‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखन करतांना आलेल्या अनुभूती आणि अनुभव

श्री. विक्रम भावे

‘खरेतर स्वतःचे एखादे पुस्तक प्रकाशित होणे, ही आनंदाची गोष्ट असते; मात्र ‘दाभोलकरहत्या आणि मी’ हे पुस्तक प्रकाशित होतांना माझ्या मनात मिश्र भावना आहेत. त्यात वेदनाच अधिक आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळे मला या प्रकरणात खोटेपणाने गोवण्यात आले आणि त्यामुळे मला अन् माझ्या कुटुंबियांना जे काही भोगावे लागले, त्या विषयावर हे पुस्तक आहे. त्यामुळे ते आनंददायी नक्कीच नाही.

१. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश 

‘हिंदुत्वनिष्ठ असणे, हा या देशात अपराध ठरतो कि काय ?’, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती असल्याचे दिसते. त्यामुळे समस्त हिंदुत्वनिष्ठांना सजग करण्यासाठी कर्तव्यभावनेने हे पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले. ‘हिंदुविरोधी षड्यंत्र हिंदुत्वनिष्ठ आणि सर्वसामान्य हिंदू यांनी वेळीच ओळखून सावध व्हावे’, हा या पुस्तकाचा खरा उद्देश आहे.

२. केवळ २ दिवसांत पुस्तकाचा मूळ ढाचा टंकलिखित होऊन पुढे अत्यल्प वेळेत वास्तवात पुस्तक नावारूपाला येणे 

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

मी त्याच (दाभोलकर हत्या) प्रकरणातील आरोपी असल्याने मला या प्रकरणावर काहीही लिहिता येत नव्हते. न्यायालयाने या प्रकरणातून माझी निर्दाेष मुक्तता केल्यानंतर मी त्यावर काही लिहू शकत होतो. त्यामुळे असे पुस्तक लिहायचे निश्चित झाल्यानंतर मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मनोमन प्रार्थना करून लेखन करण्यास बसलो. आश्चर्य म्हणजे केवळ २ दिवसांत पुस्तकाचा मूळ ढाचा टंकलेखन करून झालाही. केवळ न् केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच हे शक्य झाले. त्यांनीच प्रेरणा दिली आणि मला सगळे सुचत गेले. आजही मी या पुस्तकातील एखादे पान उघडून वाचू लागतो, तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटते की, हे मी कसे लिहिले असेल ?

इतकेच नव्हे, तर पृष्ठरचना, मुखपृष्ठ संकल्पना आणि रचना यांसाठीही गुरुदेवांच्या कृपेने माणसे मिळत गेली अन् सगळे काही अत्यल्प वेळेत पूर्ण झाले.

३. हिंदुविरोधी लोकांच्या दहशतीचा आलेला अनुभव 

पुस्तकाचे वितरण करण्यासाठी मी काही वितरकांना संपर्क केला होता; पण पुस्तकाचे नाव आणि विषय पाहून काही वितरकांनी स्पष्ट ‘नाही’ सांगितले, तर काही जणांनी ‘आधीचेच काम पुष्कळ आहे’, असे सांगून टाळले. मुद्रणाविषयीही थोडासा असाच काहीसा अनुभव आला. दाभोलकरांच्या हत्येनंतर ‘सेक्युलर’ (म्हणजे हिंदुविरोधी) राजकारणी, दाभोलकरांचे कुटुंब आणि भंपक पुरोगामी यांनी हिंदुत्वनिष्ठांवर आरोपांची राळ उडवत समाजात एकप्रकारची दहशत (भीती) निर्माण केली आहे, हे यातून दिसून येते.’

– श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

राष्ट्र आणि धर्म प्रेमी, जिज्ञासू, वाचक, विज्ञापनदाते यांनी ‘दाभोलकरहत्या आणि मी’ हे पुस्तक खरेदी करून त्याचा आवर्जून अभ्यास करा आणि याप्रमाणे जे निर्दोष असतील, त्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुस्तके लिहिण्यास साहाय्य करा. त्यामुळे खरे गुन्हेगार आणि त्यांना साहाय्य करणारे पोलीस असल्यास ते उघडकीस येतील. – संपादक