चालू झाल्यावर मला मी एका वेगळ्या लोकांत असल्याची अनुभूती येऊ लागली. मला समोर सगळे संत दिसत होते आणि ‘तेच चैतन्य प्रक्षेपित करत आहेत’, असे मला जाणवत होते.

५. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांच्या रूपात दर्शन दिले’, असे साधिकेला वाटणे

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचे आगमन झाल्यावर ‘प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या छायाचित्रातून बाहेर आले आहेत’, असे मला जाणवले. ‘माझी स्थुलातून प.पू. भक्तराज महाराज यांची कधीही भेट झाली नाही; म्हणून ते पू. शेवडेगुरुजींच्या रूपात आले आणि त्यांनी दर्शन दिले’, असे मला वाटू लागले. पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचा परिचय सांगतांना मला कृतज्ञता वाटू लागली. त्यांचे प्रवचन ऐकतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कौतुक करत असतांना ‘आपले गुरुदेव किती महान आहेत !’, हे माझ्या लक्षात आले.

सर्व सेवा संपल्यावर माझा मुलगा (कु. स्वोजस (वर्ष २०२५ मधील आध्यात्मिक पातळी ५१ टक्के, वय ७ वर्षे) व्यासपिठावर आला आणि मला म्हणाला, ‘‘आई, ते गुरुजी प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारखे दिसतात ना !’’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि मुलाचे कौतुकही वाटले.

६. मला सेवा करतांना स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपवून घरी जातांना साधकांनी ‘सेवा चांगली झाली’, असे मला सांगितले, तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांनीच सर्वकाही केले आहे’, असे मला जाणवत होते.

७. गुरुचरणी कृतज्ञता

प.पू. गुरुदेवांचे माझ्यावर पूर्ण लक्ष आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने माझ्या आयुष्यात घडत असलेल्या कौटुंबिक त्रासांवर ‘सेवा करणे’ हा उपाय मिळाला आहे. प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून व्यष्टी साधनाही करून घेतली. त्यांनी माझ्यात भावजागृती होण्यासाठी पुरक वातावरण निर्माण केले. माझी ही सेवा करण्याची पात्रता नव्हती. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्याकडून ही सेवा झाली आणि साधकांनी माझे कौतुकही केले.

‘हे गुरुनाथा, मला केवळ तुमच्या चरणांजवळ रहायचे आहे. मला तेवढेच ठाऊक आहे’, हीच माझी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. गौरी प्रभास नायक, ढवळी, फोंडा, गोवा. (१२.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक