निरपराध्याचे आत्मकथन !

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे समीक्षण !

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी अन्वेषण यंत्रणेकडून प्रयत्न केले गेले. अशा प्रकरणातील खरे अपराधी पकडण्याचे दायित्व अन्वेषण यंत्रणेचे असते. ‘यंत्रणांनी कसून अन्वेषण करून खर्‍या अपराध्यांना पकडावे’, अशी समाजाची माफक अपेक्षा असते. तथापि या प्रकरणात खर्‍या आरोपींना न पकडता निरपराध्यांना पकडून ‘त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसे न्यायालयात सिद्ध करण्याची खटपटही करण्यात आली. याविषयीची सविस्तर माहिती श्री. विक्रम भावे लिखित आणि प्रकाशित ‘दाभोलकर हत्या आणि मी’, या पुस्तकात आढळून येते. 

श्री. विक्रम भावे

या पुस्तकातील दुसरे प्रकरण वाचतांना वाचकाला धक्क्यांवर धक्के बसतात. निरपराध्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी केलेला खटाटोप वाचून अन्वेषण यंत्रणेवरचा विश्वास उडतो.

१. निरपराधी व्यक्तीला अपराधी ठरवणे, हे महान पातक !

वास्तविक भारतीय न्यायशास्त्र सांगते की, अपराधी असलेल्या व्यक्तीला तिने केलेल्या अपराधाला अनुसरून शिक्षा झाली पाहिजे. निरपराधी व्यक्तीला अपराधी ठरवणे, हा मोठा अपराध आहे. असे कृत्य म्हणजे लबाडी, असत्य आणि खर्‍या अपराध्याचा बचाव करण्यासाठी केलेला खटाटोप आहे. हे सुसंस्कृतपणा, न्यायनिष्ठ आणि प्रामाणिकपणा यांचे लक्षण नाही. म्हणून हे महान पातक आहे. निरपराध्यांना अपराधी ठरवले जात असेल, तर देशातील न्यायव्यवस्था आणि अन्वेषणयंत्रणा यांवरचा जनतेचा विश्वास उडण्यास हातभार लागेल. याचा परिणाम, म्हणजे देशात अराजक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे समाज अध:पतित होतो; म्हणूनच दुष्परिणाम अत्यंत घातक असतात. याची कल्पना केली तरी सामान्य माणसाची झोप उडण्यास पुरेशी आहे.

२. वस्तूस्थितीचे कथन करणारे पुस्तक !

जी वस्तूस्थिती या पुस्तकात मांडण्यात आली आहे, ती वाचतांना वाचकाचे मन अस्वस्थ होते. या पुस्तकात निरपराधी असूनही अपराधी म्हणून ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला, त्या विक्रम भावे, शरद कळसकर (वानगीदाखल या दोघांची नावे घेतली आहेत.) यांच्या आत्मनिवेदनातून त्यांची व्यथा दिसते. वाचतांना आपण ती अनुभवतो. तथापि अन्यायाच्या विरोधात त्यांनी दाखवलेले धैर्य, झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा; म्हणून त्यांनी केलेला संघर्ष पाहून त्यांच्या प्रतिकारनिष्ठेचे कौतुकही वाटते. शेतकरी कुटुंबातून आलेले शरद कळसकर यांचे निवेदन याच पुस्तकात १३ व्या प्रकरणात वाचायला मिळते.

श्री. दुर्गेश परुळकर

३. ‘काही अनुत्तरित प्रश्नां’ची उत्तरे सामान्य जनतेला मिळत नाहीत, ही खंत !

या पुस्तक लेखनामागचा लेखकाचा हेतू ‘न्यायव्यवस्था आणि अन्वेषणयंत्रणा पारदर्शी असावी, या यंत्रणेत काम करणारी व्यक्ती प्रामाणिक अन् न्यायनिष्ठ असावी, लबाडी, सूडभावना, तसेच असत्य, या अन् अशा विकारांपासून मुक्त असणारे कर्मचारी आणि अधिकारी, असा वर्ग अशा यंत्रणांमध्ये असावा, अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे दायित्व प्रामाणिकपणे पाळले जावे’, हा आहे. लेखक विक्रम भावे यांनी अन्वेषण कार्यातील त्रुटी, चुका आणि कमतरता व्यक्त करणारे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे सामान्य जनतेला मिळत नाहीत, अशी खंत ‘काही अनुत्तरित प्रश्न’, हे प्रकरण वाचतांना सातत्याने मनाला सलत असते.

४. अधिवक्त्यांविषयी आदराची आणि विश्वासाची भावना

निरपराधी असलेल्यांना अपराधी ठरवण्यात आले. त्यांना न्याय मिळावा; म्हणून पराकाष्ठेचा प्रयत्न करणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची लेखक विक्रम भावे यांनी केलेली प्रशंसा समाधान देणारी आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अधिवक्ता म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि सत्य न्यायालयात मांडण्यासाठी दाखवलेले साहस कौतुकास्पद आहे. ‘प्रतिकूल वातावरणात त्यांना काम करावे लागत होते’, याची जाणीव पुस्तक वाचतांना सातत्याने होते. म्हणून या उभय अधिवक्त्यांविषयी आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण होते.

५. सर्वसामान्य जनतेने वाचावे असे पुस्तक !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनाच आरोपी करण्याचा केलेला प्रयत्न वाचतांना नीतीभ्रष्ट अधिकार्‍यांविषयी सात्त्विक संताप येतो. अशा सुभाष सिंह या सीबीआयच्या अधिकार्‍याची सूडभावना या पुस्तकात विक्रम भावे यांनी अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे आणि सत्य जाणून घ्यावे, तसेच सत्यावर, न्यायावर आपल्या सर्व श्रद्धास्थानांवर अचल निष्ठा ठेवली, तर कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता येते अन् मन खंबीर ठेवता येते, हे श्री. विक्रम भावे यांनी या पुस्तकात नेमकेपणाने मांडले आहे.

निरपराधी व्यक्तीला अपराधी ठरवून अनेक वर्षे कारागृहात जेव्हा व्यतित करावी लागतात, तेव्हा तो दीर्घ असलेला कालखंड, त्या व्यक्तीसाठी आणि तिच्या परिवारासाठी काळरात्र असते, याची अनुभूती आणून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.

मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीने केलेल्या विधानाने अन्वेषण यंत्रणेची अन्वेषणाची दिशा कशी पालटते आणि भरकटत जाते ?, याचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. मोठ्या पदावरच्या व्यक्तीने संयमी आणि विवेकी असणे किती आवश्यक आहे ?, हीच गोष्ट या पुस्तकाने अधोरेखित केली आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेने हे पुस्तक अवश्य वाचावे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१८.७.२०२५)